Headlines

Mahim Speeding KTM bike drags Woman Mangala Tandel to death rider Dhruv Gurav also dies Crime News; अपघाताचा आवाज ऐकून पती घराबाहेर, पत्नीला बाईकने फरफटत नेलेलं, अक्कलकोटला निघण्यापूर्वी माहिमच्या कुटुंबावर शोककळा


मुंबई : माहीममधील जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरुन आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडणाऱ्या ५० वर्षीय महिलेला सोमवारी रात्री एका भरधाव बाईकने धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय बाईकस्वार आणि पादचारी महिला अशा दोघांचाही मृत्यू झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापासून काही अंतरावरच हा प्रकार घडला. अपघाताचा आवाज ऐकून धावत बाहेर आलेल्या पतीला हे दुर्दैवी दृश्य पाहावे लागले. बाईकस्वार मद्यपान करून होता का, हे तपासण्यासाठी पोलीस त्याच्या ब्लड टेस्ट रिपोर्टची वाट पाहत आहेत.

मुंबईच्या माहिम येथील जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर माहिम कॉजवेवरून आपल्या दोन मुली सलोनी आणि सानिया यांच्यासह रस्ता ओलांडणाऱ्या मंगल तांडेल यांचा बाईकच्या धडकेत मृत्यू झाला. तर त्यांना धडक देणारा बाईकस्वारही मृत्युमुखी पडला. मंगला तांडेल आणि बाईकस्वार ध्रुव गुरव हे दोघेही माहीमचे रहिवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास माहीम कॉजवेजवळ जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर घडला. मंगला आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडून पलिकडे राहणाऱ्या एका नातेवाईकाला भेटायला जात होत्या.

Maharashtra TimesTukaram Mundhe : कुठे झुरळं कुठे गंजलेली उपकरणं; MIG, CCI सह मुंबईतील नामांकित क्लबवर FDA चे छापे, परवाने निलंबित

अक्कलकोटला जाण्यापूर्वी काळाचा घाला

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मठाला भेट देण्यासाठी तांडेल परिवार सोलापूरमधील अक्कलकोटला रवाना होणार होता. त्याच्या काही क्षण आधीच हा दुर्दैवी अपघात घडला. वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या बाईकची मंगला यांना इतक्या जोरात धडक बसली की, त्या जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या.

मंगला यांनी निघण्याची तयारी आधीच केली होती. त्या आपले नातेवाईक तयार होण्याची वाट पाहत होत्या. त्यांना बोलावण्यासाठी त्या बाहेर आल्या असतानाच हा अपघात घडला.

अपघाताचा आवाज ऐकून पती धावत बाहेर

मंगला यांचे ५४ वर्षीय पती अशोक तांडेल हे बँक ऑफ बडोदामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की अपघात झाल्याचा आवाज ऐकताच ते तातडीने घराबाहेर धावले. त्यावेळी त्यांना त्यांची पत्नी आणि बाईकस्वार तरुण रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. घटनास्थळी एक ‘केटीएम’ स्पोर्ट्स बाईक आढळून आली.

आसपासच्या लोकांच्या मदतीने मंगला यांना रहेजा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहीम पोलिसांनी बाईकस्वाराचे नाव ध्रुव गुरव असल्याचे सांगितले. त्याला सुरुवातीला भाभा रुग्णालय आणि नंतर रहेजा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

आईला आणण्यासाठी निघालेला ध्रुव

ध्रुव आपल्या आईला वांद्रे येथून आणण्यासाठी चालला होता. “त्याचे आई-वडील उत्तम गायक होते आणि पूर्वी ते काही ऑर्केस्ट्रांमध्ये गात असत. मात्र तो व्यवसाय मंदावल्यानंतर ते विविध कार्यक्रमांमध्ये गाणी गात असत” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra TimesPune Crime : कृष्णा आंदेकरचा काटा काढण्याचा प्लॅन, ठोंबरे टोळीकडून पोलीस व्हॅनचा पाठलाग, पोलिसांनी थरारक कट उधळला
ध्रुव मद्यपान करून वाहन चालवत होता का, हे पाहण्यासाठी पोलीस त्याच्या रक्ताच्या सॅम्पलच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मंगला यांना धडक दिली तेव्हा बाईक भरधाव वेगात होती.