Pune Crime News : ‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आई-मुलावर गर्भपाताचा गुन्हा
इतकेच नाही, तर पोटातील बाळ मुलगी असल्याचं कळताच तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करून पोटातील अंकुर मारून टाकल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. हडपसरमधील शेवाळेवाडी येथे पी. एस. व्हिलामध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्यावर आता हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपाताचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे.
अवघ्या दोन महिन्यांतच सुखाचे दिवस संपले
19 मे 2019ला जतमध्ये या दोघांचा संसार सुरू झाला, पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच सुखाचे दिवस संपले. धनाजी यांनी पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आणि तिथूनच छळाचा घाणेरडा खेळ सुरू झाला. 2020 मध्ये जेव्हा पत्नी पहिल्यांदा गरोदर राहिली, तेव्हा तिच्या पोटातील जीवाचा कोणताही विचार न करता तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर सातव्या महिन्यात अंगावर बसून लाथाबुक्क्यांचा मारा करण्यात आला. पुढे 27 जानेवारी 2022ला मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. बाहेर झालेल्या कारवाईचा आणि अपमानाचा सगळा राग धनाजी यांनी घरात येऊन काढला आणि निष्पाप पत्नीचं डोकं फरशीवर आपटूनतिला रक्तबंबाळ केलं.
पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात
यानंतर त्यांची पुण्यात बदली झाली. मार्च 2025 मध्ये पत्नी दुसऱ्यांदा गरोदर राहिली. 13 मे रोजी धनाजी आणि त्यांच्या आईने तिला बळजबरीने एका अज्ञात गावातील शेतातल्या घरात नेलं आणि तिथे बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणी करवून घेतली. 19 मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचं समोर येताच या माय-लेकांच्या डोक्यात विकृती आली. गर्भपातासाठी पत्नीवर आणि तिच्या माहेरच्यांवर प्रचंड दबाव आणला गेला. पत्नीच्या वडिलांनी नकार देताच स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचा माज दाखवून धमक्या देण्यात आल्या. अखेर 23 मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात उरकला गेला.
तक्रार केली; म्हणून पुन्हा मारहाण
गर्भपातानंतर महिलेने पोलिस उपायुक्तांकडे पतीविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी धनाजी टोणे यांना सक्त शब्दांत समज दिली. याचा राग मनात ठेवून ‘तू तक्रार का केलीस,’ असं म्हणत टोणे यांनी पत्नीला मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद आहे. गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तात्काळ सुट्टी टाकून पळ फरार
या प्रकाराने या हैवान PSIच्या पत्नीची प्रकृती पार खालावली आणि त्या कशाबशा माहेरी पोहोचल्या. वरिष्ठांकडे तक्रार करूनही जेव्हा हा छळ थांबला नाही, तेव्हा त्यांनी थेट हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. आता हा गुन्हा मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक इरफान नदाफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, आपल्यावर कारवाई होणार याची चाहूल लागताच स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवणारे उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी तात्काळ सुट्टी टाकून पळ काढला आहे.

