Navi Mumbai Student Drowns During Karjat Field Trip: कॉलेजच्या फिल्ड ट्रिपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या घणसोलीतील एका १८ वर्षीय तरुणाचा कर्जत येथील पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

खारघर येथील भारती विद्यापीठ कॉलेजचा विद्यार्थी असलेला आर्यन आपल्या पाच मित्रांसह प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रिपसाठी मंगळवारी कर्जत परिसरात गेला होता. काम संपवून सर्व मित्र परतत असताना पळसदरी भागात त्यांच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाला. गाडी दुरुस्त करण्यासाठी दोन मित्र मेकॅनिकला आणण्यासाठी खोपोली येथे गेले होते. यावेळी आर्यन आणि त्याचे इतर दोन मित्र पळसदरी धरण परिसरात थांबले होते. यावेळी आर्यनला पोहोण्याचा मोह न आवरल्याने आर्यन धरणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पाण्यात दिसेनासा झाला.
Navi Mumbai महापालिकेत ACBची मोठी कारवाई! 42 हजारांची लाच घेताना उपायुक्तांना रंगेहाथ पकडलं
या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी स्थानिक शोध पथकांच्या मदतीने मंगळवारी रात्रभर बेपत्ता आर्यनचा शोध घेतला. परंतु अंधारामुळे त्यांना यश आले नाही. बुधवार सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. सकाळी ८.४५च्या सुमारास आर्यनचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला.
Navi Mumbai News: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली! चार प्रवासी अडकल्याने खळबळ; सकाळच्या गर्दीत प्रवाशांचा खोळंबा
नदीत रिक्षा कोसळून चालकाचा मृत्यू
वसई : तालुक्यातील नायगाव पूर्व येथील चिंचोटी परिसरात रिक्षा अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळल्याने ५६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. नालासोपाऱ्यात कार विहिरीत कोसळल्याची घटना ताजी असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. राजेंद्र दुर्बल भारद्वाज असे मृत चालकाचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ते रिक्षा घेऊन घरी परतत असताना रिद्धी इंडस्ट्रीजसमोर रिक्षा रस्त्यालगतच्या चिंचोटी येथील तुंगारेश्वर नदीपात्रात जाऊन पलटी झाली. नदी सध्या आटलेली असली, तरी अपघातात भारद्वाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

