Mumbai Metro 2 B Diamond Garden Chembur starts Sion Chembur Link Road opened; मुंबईकरांसाठी नव्या प्रवासाचा आरंभ, मेट्रो 2B चे लोकार्पण, तर WEH ला BKC शी थेट जोडणारा शीव-चेंबूर लिंक रोड खुला
Mumbai Metro 2 B Diamond Garden Chembur starts Sion Chembur Link Road opened; मुंबईकरांसाठी नव्या प्रवासाचा आरंभ, मेट्रो 2B चे लोकार्पण, तर WEH ला BKC शी थेट जोडणारा शीव-चेंबूर लिंक रोड खुला
Mumbai Metro 2 B : डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो मार्गिका २ बीच्या विस्तारासह पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट बीकेसीला जोडणारा १.४ किलोमीटरचा शीव-चेंबूर लिंक रोड (SCLR) हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना मेट्रो आणि रस्ते प्रवासाचा नवा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांच्या रस्ते आणि मेट्रो प्रवासाला वेग देण्यासाठी आज, गुरुवारी दोन प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो मार्गिका २ बीच्या विस्तारासह पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट बीकेसीला जोडणारा १.४ किलोमीटरचा शीव-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. दुसरीकडे, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यांच्या दुसऱ्या बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएमच्या मदतीने खोदकाम सुरू होणार आहे.
मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली
डी. एन. नगर ते मंडाळे ही मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली होणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानक हे व्ही. एन. पुरव मार्गावरील मोनो रेल स्थानकापासून १०० मीटर अंतरावर आहे. चेंबूर मोनो रेल स्थानकापासून चेंबूर रेल्वे स्थानक २०० मीटर अंतरावर आहे. यामुळे चेंबूरपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोनो, मेट्रो आणि हार्बर लोकल असे तिन्ही वाहतुकीचे पर्याय प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. चेंबूरसह पूर्व उपनगरांतील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो २ बीचा डायमंड गार्डन ते मानखुर्द हा टप्पा ८ एप्रिलपासून खुला झाला होता.
कलानगरमार्गे वळसा टळणार
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या १.४ किमी लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात ५०० मीटर लांबीचा चारपदरी उन्नत मार्ग, तसेच ९०० मीटर लांबीचे दोनपदरी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे उड्डाणपूल मार्ग आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाली असून सध्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला जंक्शनपासून थेट भारतनगर, वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत पोहोचण्यासाठी हा अंतिम टप्पा महत्त्वाचा आहे. हा मार्ग खुला झाल्यावर कलानगरमार्गे वळसा टळणार आहे. बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल असे या बीकेसी कनेक्टरचे नामकरण करण्यात आले आहे.
दुसरीकडे, अत्यंत वर्दळीच्या आणि तीव्र उतारामुळे अपघातांचे केंद्र ठरलेल्या पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा अखेर निश्चित झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे पुलाची दिशा ठरत नव्हती. अखेर आता मार्केटयार्ड पीएमपी डेपोकडून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल करण्याचा, तर झाला कॉम्प्लेक्सपासून बिबवेवाडी कोंढवा रस्त्याला जोडरस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गंगाधाम चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारायचा निर्णय घेतला होता. २०१८मध्ये क्रेडिट नोटच्या बदल्यात पीपीपी तत्त्वावर हे काम करण्याची निविदाही मंजूर झाली. परंतु, हा उड्डाणपूल बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर उभारायचा की मार्केट यार्डकडून सरळ टेकडीवरून बिबवेवाला जाणाऱ्या रस्त्यावर उभारायचा यावरून लोकप्रतिनिधींमध्ये एकमत होत नव्हते. परिणामी हा प्रकल्प दीर्घ काळ रखडला.
उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग
दरम्यान, वाहतूक पोलिसांनीही येथील वाहतुकीचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांसंदर्भात पालिकेकडे अहवाल दिला होता. प्रशासनाने शहरात उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग अर्थात ‘एचसीएमटीआर’चे काम निश्चित केल्यानंतर आता या उड्डाणपुलाची दिशादेखील अंतिम केली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा