![]()
‘नेमेची येतो हा पावसाळा’ — आणि त्याबरोबर नेहमीप्रमाणे मलेरिया व डेंग्यूचाही धोका वाढतो. या वर्षीही चित्र वेगळे नाही. सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांची उदासीनता, डबक्यांत साचलेले पाणी, उघडी गटारे, टाकून दिलेले टायर्स अशा अनेक कारणांमुळे डासांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. जुलैच्या मध्यापर्यंत मलेरियाचे सुमारे ३६०० रुग्ण आढळले आहेत.
मलेरिया भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा रोग असला, तरी त्यावरील महत्त्वाचे संशोधन प्रामुख्याने पाश्चात्त्य डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी केले. या रोगाच्या इतिहासाचा आणि अलीकडील जनुकीय संशोधनाचा हा आढावा.
माकडातून माणसात
मलेरिया हा मूळतः प्राण्यांकडून माणसाकडे आलेला रोग आहे. अशा संसर्गाला ‘झुनोटिक संसर्ग’ म्हणतात. हे संक्रमण हजारो वर्षांपूर्वी झाले असावे. या परजीवी जंतूंचा वाहक डास आहे.
हा परजीवी गोरिलांकडून,
आणि
चिंपांझी व बोनोबो माकडांकडून,
मकाक माकडांकडून, तर
विविध माकडांकडून डासांमार्फत माणसात आला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
आज मात्र मलेरिया प्रामुख्याने माणसातून माणसाकडे अॅनाफिलीस डासाच्या मादीमार्फत पसरतो. म्हणजेच माणूस हा मलेरियाच्या परजीवींचा ‘रिझर्व्हायर’ — साठा — बनतो. साधारण दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करू लागला, एका जागी स्थिरावला आणि मोठ्या वस्त्या निर्माण झाल्या. तेव्हापासून माणूसच मलेरियाच्या जंतूंचा मुख्य साठा झाला असावा, असा विज्ञानाचा कयास आहे.
मलेरियाच्या जंतूंचा शोध
१८८० साली फ्रेंच डॉक्टर अल्फॉन्स लॅव्हेरान यांनी अल्जेरियातील एका रुग्णाच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये मलेरियाचे परजीवी असतात, हे दाखवून दिले. या शोधाबद्दल त्यांना १९०७ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले.
१८९७ मध्ये डॉ. रोनाल्ड रॉस भारतात मलेरियावर संशोधन करत होते. त्या काळात देशभर हिंवतापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. सिकंदराबाद येथील हुसेनखान हा असा एक रुग्णावर केलेल्या प्रयोगांतून अॅनाफिलीस डासाच्या मादीच्या शरीरात मलेरियाचे परजीवी असतात, हे डॉ. रॉस यांनी सिद्ध केले. ही मादी माणसाला चावली, की हे परजीवी रक्तात प्रवेश करतात आणि मलेरिया होतो. डासांचे नियंत्रण केले, तर मलेरिया आटोक्यात येऊ शकतो, हेही त्यांनी दाखवून दिले. या कार्याबद्दल त्यांना १९०२ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले.
मॉरिशससारख्या छोट्या देशाने मलेरिया प्रभावीपणे आटोक्यात आणला. त्यानंतर जन्मदर जवळपास तसाच राहूनही त्या देशाची लोकसंख्या एका दशकात दुप्पट झाली, अशी नोंद आढळते. यावरून मलेरियाचा लोकसंख्या आणि समाजरचनेवर किती खोल परिणाम होऊ शकतो, हे लक्षात येते.
निसर्गाची संरक्षणयुक्ती
भारतासह ज्या देशांत मलेरिया मोठ्या प्रमाणावर आढळतो, त्या देशांत ‘सिकलसेल अॅनिमिया’ आणि ‘थॅलॅसेमिया’ या रक्तविकारांचे प्रमाणही जास्त असते. या दोन्ही जनुकीय विकृती आहेत.
संशोधनात असे दिसते की या विकृतींची एक प्रत असलेल्या व्यक्तींना मलेरियापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते. जणू माणसाला या जीवघेण्या रोगापासून वाचवण्यासाठी निसर्गाने ही युक्ती योजली असावी, असा कयास मांडला जातो. ज्या भागांत मलेरियाचे प्रमाण नगण्य झाले, तेथे या जनुकीय विकृतींचे प्रमाणही कालांतराने कमी होताना दिसते.
मूळ युरोपीय श्वेतवर्णीय लोकांत हे जनुकीय आजार तुलनेने दुर्मीळ असले, तरी मलेरियाच्या ऐतिहासिक उपस्थितीमुळे ग्रीस, इटली आणि दक्षिण युरोपातील काही भागांत या विकृती आढळतात. आफ्रिका, मध्यपूर्व आणि भारतातून झालेल्या स्थलांतरांमुळे युरोपातील विविध भागांतही हे आजार आढळू लागले आहेत.
युरोपातील ऐतिहासिक उपस्थिती
मलेरियाचे परजीवी मूळ युरोपीय लोकांमध्येही होते, याचे पुरावे आता जनुकीय संशोधनातून मिळत आहेत. या परजीवींच्या जनुकांत काळानुसार कोणते बदल घडत गेले, याचा अभ्यास अमेरिकेतील येल विद्यापीठातील संशोधकांनी केला. हे संशोधन जुलै २०२६ मध्ये प्रकाशित झाले.
