Headlines

Murder case in nagpur after chief ministers event argument over 10 rupee tea; मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; १० रुपयांचा चहा ठरला कारणीभूत


Nagpur News: या धक्कादायक घटनेनंतर आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nagpur crime
मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात खून(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेच्या सुदर्शन समाजासाठीच्या फ्लॅट योजनेच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम पार पडलेल्या परिसरालगतच काही तासांत खुनाची धक्कादायक घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारे पेट्रोल पंपाजवळ अवघ्या १० रुपयांच्या चहाच्या पैशांच्या वादातून चहाविक्रेत्याने ग्राहकाच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृतकाची ओळख मनोज विश्वनाथ यादव (रा. नागपूर) अशी असून तो डेकोरेशनचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनाचा चालक होता. तर आरोपी कैलास गणवीर याला कपिलनगर पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज यादव हा सहारे पेट्रोल पंपाजवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहाचे १० रुपये देण्याच्या कारणावरून त्याचा आणि चहाविक्रेता कैलास गणवीर यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपीने धारदार चाकूने मनोजच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या मनोजचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या परिसरात हा खून झाला, त्याच परिसरात काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेच्या सुदर्शन समाजासाठीच्या फ्लॅट योजनेच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर काही तासांतच त्याच परिसरात भरदिवसा खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर अल्पावधीतच घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा