Headlines

Modhera Sun Temple: मोढेराचं अद्भूत सूर्यमंदिर – modhera sun temple- its geographical and astronomical features and its connection to 21st june


-वासुदेव कोल्हटकरभारतातील विशिष्ट भौगोलिक स्थानी बांधलेल्या मोढेरा येथील सूर्यमंदिराची माहिती या लेखात करून घेऊ. प्रथम मंदिराचा थोडा इतिहास आणि भौगोलिक स्थान याविषयी पाहू या. हे मंदिर सोळंकी राजा भीमदेव (इ.स. १०२२ ते १०६३) याच्या कारकिर्दीत बांधलेले आहे असे मानले जाते. हे मंदिर सोळंकी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. अतिशय समृद्ध अशा प्रकारचे हे स्थापत्य म्हणता येईल. हे मंदिर नेमके पूर्वाभिमुख आहे. गुजरातमधील मेहेसाणा जिल्ह्यातील बेचराजी या तालुक्यात मोढेरा येथे पुष्पावती नदीच्या काठी हे मंदिर आहे. सूर्यमंदिराचे अक्षांश २३.५८३८अंश (२३अंश ३५’ १.६८”) उत्तर एवढे आहेत. अर्थात, हे मंदिराचे स्थान भारताच्या मध्यातून जाणाऱ्या कर्कवृत्ताच्या किंचित उत्तरेला कर्कवृत्तापासून लंब रेषेत साधारण १६ कि.मी. उत्तरेला आहे. परंतु, हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा म्हणजे १००० वर्षांपूर्वी कर्कवृत्त नेमके या स्थानावरून जात होते. याचाच अर्थ हे बांधताना कर्कवृत्तावर बांधायचे असे नेमके ठरवून बांधलेले आहे. हे आता आपण सविस्तर गणिताने पाहू या.

पृथ्वीचा अक्ष पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या म्हणजे क्रांतिवृत्त पातळीशी साधारणपणे साडेतेवीस अंशाच्या कोनातून कललेला आहे. तो आज २१ जून २०२६ रोजी नेमका २३.४३५८अंश (२३॰ २६’ १०”) आहे. आज असे म्हणण्याचे कारण असे की हा अक्ष नेहमी स्थिर नसतो, तर त्याची २४.५अंश कमाल ते २२.१अंश किमान इतक्या अंशांच्या मर्यादेत आवर्तने होत असत. हा आवर्तन काल ४१ हजार वर्षांचा आहे. म्हणजे २४.५अंश ते २२.१अंश असा बदल २० हजार ५०० वर्षांत आणि पुन्हा २२.१अंश ते २४.५अंश पुढील २० हजार ५०० वर्षांत असा एकूण ४१ हजार वर्षांत होतो. या आवर्तनानुसार ह्या बदलाची मासिक गती ०.००००१२अंश ( ०.०४”) एवढी असते. सुमारे १०००० वर्षांपूर्वी हा कल २४.५अंश ह्या कमाल अंशांएवढा होता. तेव्हापासून कमी होत होत तो आज २१ जून २०२६ या दिवशी २३.४३५८अंश एवढा आहे.

या बदलाचा भौगोलिक परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होत असतो. पृथ्वीचा हा कल कमाल असताना वातावरण जास्त विषम असते. तीव्र उन्हाळा पडतो. बर्फ जास्त वितळते. याउलट पृथ्वीचा कल किमान असतो तेव्हा सम वातावरण असते. याचे पडसाद इतिहासात दिसून येतात.

अर्थात काळाच्या विरुद्ध दिशेत मागे जावे तसा तो कल आजच्याहून जास्त असणार. वर दिलेल्या ०.००००१२अंश ह्या मासिक गतीनुसार १००० वर्षात हा बदल सुमारे ०.१४८अंश एवढा होतो. म्हणजे आजच्यापेक्षा पृथ्वीचा हा कल ०.१४८अंश एवढा जास्त होता. अर्थात २३.४३५८ + ०.१४८ = २३.५८३ इतक्या अंशांचा, म्हणजेच मोढेरा सूर्यमंदिर ाच्या अक्षांशांएवढा होता. यावरून असे निश्चित अनुमान करता येते की मोढेरा सूर्यमंदिर बांधत असताना स्थापत्यविशारद आणि खगोलशास्त्रज्ञ यांच्या समन्वयाने हे मंदिर तत्कालीन कर्कवृत्तावर बांधले. सूर्यमंदिर म्हणून याचं वैशिष्ट्य आहेच पण कर्कवृत्तावर असल्याने सूर्याची परमोच्च उत्तर क्रांती म्हणजे ‘समर-सोलस्टीस’ अर्थात विष्टंभ स्थिती ठरवणं हा या स्थापत्य रचनेचा प्रमुख उद्देश असला पाहिजे. त्याकाळी जेव्हा सूर्य वर्षातील कमाल उत्तर क्रांतीला येत असेल तेव्हा त्या दिवशीच्या माध्यान्हीला सूर्य या मंदिराच्या खस्वस्तिक स्थानी म्हणजे ‘झेनिथ’ स्थानी अर्थात नेमका डोक्यावर येत असे आणि सूर्याचा कर्कवृत्तावर येण्याचा दिवस निश्चित करता येत असे.

