► वृत्तसंस्था
बांकीपूर बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी तीन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी लगबग दिसून आली.
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त उमेदवार नीरज सिन्हा, जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर आणि जनशक्ती जनता दलाच्या वीणा मानवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रशांत किशोर यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
तर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच वीणा मानवी यांना झालेल्या अटकेमुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ‘जनसुराज्य’चे प्रशांत किशोर आणि भाजप उमेदवार नीरज सिन्हा मोठ्या संख्येने समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत दुचाकी आणि अन्य वाहनांचा मोठा ताफा होता.
समर्थकांची गर्दी, मिरवणुका आणि शक्तीप्रदर्शनामुळे बांकीपूरमधील राजकीय वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करायचे होते. दुपारी 12 वाजेपर्यंत एका तृतीयपंथी व्यक्तीसह एकूण 15 जणांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.
बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी सोमवारी सकाळी सोनपूर येथील प्रसिद्ध बाबा हरिहरनाथ मंदिराला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी प्रार्थना करत विजयासाठी आशीर्वाद मागितले.
या धार्मिक भेटीनंतर ते पाटण्याकडे रवाना झाले. बांकीपूर पोटनिवडणुकीतील जय-पराजयाचा निर्णय पूर्णपणे जनतेच्या हातात आहे. जनतेसमोर प्रामाणिकपणे पर्याय सादर करणे हे आमचे काम आहे. आता जनता ठरवेल की ते आम्हाला निवडतील की दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला, असे प्रशांत किशोर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
