Headlines

Mohan Joshi : ‘स्वतः माल भरायचो आणि उतरवायचो’, नाटकासाठी सोडली नोकरी, सुरू केला टेम्पोचा व्यवसाय; मोहन जोशींनी सांगितला संघर्ष काळ


Mohan Joshi Struggle : मोहन जोशी यांनी नाटकासाठी नोकरी सोडलेली आणि घर चालवण्यासाठी त्यांनी टेम्पोचा व्यवसाय सुरू केलेला. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.

Mohan Joshi On Struggle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मोहन जोशी यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, मोहन जोशी यांचा इंडस्ट्रीतील प्रवास सोपा नव्हता. नाटकाच्या वेडापायी मोहन जोशी यांनी नोकरी सोडलेली. नुकत्याच एका मुलाखतीत मोहन जोशी यांनी त्यांचा संघर्षकाळ सांगितला आहे.

मोहन जोशी यांनी सांगितला संघर्षकाळ

मोहन जोशी म्हणाले की, ‘मी किर्लोस्करमध्ये कामाला होतो. तिथे खेर साहेब होते. माझ्या खूप सुट्ट्या व्हायच्या. तेव्हा मी ‘घरोघरी हीच बोंब’ नावाचं शरद तळवळकरांचं नाटक करायचो. त्याचे खूप प्रयोग व्हायचे. २८ दिवसांचा कोकण दौरा होता. २८ दिवस करायचं काय, पत्र पाठवायचं माझी आजी वारली, मी इथे तेरावं घातल्याशिवाय येऊ शकत नाही. तेरा दिवस सुट्टी. तेरा दिवस संपले, चौदाव्या दिवशी आजी वारली, तिचं तेरावं, परत सुट्टी २६ दिवस झाले, परत आजी वारली. सर म्हणाले, ‘अरे तुमच्या आज्या तरी किती आहेत.’ मी म्हटलं, तीन आहेत. तिन्ही गेल्या, वडिलांची आई, आईची आई आणि आईची बहिण. ते म्हणाले, ‘एक काम करा. तुम्ही बंडल मारताय, खोटं बोलताय मला माहितीये. मी तुम्हाला जाहिरात दाखवतो.’ जाहिरात दाखवली. मला म्हणाले, ‘राजीनामा द्या नाहीतर नोकरी करा.’ म्हटलं मी राजीनामा देतो. त्याच दिवशी राजीनामा दिला आणि घरी आलो.’

Maharashtra TimesRadhika Deshpande : ‘करकचून बांधलेली कंचुकी घातलीस, समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं, जाहिरातीत त्याला भाऊ म्हटलं नाहीस’, क्रितीवर संतापली मराठी अभिनेत्री
‘नुकतंच आमचं लग्न झालं होतं आणि मुलगीही झाली होती, त्यामुळे जबाबदारी वाढली होती. म्हटलं मी राजीनामा दिला. आता करणार काय? माझ्या डोळ्यांसमोर अंधार होता. मला काही सुचलं नाही. माझा मोठे भाऊ इंजिनिअर होता. तो मार्गदर्शक. तो म्हणाला, ‘सोडली नोकरी, काळजी करू नको. ट्रान्सपोर्ट लाइन सुरू कर.’ म्हटलं गाडी? गाडीची किंमत ९७,००० होती. तर म्हणाला, ‘तू पैसे जमव, काय कमी पडले तर मी देतो.’ सासूबाई WDC मध्ये होत्या. त्यांनी अकरा हजार दिले, साडू बँक ऑफ बडोदामध्ये होता. तिथून लोन काढलं. तीन हजार दिले आणि गाडी घेऊन आलो. माझा एकही पैसा नाही. गाडी आणली मलेरिया झाला, महिनाभर आजारी, महिनाभर घरीच. टेम्पो घरीच.’

देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला

‘नाटक सुरू होतं, प्रयोग तुफान होते. ७५ रुपये नाईट होती. पैसे येत होते पण त्यात संसार भागत नव्हता. मीच ड्राइव्ह करायचो, त्यानंतर पुढच्या ४ वर्षात मी आणखी २ टेम्पो विकत घेतले. मी स्वत: माल भरायचो, उतरवायचो, टेम्पोवर ताडपत्री देखील बांधायचो. लोडेड गाडी मी बाहेर लावायचो, एक सीन करायचो आणि सांगायचो मी आलोच असं म्हणायचं आणि गाडी घेऊन बेळगावला जायचो. बेळगाववरून बालगंधर्वला जायचं, प्रयोग करायचा आणि दुसऱ्या दिवशी तालमीला यायचो.’ असं मोहन जोशी यांनी शेवटी सांगितलं. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मोहन जोशी बोलत होते.