त्यावेळी भारतात आपली पारंपरिक निरयन चांद्रसौर गणना अस्तित्वात होती. त्यामुळे आजच्या सायन सौर ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे २१ जून हा सूर्याच्या कमाल उत्तर क्रांतीचा दिवस हे कायम माहीत असण्याची सोय त्या लोकांना उपलब्ध नव्हती. आणि आपल्या पारंपरिक कालगणनेत दरवर्षी हा दिवस साहजिकच वेगळा येतो. पण ही मंदिराची रचना आणि स्थान अस नियोजित केलं की ही गोष्ट प्रत्यक्ष निरीक्षणाने पाहून तो दिवस ठरवता यावा आणि त्याचा उपयोग त्यासंबंधीच्या कामात करता यावा. हे स्थान अचूक ठरवण्याकरता त्याकाळातील तज्ज्ञांनी पुरेशी निरीक्षणे आणि अभ्यास करून हे स्थान निश्चित केले असले पाहिजे. ह्या त्यांच्या अचुकतेचा आपल्याला सार्थ अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे.

आज आधुनिक खगोलविज्ञानाला पृथ्वीच्या अक्षाच्या सूक्ष्म बदलाचे अचूक ज्ञान झालेले असलं तरी त्या काळातील त्या खगोलशास्त्रज्ञांना ते असण्याची शक्यता नाही. पण हा त्यांचा कमीपणा मानण्याचं मुळीच कारण नाही. उलट त्यांनी साधलेल्या अचूकतेबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. आज जरी त्यात बदल झाला असला तरी त्या बदलाच्या गणितावरून मोढेराच्या मंदिराच्या बांधकामाचा काळ निश्चित करता येतो आणि तो इतर ऐतिहासिक पुराव्यांना भक्कम करतो.

हे मंदिर नेमके पूर्वाभिमुख असल्याने आजही विषुवदिन म्हणजे दरवर्षी २२ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवसांना उगवणाऱ्या सूर्याचे किरण नेमके मूर्तीच्या जागेवर पडतात. काळाच्या ओघात गाभाऱ्यातील मूर्ती आज तिथे नाही पण मूर्ती असताना हा आविष्कार कसा होत असेल याचा अंदाज करता येतो. अशा रचना भारतात अनेक मंदिरांच्या बाबतीत आहेत. विषुवदिनी होणारा सूर्याचा किरणोत्सव हे या सूर्यमंदिराचं खास वैशिष्ट्य नाही तर त्या मंदिराचे बांधकाम त्या काळच्या कर्कवृत्तावर अचूकपणे केले हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. असे इतर कोणत्याही सूर्यमंदिराच्या बाबतीत नाही. म्हणुनच हे मोढेराचे सूर्यमंदिर एक वेगळे वैशिष्ट्य बाळगून आहे.

२१ जून हा ग्रेगरियन दिनांक सूर्याच्या परमोच्च उत्तर क्रांतीशी संबंधित आहे आणि या मंदिराची रचना, रचनाकाळी सूर्याच्या या कमाल उत्तर क्रांतीशी सुसंगत होईल अशी योजना करुन हे खास वैशिष्ट्य राखून केलेली आहे. मोढेरा सूर्यमंदिराच्या या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यावर २१ जूनच्या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पृथ्वीच्या अक्षाचा कल १००० वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा कमी झाला आहे त्यामुळे मंदिराचं स्थान आजच्या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आहे. त्यामुळे आजच्या काळात सूर्य २१ जूनला जेव्हा कर्कवृत्तावर येतो तेव्हा मात्र माध्यान्हीला मंदिराच्या माथ्यावर म्हणजे खस्वस्तिक स्थानी न येता किंचित (म्हणजे ०.१४८अंश अर्थात ०अंश ८’ ५२” एवढा) दक्षिणेला असतो.
(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत