Headlines

Mayank Lohar Death Case: चाकांवरचे प्राणभय – mumbai local dispute 22 yrs old mayank lohar death during fight over shutting door


Mayank Lohar Death Case: जानेवारीत एका प्राध्यापकाला अशाच किरकोळ वादातून जीव गमवावा लागला होता. यानंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा निर्णयांचे मोठे दावे केले होते; परंतु ते केवळ कागदावरच राहिले.

Mumbai Local Mayank Lohar Murder Case.
Mayank Lohar(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबईत धावत्या लोकल गाडीत खचाखच भरलेल्या डब्यामध्ये मंगळवारी रात्री तरुण प्रवाशाची सुऱ्याने भोसकून खून करण्यात आला. मयंक लोहार या २२ वर्षांच्या, कुटुंबातील कर्त्या तरुणाला रोशन सुवर्णा याने किरकोळ वादामधून संपवले. गेल्या पाच महिन्यांत अशा पद्धतीने झालेला हा दुसरा खून. ही घटना ‘धावत्या ट्रेनमधील हत्या’ एवढ्यापुरती मर्यदित नाही, तर रेल्वेच्या प्रशासकीय बेजबाबदारपणासह मुंबईच्या बदलत्या सामाजिक, मानसिक आरोग्यावरही ती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज सुमारे सत्तर ते ऐंशी लाख प्रवासी प्रवास करतात. शहराचा एक मोठा तुकडा धावत्या चाकांवरून जगण्यापाठी धावत असतो. दरदिवशी या गर्दीत शेकडोंची भर पडते, त्या तुलनेत सुरक्षा मात्र तोकडी पडते. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांचे संख्याबळ स्थानकांवरील आणि धावत्या गाड्यांमधील गर्दीच्या तुलनेत अत्यंत अपुरे आहे. अलीकडे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात असले, तरी गर्दीच्या वेळी ‘रिअल-टाइम’ लक्ष ठेवून एखादी दुर्घटना घडत असताना तत्काळ मदत पोहोचवणे केवळ अशक्य आहे. गेल्या काही दिवसांत फलाटांवर सुरक्षा व्यवस्थेची ठळक उपस्थिती दिसत असली तरी धावत्या लोकल गाड्यांमध्ये मात्र ती रात्रीच्या वेळी केवळ महिला डब्यांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षा दररोज त्यांच्या दैवावर सोडून लोकलगाड्या धावत असतात.

एकेकाळी संकटातील माणसांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मुंबईकरांचे ‘स्पिरिट’ हा भलताच कौतुकाचा विषय होता, त्याच मुंबईत गर्दीने भरलेल्या डब्यात तरुणावर वार होत असताना कोणी मदतीसाठी पुढे सरसावले नाही, उलट अनेकांनी मोबाइल कॅमेरे सरसावले. सपासप वार करणारा गुन्हेगार आणि रक्ताने माखलेला, वेदनने विव्हळणारा असहाय्य तरुण हा त्यांच्यासाठी सोशल मीडिया रीलचा केवळ ‘कन्टेन्ट’ होता. ‘गर्दीने भरलेल्या डब्यातून माझ्या भावाला कुणीच मदत का केली नाही?’ या मृत मयंकच्या बहिणीच्या आक्रोशाला मुंबईकरांकडे उत्तर नाही, इतकी या शहराची मुर्दाड मानसिकता झाली आहे. घराबाहेर पडल्यानंर सुरक्षित परत येऊ का, याबद्दलची अनिश्चितता अन् भय हे शहराच्या मानगुटीवर कधीचेच आहे, पण ‘आपल्याला काय त्याचे’ ही स्वकेंद्री मानसिकता त्याहून भयंकर आहे.

पोलिस आणि न्यायालयात फेऱ्या माराव्या लागण्याची भीती इतकी मोठी असते की लोक अशा वेळी कान, डोळे, तोंड बंद करून घेतात. एखाद्याचा जीव जात असतानाही प्रतिकार न करता त्याचे व्हिडिओ बनवावेसे वाटणे, हे शहराचे सामाजिक आरोग्य पुरते बिघडल्याचे लक्षण आहे. मृत मयंक लोहार सेल्समन होता, तर आरोपी रोशन एका कार्गो कंपनीत काम करत होता. रोशन काही सराईत गुन्हेगार नव्हे, मग बॅगेत सुरा घेऊन कामावर जाण्याइतकी असुरक्षितता त्याला का वाटत होती? मुंबई सगळ्यांना आधार देते म्हणत तरुणाईच्या लाटा शहरावर रोज आदळत असल्या तरी त्यांच्या वाट्याला येतो प्रचंड संघर्ष, बेरोजगारी, असुरक्षितता आणि ताणतणाव. अनेकांना नैराश्य पोखरून टाकते. मानसिक आणि आर्थिक दबाव मोठा असतो. खच्चून भरलेल्या लोकलचा प्रवास, कामाचे लांबलचक तास आणि असह्य धावपळ यातून मानसिक थकवा पराकोटीला पोहोचला आहे. विश्रांतीचा अभाव आणि हरवलेला कौटुंबिक संवाद यामुळे लहान-सहान गोष्टींवरूनही संयम सुटतो आणि त्याचे रूपांतर हिंसक उद्रेकात होते.

मयंक लोहारची हत्या हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर तो समाज म्हणून आपला दारुण पराभव आहे. मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गंभीर आजारी आहे. नुकत्याच झालेल्या बेस्टच्या संपातून हे अधोरेखित झालेच. मेट्रो आली तरी लोकलची गर्दी नियंत्रणात आणण्यास ती पुरेशी नाही. मुंबईची गरज त्याहून मोठी आहे. गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांत सुरक्षा रक्षक तैनात करणे, मदतीसाठी हाक मारता येईल अशी संवाद यंत्रणा प्रत्येक डब्यात बसवणे आणि संकटसमयी मदत करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण असल्याचे उद्घोषणेद्वारे सांगणे हे रेल्वेने करायला हवे. यासोबत सरकारने ताण-तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्यासाठी व्यापक सुविधा उपलब्ध करायला हव्यात. सीटवरून झालेला वाद किंवा धक्का लागल्यासारख्या छोट्या कारणावरून थेट जीवे मारण्यापर्यंत मानसिकता जाणे, हे शहर सैराट झाल्याचे लक्षण आहे अन् त्यावर तातडीच्या उपचारांची गरज आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा