Headlines

Polycystic Ovary Syndrome(PCOS): काळजी करु नका; काळजी घ्या – polycystic ovary syndrome pcos symptoms causes and treatment



-डॉ. अश्विनी भालेराव-गांधी

पीसीओएसचे नवीन नामकरण आहे पीएमओस.
‘डॉक्टर, माझ्या मुलीला दोन-दोन, तीन-तीन महिने पाळी येत नाही. चेहऱ्यावर सतत मुरुमे येतात आणि वजनही वाढत आहे. इंटरनेटवर वाचलं, की तिला ‘पीसीओएस’ आहे. तिला पुढे मूल होईल ना?’

स्त्रीरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात असे प्रश्न आज जवळपास रोज ऐकायला मिळतात. गेल्या दोन दशकांत ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीसीओएस) या विकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. किशोरवयीन मुलींपासून ते प्रजननक्षम वयातील महिलांपर्यंत अनेक जणी या समस्येला सामोऱ्या जात आहेत. एके काळी हा केवळ ओव्हरीचा विकार मानला जात होता; मात्र गेल्या काही वर्षांतील संशोधनाने स्पष्ट केले आहे, की हा केवळ स्त्रीबीजकोषांचा आजार नसून संपूर्ण शरीरातील हार्मोन्स, चयापचय, प्रजननक्षमता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा विकार आहे. म्हणूनच अलीकडे काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी या विकारासाठी ‘पीएमओएस’ (पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम) हे नवे नाव सुचविले आहे. मात्र, सध्या पीसीओएस’ प्रचलित असल्याने लेखात त्याचाच वापर केला आहे.

‘पीसीओएस’ म्हणजे नेमके काय ?
सामान्यतः प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात स्त्रीबीजकोषामध्ये अनेक लहान ‘फॉलिकल्स’ तयार होतात. त्यांपैकी एक पूर्ण विकसित होऊन त्यातून बीज बाहेर पडते. यालाच स्त्रीबीजविमोचन म्हणतात. ‘पीसीओएस’मध्ये ही प्रक्रिया विस्कळित होते. अनेक ‘फॉलिकल्स’ तयार होतात; परंतु त्यांच्यापैकी कोणतीही पूर्ण विकसित होत नाही. परिणामी नियमित स्त्रीबीजविमोचन होत नाही आणि मासिक पाळीचे चक्र बिघडते. सोनोग्राफीमध्ये अशा लहान ‘फॉलिकल्स’ची माळ दिसते. त्यालाच ‘पॉलीसिस्टिक ओव्हरीज’ म्हटले जाते. मात्र, या फॉलिकल्स म्हणजे सिस्ट किंवा गाठी नाहीत. त्यामुळे ‘ओव्हरीमध्ये गाठी झाल्या आहेत,’ हा समज चुकीचा आहे. केवळ सोनोग्राफीवरून ‘पीसीओएस’चे निदान होत नाही. मासिक पाळीचा इतिहास, इतर लक्षणे, शारीरिक तपासणीचे निष्कर्ष आणि आवश्यक हार्मोनल तपासण्या यांचा एकत्रित विचार करूनच निदान केले जाते. ‘पीसीओएस’ असलेल्या प्रत्येक महिलेमध्ये सारखीच लक्षणे आढळत नाहीत. काहींची फक्त पाळी अनियमित असते, काहींना वजन वाढण्याचा त्रास होतो, काहींमध्ये मुरुमे किंवा चेहऱ्यावर अतिरिक्त केस वाढतात, तर काहींमध्ये गर्भधारणा होण्यास विलंब होतो.

हा विकार का होतो ?
आनुवंशिकता, हार्मोन्समधील असंतुलन, इन्सुलिन रेझिस्टन्स, वाढता मानसिक ताण, अपुरी झोप, अयोग्य आहार, शारीरिक निष्क्रियता आणि पर्यावरणीय घटक यांचा परस्परसंबंध या विकारामध्ये असतो. यातील इन्सुलिन रेझिस्टन्स हा महत्त्वाचा घटक आहे. शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम स्त्रीबीजकोषांवर होऊन पुरुषी संप्रेरकांचे (अँड्रोजेन्स) प्रमाण वाढते. परिणामी पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर मुरमे, केस येतात आणि स्त्रीबीजविमोचनात अडथळे निर्माण होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यांमुळे या विकाराची तीव्रता वाढू शकते. उदाहरणार्थ, दहावी-बारावीत असताना हा विकार बळावू शकतो. मात्र, याचा अर्थ असा नाही, की हा विकार फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळेच होतो. अनेक सडपातळ आणि नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांनाही ‘पीसीओएस’ होऊ शकतो.

‘पीसीओएस’कडे फक्त मासिक पाळी किंवा वंध्यत्वाचा विकार म्हणून पाहणे चुकीचे आहे. हा संपूर्ण शरीराच्या चयापचयावर परिणाम करणारा विकार आहे. वेळीच योग्य उपचार न झाल्यास पुढील आयुष्यात टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे, फॅटी लिव्हर, हृदयविकार, गर्भावस्थेतील मधुमेह किंवा गर्भाशयाच्या आतील अस्तराच्या असामान्य वाढीचा धोका वाढू शकतो. याचबरोबर मानसिक आरोग्यावर होत असलेल्या परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सारखे वजन वाढणे, मुरुमे, चेहऱ्यावर केस येणे किंवा गर्भधारणेची चिंता यांमुळे अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांच्यात नैराश्य किंवा चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘पीसीओएस’च्या उपचारांत मानसिक आरोग्याची काळजी तितकीच आवश्यक आहे.

