Oman Gujarat Pipeline: मागील ३ महिन्यांपासून मध्य पूर्वेत तणावाची स्थिती असून खनिज तेलासह नैसर्गिक वायूचे दर गगनाला भिडले आहेत. याचा भारताला मोठा फटका बसला आहे. यावर आता भारतानं रामबाण उपाय शोधला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील तणाव कायम असल्यानं इंधनाचा प्रश्नदेखील कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असलेली वाहतूक विस्कळीत झालेली असल्यानं जगभरात इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. भविष्यात अशा स्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी भारतानं रामबाण मार्ग शोधला आहे. गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या पलीकडे असलेल्या ओमानपासून गुजरातपर्यंत एका लांब पाईपलाईन टाकली जाणार आहे. या प्रकल्पाची घोषणा भारत ाकडून करण्यात आलेली आहे. अरबी समुद्रातून जवळपास २००० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या पाईपलाईनमधून भारताला गॅसचा पुरवठा होईल. या पाईपलाईनच्या माध्यमातून ओमान आणि गुजरात जोडले जातील. जागतिक पातळीवर निर्माण झालेला तणाव पाहता इंधन पुरवठ्यासाठी भारत खात्रीशीर पर्यायांवर काम करत आहे. India Nuclear Weapons: अण्वस्त्र धोरणात मोठा बदल; भारताकडून पहिल्यांदाच 12 ‘लाईव्ह’ अण्वस्त्र तैनात; अख्खा चीन टप्प्यात गेल्या तीन दशकांमध्ये या प्रकल्पाची अनेकदा समीक्षा करण्यात आली. पण त्यावरील प्रचंड खर्च, तांत्रिक अडचणी, व्यावसायिक अडथळे यांच्यामुळे ही योजना बारगळली. आता या प्रस्तावाला सहाय्य करणारा खासगी समूह SAGE कडून या प्रकल्पातील अभियांत्रिकी आव्हानांचं मूल्यांकन करण्यासाठी सागरी तळाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यासोबतच तांत्रिक आणि आर्थिक अभ्यासदेखील पूर्ण करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
किती खर्च येणार? या प्रकप्लासाठी जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे. ओमान-गुजरात डीप सी पाईपलाईन आतापर्यंतच्या खोल समुद्र मार्गांपैकी एक असेल. या माध्यमातून ओमानकडून भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा होईल. ही पाईपलाईन अस्तित्वात आल्यास आखाती देशांकडून भारताला थेट इंधन पुरवठा होत राहील. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवरील भारताचं अवलंबित्व कमी होईल.
प्रकल्पाचं महत्त्व काय? इंधनाच्या बाबतीत भारत अन्य देशांवर अवलंबून आहे. भारत मोठ्या प्रमाणावर खनिज तेल, नैसर्गिक वायू आयात करतो. एलएनजीसाठी भारत परदेशांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. यातील एक मोठा भाग आखाती देशांमधून येतो. पर्शियन आखात आणि अरब समुद्र जोडणारा मार्ग अतिशय अरुंद आहे. हा मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी म्हणून ओळखला जातो. या भागातील वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढतात. आखाती देशांवरील भारताचं अवलंबित्व अधिक असल्यानं त्याचा भारताला बसणारा फटकाही अधिक आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा