Headlines

Prashant kishor remarks spark discontent among ncp leaders high voltage meeting at parth pawar residence; पार्थ पवारांच्या घरी हाय व्होल्टेज बैठक, प्रशांत किशोर यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल



म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे थंड पडली आहे. राज्यात पक्षाचे अस्तित्व ठळकपणे दिसत नाही. पक्षाचे विभागही फारसे कार्यरत नाहीत. समन्वयाचा अभाव असून तो वाढविण्याची गरज आहे’, अशा शब्दांत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना शनिवारी खडे बोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पक्षाच्या वाट्याला आलेल्या महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून राज्यभर संघटना सक्रिय करण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे समजते. किशोर यांच्या या राजकीय मांडणीदरम्यान पक्षातील दिग्गज नेत्यांनी शांतपणे सर्व मुद्दे ऐकून घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बैठकीच्या समारोपावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी, प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा, मतभेद विसरून सर्वांनी कामाला लागावे, असा सल्ला नेत्यांना दिल्याचे समजते. मात्र, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले. बैठकीनंतर तटकरे यांनी पक्षात फूट किंवा मतभेद असल्याच्या चर्चा निराधार असल्याचे सांगितले. ‘आमच्यात कधीही दुरावा नव्हता’, असे ते म्हणाले. लवकरच पक्षाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर आयोजित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीत तरुणाई आणि ज्येष्ठ नेत्यांमधील नेतृत्व संघर्ष वाढत असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. एरव्ही देवगिरी येथे होणारी मध्यवर्ती समितीची बैठक यावेळी खासदार पार्थ पवार यांच्या वरळी येथील निवासस्थानी झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, किशोर यांनी बैठकीत पक्षातील ज्येष्ठांना कटू वास्तवाची जाणीव करून दिली. विपरीत परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर पक्ष सुस्तावल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरांपासून राज्याच्या तळागाळापर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी ज्येष्ठांनी तरुणांसोबत काम करणे गरजेचे आहे. तरुणांचा सहभाग केवळ कार्यक्रमांत नव्हे, तर नेतृत्वातही दिसायला हवा, यावरही त्यांनी भर दिल्याचे समजते.

कोण उपस्थित?

या बैठकीला पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते.

‘त्यांचा सल्ला कशासाठी?’

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत राहिलेल्या आणि तीन ते चार दशके राजकारणात सक्रिय असलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना किशोर यांचे मार्गदर्शन रुचले नसल्याची चर्चा आहे. प्रतिकूल परिस्थितीत अनेक निवडणुका लढवून जिंकलेल्या नेत्यांना राजकीय रणनीतीकाराने धडे द्यावेत, याबद्दल काहींनी खासगीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ‘पक्षातील निर्णयप्रक्रिया आणि संघटनात्मक दिशा योग्य असती, तर बाहेरून असा सल्ला घेण्याची वेळ आली नसती’, असा सूरही काही नेत्यांनी खासगीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत