Lucas Trejo News : व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी कुटुंबासाठी केलेली त्याची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मात्र या नैसर्गिक आपत्तीने अर्जेंटिनाचा अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याच्यावरही अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. एका क्षणात त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. क्लबने अधिकृत निवेदनातून ही हृदयद्रावक माहिती जाहीर केल आहे. डेपोर्टिव्हो ला ग्वायरा क्लबने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेजोची पत्नी यानिना मारानेला आणि त्यांची दोन्ही मुले अॅरॉन व आयनोआ यांचा याराकुई प्रदेशात झालेल्या दुहेरी भूकंपात मृत्यू झाला. भूकंपानंतर त्यांच्या राहत्या इमारतीचा मोठा भाग कोसळला होता. सुरुवातीला तिघेही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. अनेक तास बचावकार्य सुरू राहिल्यानंतर अखेर त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.
या घटनेच्या वेळी लुकास ट्रेजो आपल्या कुटुंबासोबत नव्हता. आगामी सामन्याच्या तयारीसाठी तो काराकास येथे आपल्या संघासोबत होता. भूकंपाची माहिती मिळताच त्याने कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व संपर्क तुटला होता. पत्नी आणि मुलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने ट्रेजोने कुटुंबीय, स्थानिक पोलिसांच्या आणि बचाव पथकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. मृत्यूची अधिकृत माहिती येण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली.
काय केलेली इन्स्टा पोस्ट?
‘प्लाया ग्रांदेमधील आमची इमारत कोसळली आहे. माझ्या कुटुंबाबद्दल मला काहीच माहिती नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कोणाला ते दिसले असतील तर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मला अजूनही आशा आहे की ते त्या इमारतीत नव्हते,’ असे ट्रेजोने इन्स्टाग्रामवर लिहिले होते.
मात्र काही तासांनंतर आलेल्या अधिकृत माहितीत त्याच्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे. डेपोर्टिव्हो ला ग्वायरा क्लबने निवेदन जारी करत ट्रेजोच्या पत्नी आणि दोन्ही मुलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘या कठीण प्रसंगी लुकास आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,’ अशा शब्दांत क्लबने संवेदना व्यक्त केल्या. ट्रेजोचे कुटुंब प्लाया ग्रांदे या किनारपट्टीवरील भागात राहत होते. दुहेरी भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये या परिसराचा समावेश होता. धक्क्यांमुळे त्यांच्या राहत्या निवासी इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली.
1000 जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या प्राथमिक अंदाजानुसार २४ जून रोजी झालेल्या या दुहेरी भूकंपाचा परिणाम तब्बल ६७.६ लाख नागरिकांवर झाला आहे. या भीषण आपत्तीत आतापर्यंत सुमारे एक हजार जणांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा