Headlines

Nitin gadkari big statement give opportunities to the new generation take care of health; आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान


नागपूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील जुन्या आठवणी सांगतानाच आरोग्य, जीवनशैली आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘आता मी जास्त काम करू शकत नाही. नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे,’ असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच, ‘तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा आनंद घेता येतो. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग?’ असा सवालही त्यांनी केला. काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे आयोजित एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या राजकीय कार्यकाळातील साधी जीवनशैली आणि सध्याच्या बदललेल्या दिनचर्येबाबत सांगितलं.

गडकरी म्हणाले की, “राजकारणात सुरुवातीच्या काळात आपलं आयुष्य अतिशय अनऑर्गनाइज्ड, अनडिसिप्लिन आणि अनियमित होतं. पक्षाचं काम करताना कुठे स्कूटरवर तर कुठे गाडीने जायचो. त्या काळात पक्षाकडे आजच्यासारखी साधनसंपत्ती नव्हती. त्यावेळी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडे जुनी अॅम्बेसेडर कार होती. नेते विमानाने किंवा रेल्वेने आले तर त्यांना आणण्यासाठी गाडीची सोय व्हावी म्हणून त्यांना अध्यक्ष करा असा आमचा काळ होता,” अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.

‘माझ्याकडे आधी लुना होती, नंतर स्कूटर आली. विद्यार्थीसेनेत असताना आम्ही एकाच स्कूटरवर चौघेजण बसायचो. चौथा व्यक्ती नंबर प्लेटवर हात ठेवायचा, म्हणजे पोलिसांना नंबर दिसणार नाही,’ असा काळ होता, कारण मजबुरीही होती. असं सांगत गडकरी यांनी त्या काळातील परिस्थितीवर मिश्कील भाष्य केलं. त्यावेळी जीवनशैली अनऑर्गनाइज्ड, अनडिसिप्लिन होतं, शिस्त नव्हती, असंही त्यांनी मान्य केलं. पक्षाचं काम करताना समोसा खायचो आणि झोपून जायचो, असं सांगत त्यांनी जुन्या दिवसांची आठवण सांगितली.

कोरोनाच्या काळानंतर मात्र आपल्या जीवनशैलीत मोठा बदल केल्याचं गडकरी यांनी सांगितलं. “कोविडपासून मी स्वतःला दुरुस्त केलं. आता रोज सकाळी उठल्यानंतर अडीच तास व्यायाम, प्राणायाम करतो. सकाळी इतर कोणतंही काम करत नाही, रोज सकाळी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि प्राणायाम केला पाहिजे. तब्येत चांगली असेल तरच जीवनातील इतर गोष्टींचा आनंद घेता येतो. तब्येतच बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य किंवा ज्ञान यांचा कोणताही उपयोग नाही.”

यावेळी नितीन गडकरी यांनी नव्या पिढीला संधी देण्याची गरजही व्यक्त केली. ते म्हणाले, खरं म्हणजे मी काही प्रेरणास्तोत्र वगैरे काही नाही. “आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. त्यावेळी करू शकलो, मात्र आता माझं पार्टिसिपेशन कमी झालं. मी सगळ्यांना सांगितलं नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे, नवीन लोकं आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि हळू हळू पुन्हा काम वाढत आहे. वाढलेल्या कामामधून अजून जास्त वाढत आहे. हे काम इतकं वाढेल की महाराष्ट्रातील एकाही आदिवासी गावात अंधार राहणार नाही, तिथं विकासाचा प्रकाश निर्माण होईल. मिळालेलं आयुष्य उत्तम जगता आलं पाहिजे. स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचा आयुष्य चांगलं जगण्याकरिता मदत केली पाहिजे. हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचे असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं हे विधान समोर आल्याने त्याकडे वेगळ्या राजकीय अर्थाने पाहिले जात आहे