Headlines

Milind Narvekar : कुख्यात डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न, मिलिंद नार्वेकर यांची हजेरी – maharashtra political news shivsena uddhav thackeray party sec milind narvekar attends don arun gawli son yogesh gawli wedding


Arun Gawli Son Wedding : दगडी चाळीतील गुंड अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

हायलाइट्स:

  • अरुण गवळीच्या मुलाचा विवाह
  • मिलिंद नार्वेकर यांची उपस्थितीत
  • अरुण गवळीही पॅरोलवर तुरुंगाबाहेर
Arun Gawali Son Wedding Milind Narvekar
अरुण गवळीच्या मुलाच्या लग्नाला मिलिंद नार्वेकर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याचा मुलगा योगेश गवळीचा विवाह काल पार पडला. या लग्न सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) यांनी हजेरी लावली. योगेश अरुण गवळीच्या लग्नाला उपस्थिती लावून नार्वेकरांनी शुभेच्छा दिल्याची माहिती आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना नगरसेवक खून प्रकरणातच गवळी शिक्षा भोगत आहे.

अरुण गवळीसुद्धा मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुलाच्या लग्नासाठी त्याने पॅरोल मागितला असता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला मंजुरी दिली आहे.

अरुण गवळीला चार दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. या रजेत पोलीस सुरक्षेसह अरुण गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आली होती. त्यासाठीचा खर्च स्वतः गवळीला करावा लागणार होता.

यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला आहे. कन्या योगिता गवळीच्या विवाहाच्या वेळीही तो बाहेर आला होता. तर पत्नीच्या आजारपणाच्या कारणास्तवही त्याने पॅरोल मागितला होता. याविरोधात गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केलेली. विना सुरक्षा आठ दिवसांची रजा मिळावा म्हणून त्याने न्यायालयाला विनंती केली होती. सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चार दिवसांची रजा मंजूर केली आहे.

हेही वाचा : नाराजीच्या चर्चांवर अमोल कोल्हे रोखठोक, स्टार प्रचारकांची यादी तयार करणं माझ्या हातात कुठे?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईमधील असल्फा भागात २ मार्च २००७ रोजी कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अरुण गवळीला २००८ मध्ये अटक केली होती. २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा : ठाण्यातील राड्यावेळी ठाकरे गटात, दोनच दिवसात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा