सोलापूर -मुंबई आणि पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कर्जत-लोणावळा घाटातील ठाकूरवाडी आणि मंकी हिलदरम्यान दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. त्याचा परिणाम सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांवरही झाला असून गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी (इंद्रायणी) एक्सप्रेस सोमवारी रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय, मुंबईहून रविवारी रात्री सुटलेली मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस पुणे स्थानकावरच थांबविण्यात आली आहे. तसेच सोलापूरहून मुंबईकडे निघालेली सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस देखील पुण्यातच थांबविण्यात आल्याने दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. मुंबईत अडकलेल्या सोलापूरकरांना आता एसटी किंवा खासगी बसने सोलापूर गाठण्याची वेळ आली आहे.
मध्य रेल्वेने अधिकृत ‘एक्स’ (X) पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, घाट विभागात दरड हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मुंबईत सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून मध्य, पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. पुणे शहर, लोणावळा आणि घाट परिसरातही पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे मार्गावरील हजारो प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागत आहे.