‘पीसीओएस’चे निदान झाल्यावर अनेक मुली आणि कुटुंबियांमध्ये भीती निर्माण होते. ‘आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील का?’,‘मला मूल होईल का?,’ ‘हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का,’ असे अनेक प्रश्न मनात येतात. प्रत्यक्षात, योग्य वेळी निदान, योग्य उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैली यांमुळे ‘पीसीओएस’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार जीवनशैलीतील सकारात्मक बदल, हा ‘पीसीओएस’वरील पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा उपचार मानला जातो. औषधे आवश्यक असली, तरी ती जीवनशैलीतील बदलांची जागा घेऊ शकत नाहीत. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन या चार गोष्टी ‘पीसीओएस’च्या उपचारांसाठी आवश्यक आहेत.

ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, पुरेशी प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आहार अधिक उपयुक्त ठरतो. साखरयुक्त पेये, अति प्रक्रिया केलेले पदार्थ आणि वारंवार खाण्याची सवय कमी करणे फायदेशीर ठरते. ज्या महिलांचे वजन जास्त आहे, त्यांच्यामध्ये शरीराच्या वजनात केवळ पाच ते दहा टक्के घट झाली, तरी मासिक पाळी नियमित होणे किंवा स्त्रीबीजविमोचन नियमित होऊन गर्भधारणेची शक्यता वाढणे, यांसारखे महत्त्वाचे फायदे दिसून येतात.

‘पीसीओएस’मध्ये प्रत्येक महिलेला सारखी औषधे दिली जात नाहीत. उपचार तिची लक्षणे, वय, गर्भधारणेची गरज आणि इतर आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन ठरवले जातात. मासिक पाळी नियमित करण्यासाठी ‘प्रोजेस्टेरॉन’च्या गोळ्या किंवा संयुक्त गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि गर्भाशयाच्या आतील अस्तराचे संरक्षण होते. मुरुमे किंवा चेहऱ्यावर अतिरिक्त असलेल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार हार्मोनल औषधे किंवा त्वचारोगतज्ज्ञांच्या उपचारांचा उपयोग होतो. लेझरसारखे उपायही सुचवले जातात. इन्सुलिन रेझिस्टन्स, प्रीडायबेटिस किंवा टाइप-२ मधुमेहाचा धोका असल्यास ‘मेटफॉर्मिन’सारखी औषधे काही रुग्णांमध्ये फायदेशीर ठरू शकतात.

गैरसमजांपासून दूर रहा
‘या विकारामुळे मूल होऊ शकत नाही,’ असा अनेकांचा समज असतो. मात्र, प्रत्यक्षात हे सत्य नाही. ‘पीसीओएस’मध्ये स्त्रीबीजविमोचन नियमित होत नसल्यामुळे गर्भधारणा होण्यास विलंब होऊ शकतो; परंतु योग्य उपचारांमुळे बहुसंख्य महिलांना नैसर्गिकरीत्या किंवा आवश्यकतेनुसार उपचारांच्या मदतीने यशस्वी गर्भधारणा होते. स्त्रीबीजविमोचन घडवून आणण्यासाठी ‘लेट्रोझाॅल’ हे प्रथम पसंतीचे औषध मानले जाते. काही वेळा ‘क्लोमिफिन सायट्रेट’, ‘गोनॅडोट्रॉपिन’ इंजेक्शन्स किंवा ‘आयव्हीएफ’सारख्या सहायक प्रजनन तंत्रज्ञानाची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे ‘पीसीओएस’चे निदान म्हणजे मातृत्वाची आशा संपली, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

नियमित ‘फॉलोअप’ आवश्यक
‘पीसीओएस’ हा दीर्घकालीन विकार आहे. त्यामुळे लक्षणे कमी झाली, तरी नियमित वैद्यकीय तपासणी सुरू ठेवणे आवश्यक असते. रक्तदाब, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, वजन आणि कंबरेचा घेर यांची नियमित नोंद आणि मूल्यमापन केल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये अनियमित पाळी किंवा शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, स्वतःहून औषधे घेणे किंवा इंटरनेटवरील अपूर्ण माहितीच्या आधारे उपचार सुरू करणे टाळावे. आज ‘पीसीओएस’बद्दलची समज पूर्वीपेक्षा खूप व्यापक झाली आहे. हा केवळ मासिक पाळीचा किंवा ‘ओव्हरी’चा विकार नसून शरीराच्या हार्मोनल आणि चयापचय प्रक्रियांशी संबंधित आहे. म्हणूनच या विकाराकडे केवळ उपचारांच्या नव्हे, तर दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी, आवश्यक तेव्हा औषधोपचार आणि नियमित फॉलोअप यांच्या साह्याने बहुतांश स्त्रिया निरोगी आणि समाधानकारक जीवन जगू शकतात.
(लेखिका मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत