Nepal Flood: नेपाळ हा छोटासा देश असल्याने त्या सरकारला एकट्याने हे आव्हाने पेलणे अवघड दिसते. मात्र, भारतासह जगभरातून मदतीचा ओघ जपानकडे येत आहे.

चार जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले असून, काठावरील अनेक गावांचे नकाशावरील अस्तित्वच पुसून गेले आहे. याच नद्या पुढे गंगेला मिळत असल्याने, आपल्याकडे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. माध्यमे आणि समाजमाध्यमांतून प्रसृत झालेले या घटनेचे व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवतात. त्यामागे नैसर्गिक प्रकोप असला, तरी हवामान बदलांचाही त्यात नक्कीच वाटा आहे. भारतीय सीमांलगत भागातील या दुर्घटनेतून निसर्गाने हा मानवाला दिलेला इशाराच म्हणावा लागेल.
तिबेट आणि नेपाळच्या सीमेवरील या भागात दरडी आणि एका हिमनदीचा भाग कोसळून भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांच्या खोऱ्यात हाहाकार उडाला. हा भाग अत्यंत दुर्गम-अरुंद असून, नद्यांचे उतारही अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे तेथून वाहणाऱ्या पाण्यापुढे कोणतेही पूल-इमारती टिकणे अशक्य होते. ही नदी नेपाळमध्ये नारायणी आणि भारतात गंडक नदी म्हणून ओळखली जाते आणि पुढे गंगेला मिळते. त्यामुळेच या लोंढ्याचा जोर काहीसा ओसरला असला, तरी उत्तर बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काठावरच्या जिल्ह्यांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कैलास-मान सरोवर यात्रेच्या मार्गात हा परिसर आहे; तसेच पावसाळ्याच्या उत्तरार्धात स्वच्छ हवामानाच्या शक्यतेमुळे गिर्यारोहण मोहिमांसाठी तो प्रसिद्ध असल्याने तेथे पर्यटक व यात्रेकरूंची संख्या मोठी होती. या दुर्घटनेबाबत चीनने वेळीच सावधगिरीचा इशारा न दिल्याचा आरोप काही नेपाळी अभ्यासकांकडून झाला; मात्र नेपाळच्याच हद्दीत दरडी कोसळल्याचे चीनचे म्हणणे आहे.
वाद काहीही असले, तरी या दुर्घटनेतून धडा घेऊन आंतरराष्ट्रीय पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याची गरज असून, भारतानेही त्यात सहभागी होणे, ही काळाची गरज आहे. आता नागरिक आणि पर्यटकांचे बचावकार्य, हा तातडीचा टप्पा असून, सर्वत्र निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य साफ करणे हे मोठे आव्हान आहे. त्यानंतर या उद्ध्वस्त झालेल्या गावांची उभारणी, रस्ते-वीजकेंद्रे अशा पायाभूत सुविधा पुन्हा उभ्या कराव्या लागतील.
नैसर्गिक प्रकोप म्हणून अशा दुर्घटनांमागील अन्य कारणे नजरेआड करण्याजोगी नक्कीच नाहीत. गेल्या काही काळात हवामान बदलांमुळे हिमालयाच्या परिसरातील तापमान वाढत आहे. हिमनग- हिमनद्या ठिसूळ होत आहेत. त्यातून अनेकदा अचानक पूर (फ्लॅश फ्लड), दरडी कोसळणे व अतिवृष्टीसारख्या घटनाही घडल्या आहेत. जोडीने हिमालयाच्या कुशीत रस्तेनिर्मिती, जलविद्युत प्रकल्प आणि नद्यांचे प्रवाहसुद्धा अडवले जात आहेत. त्यासाठी रस्तेरूंदी, सुरुंगस्फोट आणि उत्खननामुळे कमकुवत झालेल्या पर्वतांमधून दरडी कोसळतात.
भारतातही केदारनाथ किंवा चमोलीसारख्या दुर्घटनांच्या आठवणी ताज्या आहेत. या घटनांमधून योग्य धडे घेण्याची वेळ आली आहे. विकासाचा अट्टहास पर्यावरणाचा नाश करून अंतिमत: मानवाच्याच मुळावर उठतो, याची साक्ष देणाऱ्या या दुर्घटना आहेत. त्यामुळे जंगलतोड, खोदकाम आणि नद्यांच्या काठी अनियोजित विकास यांचा फेरविचार केला पाहिजे. हिमालयाच्या परिसरातील वीज प्रकल्पांचे तातडीने सुरक्षा ऑडिट आणि तातडीने सावधानतेचे इशारे देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. निसर्गावर मात केल्याचा आनंद क्षणिक असतो आणि त्याला निसर्गाने दिलेले उत्तर परवडणारे नसते, याचे भानच मानवजातीला तारू शकेल.

