Headlines

MPSC Paper Leak: किडलेल्या यंत्रणेचे वर्तमान – mpsc drug inspector paper leak scam special explainer


MPSC Paper Leak: वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या, आयुष्यातील मौल्यवान वर्षे स्पर्धा परीक्षांसाठी वेचणाऱ्या तरुणांचा आयोगावरील विश्वास असा वारंवार डळमळीत होत असेल, तर त्याचे परिणाम एका भरतीपुरते मर्यादित राहत नाहीत.

mpsc-paper-leak-under-secretary-officers-arrested
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
देशभर गाजलेल्या ‘नीट’नंतर महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटले होते. आता त्याच पावलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पाऊल टाकल्याचे दिसते. आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीचे पेपर प्रेयसीला देण्यासाठी एका महाभागाने फोडल्याने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करावी लागणे, ही घटना राज्यातील स्पर्धा परीक्षा यंत्रणेच्या गाभ्यालाच हादरवणारी आहे. या प्रकरणात अटक झालेल्या सहा जणांत आयोगाचे तीन अधिकारीही आहेत, यावरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. उपसचिवपदावरील अधिकाऱ्याला या प्रकरणात अटक होणे यातून आयोगाची अंतर्गत यंत्रणा किती किडलेली असेल, याचा अंदाज येतो. सुरुवातीला हे प्रकरण एका प्रेमप्रकरणापुरते मर्यादित असल्याचे वाटत होते.

एका प्रियकराने प्रेयसीला परीक्षेत चांगले गुण मिळावे यासाठी आयोगातील कर्मचाऱ्याशी संधान साधून पेपर फोडले. मात्र, पुढे संबंधित तरुणीने नकार दिल्यावर त्यानेच हे प्रकरण उघड केल्याची कथा पुढे आली. पण तपास जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसे हे प्रकरण केवळ प्रेमकहाणीपुरते मर्यादित नसल्याचे उघड होत आहे. एकाच उमेदवाराला पेपर मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला, तरी विरोधी पक्षांतील नेत्यांनी याबाबत केलेले आरोप गंभीर आहेत. या पेपरफुटीत लाखोंची उलाढाल झाल्याचे आरोप आता होत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही यात आयोगातील व्यक्तीचाच हात असल्याची शंका उघडपणे बोलून दाखवली आहे.

या प्रकरणात राजकीय आरोपप्रत्यारोपांची राळ आता प्रचंड प्रमाणात उडणार असली तरी या गोंधळाचा फटका ज्या निर्दोष परिक्षार्थींना बसला आहे, त्यांच्या भविष्याचे काय? या परीक्षेत उत्तीर्ण होऊन, जुलैमध्ये जवळपास पाचशे उमेदवारांच्या मुलाखती पार पडून तात्पुरती गुणवत्ता यादीही जाहीर झाली होती. आता ती संपूर्ण प्रक्रियाच रद्द ठरवावी लागली.

या देशात अभ्यास, मेहनत, ज्ञान यांना काही किंमत आहे की नाही, हा प्रश्न तरुण पिढीच्या मनात सतत उद्भवू लागला, तर त्याचे देशाच्या भविष्यावरच गंभीर परिणाम होतील. प्रचंड वाढलेल्या बेरोजगारीतून नोकरीसाठी वाट्टेल ते करायला तयार होणारी ही मानसिकता बदलायची असेल तर प्रचलित शिक्षण व्यवस्थेतच मूलभूत परिवर्तन करणे गरजेचे ठरते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा