पोको कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित POCO F9 सीरिजच्या ग्लोबल लॉन्चिंगची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. येत्या 1 सप्टेंबर रोजी या सिरीज अंतर्गत POCO F9 Pro आणि POCO F9 Ultra हे दोन शक्तिशाली स्मार्टफोन सादर केले जातील. लीक झालेल्या माहितीनुसार, युजर्सना यामध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी हाय-एंड प्रोसेसर आणि मोठी स्टोरेज स्पेस पाहायला मिळू शकते.

स्मार्टफोन जगतात आपल्या परफॉर्मन्स-ओरिएंटेड उपकरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या पोको कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित POCO F9 सीरीझच्या अधिकृत ग्लोबल लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया मोहिमेद्वारे पुष्टी केली आहे की, येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी ही नवी फ्लॅगशिप सीरीझ जागतिक बाजारपेठेत सादर केली जाईल.
या सीरीझ अंतर्गत POCO F9 Pro आणि POCO F9 Ultra हे दोन शक्तिशाली मॉडेल्स ग्राहकांच्या भेटीस येणार असून, कंपनीने यावेळेस स्टँडर्ड F9 मॉडेल वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही नवी सीरीझ चीनमध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या Redmi K100 सीरीझची रीब्रँडेड आवृत्ती असण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक बाजारात 1 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता) एका भव्य डिजिटल इव्हेंटद्वारे या फोन्सवरील पडदा उठवला जाईल, असे ‘Gadgets Now’ ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (REF.)
क्वालकॉमचा प्रोसेसर आणि रॅम-स्टोरेज
पोकोने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, संपूर्ण POCO F9 सीरीझमध्ये क्वालकॉमच्या अत्यंत शक्तिशाली अशा Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट फॅमिलीचा वापर केला जाईल. अधिकृत माहितीनुसार, प्रीमियम मॉडेल असलेल्या POCO F9 Ultra मध्ये मूळ Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जाईल. तर दुसरीकडे, POCO F9 Pro मध्ये या चिपसेटची थोडी मॉडिफाइड आवृत्ती म्हणजेच Snapdragon 8 Elite Gen 5 ‘V सीरीझ’ पाहायला मिळेल. हा प्रोसेसर जड गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज हाताळण्यास सक्षम आहे. मेमरी फ्रंटवर, हे दोन्ही स्मार्टफोन 16 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512 GB पर्यंत उच्च गतीच्या UFS 4.1 अंतर्गत स्टोरेजसह सुसज्ज असतील, ज्यामुळे युजर्सना उत्तम स्पीड आणि भरपूर स्पेस मिळेल. (REF.)
संभाव्य डिस्प्ले, डिझाईन आणि ‘Bose’ ऑडिओ ट्युनिंग
लीक झालेल्या माहितीनुसार, या सीरीझमधील स्क्रीन फीचर्स अत्यंत उत्कृष्ट असणार आहेत. POCO F9 Pro मध्ये 6.59-इंचचा QHD+ OLED डिस्प्ले आणि Ultra मॉडेलमध्ये 6.85-इंचचा मोठा 2K फ्लॅट OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता असून, दोन्ही फोन्स 185Hz हाय-रिफ्रेश रेटला सपोर्ट करतील. डिझाईनच्या बाबतीत, F9 Pro फोन ‘ऑरोरा ग्रीन’ रंगात उपलब्ध असेल, ज्याचे फीचर म्हणजे हा फोन अंधारात चमकणारा असेल. तर F9 Ultra मॉडेल ‘डार्क चेरी’ या प्रिमियम ग्लास-फायबर फिनिश प्रकारात सादर केला जाईल. या दोन्ही फोन्सच्या मागील पॅनलवर ‘Sound by Bose’ ची ब्रँडिंग दिसली असून, पोकोने पहिल्यांदाच ऑडिओसाठी प्रख्यात ‘Bose’ कंपनीसोबत भागीदारी करत आहे.
कॅमेरा आणि बॅटरी बॅकअपची ताकद
फोटोग्राफीसाठी POCO F9 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड आणि 50 मेगापिक्सेलचा 5x ऑप्टिकल झूम देणारा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स मिळण्याची दाट शक्यता आहे. तर F9 Pro मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह आणि 3x टेलिफोटो लेन्स असू शकते. बॅटरी बॅकअपच्या बाबतीत पोकोने मोठी झेप घेतली असून, F9 Pro मध्ये 6,330mAh आणि Ultra मॉडेलमध्ये 8,050mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
भारत लाँचिंग आणि किंमत
पोको इंडियाने अद्याप या सीरीझच्या भारतातील एन्ट्रीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. गेल्या वर्षी कंपनीने F8 सीरीझ भारतात न आणता स्थानिक पातळीवर X-सीरीझचा विस्तार केला होता. मात्र, जागतिक बाजारातील आक्रमक किंमत धोरण पाहता, जर ही सीरीझ भारतात आली, तर ती वनप्लसआणि सॅमसंग सारख्या प्रीमियम ब्रँड्सना मोठी टक्कर देईल, असा अंदाज टेक वर्तुळात वर्तवला जात आहे.

