Headlines

Nagpur News: भटक्या जनावरांची समस्या सुटणार ; नंदग्राम गो- आश्रय प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण


Nagpur News: नागपूर येथे वाठोड्यात नंदग्राम गो-आश्रय प्रकल्प सुरू करण्यात आला असून भटक्या जनावरांच्या निवारा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यापैकी ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भटक्या जनावरांना गो-आश्रय प्रकल्पाद्वारे आश्रय आणि नागरिकांना होणारा मुक्त जणावरांचा त्रास यावर हा प्रकल्प योग्य ठरणार आहे.

_भटकी जनावरे
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा प्रतिनिधी,नागपूर: नागपूरशहरातील भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागपूर महापालिकेचा वाठोडा येथील ‘नंदग्राम’ गो-आश्रय प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ८०.७५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात प्रस्तावित ७० गोठ्यांपैकी ६९ गोठ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील भटक्या जनावरांना पकडून येथे ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

पशुवैद्यकीय रुग्णालय, आरसीसी प्रशासकीय इमारत कामे पूर्ण

महापालिकेच्या प्रकल्प-३ विभागाच्या अहवालानुसार, या प्रकल्पातील पशुवैद्यकीय रुग्णालय, आरसीसी प्रशासकीय इमारत आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या संरक्षक भिंत तसेच १८ आणि २४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत.

जनावरांचा संचार , नागरिक त्रस्त

नागपुरात भटक्या जनावरांची समस्या गेल्या काही वर्षांत गंभीर बनली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये जनावरे मुक्तपणे फिरताना दिसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि अस्वच्छतेचे प्रश्ननिर्माण होत आहेत. अधिकृत गो-आश्रय केंद्रांची कमतरता असल्याने महापालिकेला या जनावरांविरोधात प्रभावी कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.

‘नंदग्राम’ प्रकल्पाला विशेष महत्त्व

महापालिकेच्या सर्वेक्षणात शहरात १ हजार १७१ गोठे आढळले आहेत. त्यापैकी १ हजार ४३ गोठे अनधिकृत असल्याचे पुढे आले आहे. सध्या शहरात केवळ ५० नोंदणीकृत गोशाळा आहेत. या पार्श्वभूमीवर ‘नंदग्राम’ प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील भटक्या जनावरांना पकडून येथे हलविणे तसेच अनधिकृत गोठ्यांवर कारवाई करणे महापालिकेला अधिक सुलभ होणार आहे.प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातील भटक्या जनावरांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra TimesMultimodal Tunnel : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, BMC चा मल्टीमोडल बोगदे प्रोजेक्ट, पुढील 30 वर्षांच्या ट्राफिकनुसार स्ट्रॅटेजी

इतर प्रकल्पही अंतिम टप्प्यात

महापालिकेचे आणखी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पही प्रगतीपथावर आहेत. महाल येथील १०७.१८ कोटी रुपये खर्चाच्या ‘श्रीमंत राजे रघुजीराव भोसले टाउन हॉल’ प्रकल्पातील आरसीसी इमारत आणि बाह्य क्लॅडिंगचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीची कामे सुरू आहेत. या प्रकल्पाला पूर्णत्वासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Maharashtra TimesPune Crime : तळेगाव स्टेशन पार्किंग कारशेडमध्ये बारामतीच्या तरुणीसोबत सामूहिक कुकर्म, दोघा नराधमांना नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप

अंतिम टप्प्यातील कामे सुरू

मोमिनपुरा येथील १५.६० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे आरसीसी, विटांचे बांधकाम, प्लास्टर आणि फ्लोअरिंगची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या अंतिम टप्प्यातील विद्युत व इतर लहान कामे सुरू आहेत. दरम्यान, महाल येथील १८.१५ कोटी रुपये खर्चाच्या स्व. प्रभाकरराव दटके रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू आहे.

ऑक्टोबर २०२४मध्ये कार्यादेश देण्यात आला असला तरी सुधारित बांधकाम आराखड्याला नगररचना विभागाची मंजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामांना अद्याप पूर्ण गती मिळालेली नाही

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा