त. भा. प्रतिनिधी पुणे
महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता हळूहळू ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, राज्यातील रेड अलर्ट हटला असून, कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, त्याचे न्यून दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर झाले आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेशकडे सरकणार असून, येत्या 24 तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होणार आहे. गुजरात ते मध्य केरळच्या दरम्यान हवेचा दबाव कायम आहे.
बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी
राजस्थान व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव आता कमी होत असून, हे वारे आता उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे देशात उत्तरेकडील राज्यात पावसाचा प्रभाव वाढणार आहे. मंगळवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात पावसाचा प्रभाव होता. पहाटेपर्यंत अनेक भागात पावसाची तीव्रता कायम होती. सकाळनंतर मात्र थांबून थांबून पावसाने हजेरी लावली.
मध्येच जोरदार सरी बरसत असल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याचे तळे साठले. लोणावळा, तळेगाव पट्ट्यातदेखील पहाटेपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. दिवसाही पावसाने या भागाला झोडपून काढले. या भागातील धरणे भरली असून, नद्यादेखील ओसंडून वाहत आहेत. देहू, आळंदीत इंद्रायणी नदी दुथडी भऊन वाहत असल्याने वारकऱ्यांनी पुण्यात थांबूनच वारीत सहभागी होण्याची सूचना देण्यात आली आहे. मिसींग लिंक, पुणे मुंबई महामार्ग तसेच रेल्वेट्रॅकवरील दरड हटविण्यात आल्याने दोन्ही शहरांमधील वाहतूक मंगळवारी पूर्ववत झाली.
पुण्यात पावसाची उसंत
पुणे शहर व परिसरात सकाळपासून पावसाने उसंत घेतली. दोन दिवसाच्या जोरदार पावसानंतर सकाळपासून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या. चिंचवड, पाषाणमध्ये पावसाची तीव्रता अधिक होती. काही मिनिटे सूर्यनारायणाचेदेखील दर्शन शहरांत झाले. पावसामुळे वाहतूक व्यवस्था मंदावली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सखल भागातील पाणी हळूहळू ओसरत आहे. खडकवासला धरण 76 टक्के भरल्याने दुपारच्या सुमारास धरणातून पाणी सोडण्यात आले.
घाट भागात जोरदार पाऊस
दरम्यान, घाट भागाला गेल्या 24 तासांत पावसाने झोडपले. लोणावळा 620, दवडी 688, शिरगाव 420, ताम्हिणी 520, भिरा 512, डुंगरवाडी 423 मिमी पावसाची नोंद मंगळवारी सकाळपर्यंत झाली. दरम्यान, या भागातील पाऊसही हळूहळू कमी होणार आहे.
सातारा, घाट भागात ऑरेंज अलर्ट
बुधवारनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्रदेखील उत्तर प्रदेशकडे सरकत असल्याने आता उत्तरेकडील राज्यात पावसाचा प्रभाव वाढणार आहे. बुधवारी पुणे, सातारा घाट भागात ऑरेंज अलर्ट आहे, तर कोकण पट्ट्यात मध्यम ते तीव्र स्वऊपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसेल.
बुधवारी पुणे, सातारा घाट ऑरेंज अलर्ट तर यलो अलर्ट (मध्यम ते तीव्र पाऊस)
रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, पालघर, नाशिक घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी असणार आहे.
