Nashik Accident: अवघ्या १३ दिवसांपूर्वीच कन्यारत्ना झाले. मुलीसोबत वेळ घालवायचा म्हणून बाप सुट्टीवर आला अन् वाईट घडलं. अपघातात जवानाचा करुण अंत. अख्खं गाव हळहळलं.

प्रवीण आव्हाड हे भारतीय लष्करात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात ते कर्तव्यावर होते. कुटुंबातील ते एकुलते एक चिरंजीव होते. अवघ्या १३ दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले होते. नवजात कन्येला पाहण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी ते ७५ दिवसांच्या दीर्घ सुट्टीवर गावी आले होते.
Nashik Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना
रविवारी (दि. १४) रात्री कामानिमित्त नांदूर शिंगोटे येथे गेलेले प्रवीण आव्हाड हे दुचाकीने खंबाळेकडे परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कन्यारत्न प्राप्तीचा आनंद अजून ओसरलाही नव्हता, तोच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने आई-वडील, पत्नी आणि कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. गावासह संपूर्ण परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दोडी पाटीजवळील दुभाजक हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.
Nashik News : नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर नेण्याची तयारी, फोटोसाठी भाजप शहराध्यक्षांनी स्टेअरिंग धरलं, बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …
प्रवीण आव्हाड यांच्या पार्थिवावर खंबाळे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय लष्करातील अधिकारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण यांच्या पत्नी पूजा, आई जिजाबाई, वडील भाऊसाहेब आव्हाड आणि अन्य कुटुंबीयांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्करी मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

