Pune Civic Issues: पुण्यातील वाहतूक, खराब रस्ते, नागरी सुविधा, पर्यावरणाची हानी आणि ट्रॅफिक यावर एका पुणेकरानं केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला बहुतांश लोकांनी समर्थन दिलं आहे. तसंच शहरासमोरील प्रश्न गंभीर होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

काय लिहिलंय पोस्टमध्ये?
ही पोस्ट @ninaad_pai या एक्स अकाउंटवरून करण्यात आली आहे. ही पोस्ट पुण्यातच राहणाऱ्या एका व्यक्तीनं केली आहे. तो म्हणतोय, “पुणे हे ठिकाण शहर म्हणून अपयशी ठरलंय. माझा जन्म पुण्यातच झालाय. पुण्यातच मी लहानाचा मोठा झालो. पण शहरातील वाहतूक, खराब रस्ते आणि नागरी सुविधांची अवस्था पाहून निराशा होते. राजकीय नेते आणि सरकारी यंत्रणा केवळ आश्वासनं देतात. पण परिस्थिती काही बदलत नाही. शहराला ठोस उपाययोजनांची गरज आहे. पण याकडे कोणीच लक्ष देत नाही. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान होतंय, झाडांची कत्तल होतेय. तर दुसरीकडे नव्याने बांधलेले पूलही पडताहेत. बेशिस्त वाहनचालक, वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि वाढता रोडरेज यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.”
नेटकऱ्यांनी दर्शवली सहमती
ही पोस्ट आतापर्यंत १ लाख ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. तसंच, अनेकांनी प्रतिक्रिया देत या पोस्टमधील मतांशी सहमत असल्याचं वक्तव्य केलंय. वास्तविक, यापूर्वी अनेकदा शहर व्यवस्थापनावर चर्चा झाली आहे. राजकीय नेत्यांनी त्यावर मोठमोठी भाषणं केली आहेत. स्थानिकांनी पायाभूत सुविधांच्या अभावासाठी आंदोलनं केली आहेत. पण तरीदेखील परिस्थिती फारशी बदलली नाही, हे वास्तव आहे. किंबहुना, वाढत्या लोकसंख्येमुळे हे प्रश्न आणखी तीव्र होत चालल्याची भावना या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्येही पाहायला मिळतेय. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

