Nagpur Crime News : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड तथा गुन्हेगार अक्षय वंजारीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचा फोन आला अन् घात झाला
25 ऑगस्ट मंगळवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अक्षय वंजारी हा काही मित्रांसोबत नंदनवन परिसरातील सोमरस बारमध्ये बसला होता. याचदरम्यान त्याला पत्नीचा फोन आला. फोन आल्यानंतर तो बारमधून बाहेर आला. मात्र, तो बाहेर येण्याची वाट पाहत असलेल्या हल्लेखोरांनी त्याचावर हल्ला चढवला. अक्षय बारच्या बाहेर येताच वंदना लांजेवार या महिलेनं त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. डोळ्यांत मिरची पावडर गेल्यानं अक्षयला काहीच दिसत नव्हतं. याच संधीचा फायदा घेत प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि त्यांच्या साथीदारांनी अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी अक्षयने तेथून पळ काढत पुन्हा बारच्या वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. बारमध्ये पोहोचल्यानंतर त्याने मित्रांना बाहेर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे मित्रही खाली आले. मात्र, हल्लेखोरांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला.
लोखंडी हत्याराने अक्षयवर हल्ला
यावेळी प्रदीप आखरे याने लोखंडी हत्याराने अक्षयवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तर प्रशांत आखरे आणि सूरज लांजेवार यांनी चाकूने त्याच्यावर वार केले. इतर आरोपींनीही अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अक्षयवर हल्ला होत असल्याचं पाहून त्याचा मित्र अश्विन रहांगडाले याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी अश्विनवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अक्षय गंभीर जखमी झाल्यानंतर अश्विनने त्याला दुचाकीवरून तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान बुधवारी 26 ऑगस्ट रोजी अक्षयचा मृत्यू झाला.
हेरगिरीच्या संशयातून हल्ला?
अक्षय वंजारीच्या हत्येमागे हेरगिरीचा संशय असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी सूरज लांजेवारचा भाऊ आकाश याला चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. या अटकेमागे अक्षय वंजारीने पोलिसांना माहिती दिल्याचा सूरजला संशय होता. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून अक्षयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज लांजेवार, सूरजची आई वंदना लांजेवार, प्रशांत आखरे आणि हार्दिक पालनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रदीप आखरेसह आणखी तीन आरोपी फरार आहेत. तर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
Sanjana Agarwal : खूप गिल्टी वाटतंय, रक्षाबंधनाला केतनच्या आठवणीत संजनाला अश्रू अनावर, सियाला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटचं कारण सांगितलं
मृतक अक्षय वंजारी याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नंदनवन परिसरातील या हत्याकांडामुळे नागपुरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण आणि हत्येचा कट कधीपासून रचला होता? याचा नंदनवन पोलीस पुढील तपास करत आहेत.