आधुनिक वैज्ञानिक साहित्यात आता ‘B.C.’ म्हणजे ‘Before Christ’ ऐवजी ‘B.C.E.’ म्हणजे ‘Before Common Era’ आणि ‘C.E.’ म्हणजे ‘Common Era’ या धर्मनिरपेक्ष संज्ञांचा वापर वाढला आहे.
युरोपात ३७१–१७० B.C.E. या काळातील तसेच पहिल्या-दुसऱ्या शतकातील मानवी अवशेषांत
या मलेरियाच्या परजीवीचे जनुक सापडले आहे. या शाखेला ‘पॅलेओमायक्रोबायोलॉजी’ — म्हणजे प्राचीन सूक्ष्मजीवविज्ञान — म्हणतात. आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानामुळे अशा संशोधनाला अधिक अचूकता प्राप्त झाली आहे.
मलेरियाने इटलीच्या इतिहासात निर्णायक भूमिका बजावली आहे. या रोगाच्या साथीमुळे इटलीत अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल घडले. ‘मलेरिया’ हा शब्दही इटालियन भाषेतील ‘mal’aria’ — म्हणजे ‘वाईट हवा’ — या शब्दातून आला आहे.
१५व्या शतकातील फ्लॉरेन्स येथील मेडिसी राजघराण्याच्या चॅपेलमध्ये धातूच्या पेटीत दोन राजव्यक्तींची हाडे चांगल्या स्थितीत जतन केलेली होती. इतिहासानुसार या व्यक्ती मलेरियाने मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यांच्या हाडांत
या परजीवीचे जनुक सापडले. त्या जनुकांच्या सखोल डीएनए विश्लेषणामुळे मलेरियाच्या परजीवींच्या जनुकीय रचनेवर नवा प्रकाश पडला.
पूर्वीच्या काळातील
आणि १५व्या शतकातील
यांच्या जनुकांत फरक आढळला. यावरून मलेरियाचे परजीवीही काळानुसार बदलत, जुळवून घेत आणि उत्क्रांत होत गेले, हे स्पष्ट होते.
मलेरियाची उत्क्रांती
लोकसंख्या वाढ, स्थलांतर आणि पर्यावरणातील बदल यांचा परजीवींच्या जनुकांवर परिणाम होतो. जनुकांतील उत्परिवर्तनांचा अभ्यास करून लोकांचे स्थलांतर कसे झाले असावे, परजीवी कसे पसरले आणि बदलत्या परिस्थितीशी कसे जुळवून घेत गेले, याचा अंदाज बांधता येतो.
या संशोधनामुळे मलेरियाच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासाठी एक महत्त्वाचा आधारबिंदू मिळतो. कोणत्या उत्परिवर्तनांमुळे रोगाची तीव्रता वाढते, कोणत्या बदलांमुळे औषधप्रतिकार निर्माण होतो आणि परजीवींचा प्रसार कसा वाढतो, याचा अभ्यास करता येतो.
मलेरियाच्या परजीवींच्या सतत बदलणाऱ्या जनुकीय रचनेमुळे प्रतिबंधक लस तयार करताना कोणती रचना उपयुक्त ठरेल, यावरील संशोधनाला दिशा मिळते. नवीन औषधे शोधण्यासही हे ज्ञान मदत करू शकते.
लोकसंख्येची घनता जितकी जास्त, तितका मलेरियाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता वाढते. अशा वस्त्यांत परजीवींमध्ये उत्परिवर्तनेही वेगाने होऊ शकतात. कालांतराने औषधांना दाद न देणारे मलेरियाचे जंतू तयार होण्याचा धोका असतो. अशा मानवी वस्त्या मलेरियाचे आगर बनू शकतात.
युरोप आणि अमेरिकेतील सातत्यपूर्ण संशोधन, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि प्रतिबंधक उपायांमुळे १९७० पर्यंत युरोपातून मलेरियाचे उच्चाटन झाले.
भारतासाठी धडा
हे संशोधन भारतासाठी, विशेषतः मुंबईसारख्या महानगरांसाठी दिशादर्शक आहे. शहरातील लोकसंख्येची घनता वाढत आहे. झोपडपट्ट्या, अपुरी स्वच्छता, साचलेले पाणी, बांधकामस्थळे आणि अपुरी डास नियंत्रण व्यवस्था यांमुळे मलेरियाचा धोका कायम राहतो.
मलेरियाच्या परजीवींच्या जनुकांत बदल घडण्यास फार वेळ लागत नाही. त्यामुळे औषधप्रतिकार, अधिक तीव्र संसर्ग आणि वेगवान प्रसार यांचा धोका वाढू शकतो.
सध्या मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधक उपाय हेच सर्वात प्रभावी साधन आहे. डासांची उत्पत्ती रोखणे, साचलेले पाणी काढणे, गटारे स्वच्छ ठेवणे, टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे आणि आरोग्य यंत्रणेचे निर्देश पाळणे- ही जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही; नागरिकांचाही त्यात तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे.
मलेरियाचा इतिहास सांगतो की हा रोग फक्त वैद्यकीय समस्या नाही. तो पर्यावरण, लोकसंख्या, स्थलांतर, जनुकशास्त्र आणि सार्वजनिक स्वच्छता या सर्वांशी जोडलेला आहे. त्यामुळे मलेरियावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर विज्ञानाबरोबरच सामाजिक शिस्त आणि नागरिकांची जागरूकता आवश्यक आहे.
(लेखक वैद्यकीय व्यावसायिक आहेत.)
