Headlines

Europe Drought 2026: युरोपमध्ये दुष्काळ का पडला आहे? – europe drought crisis as brutal heatwave scorches germany france britain belgium



-डॉ. अक्षय देवरस

युरोप म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतात ती या प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे, आल्प्स पर्वतरांगा, हिरवीगार कुरणे, दाट झाडी आणि निसर्गरम्य लँडस्केप. मात्र, या भागात, विशेषतः ब्रिटनमधील दक्षिण-पूर्व भागात, जसे की लंडनच्या आसपासच्या परिसरात, कोणी अलीकडे भेट दिली असेल, तर त्याला या नेहमीच्या चित्रापेक्षा बरेच वेगळे दृश्य पाहायला मिळाले असेल. अनेक ठिकाणी हिरवळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हिरव्या गवताच्या जागी तपकिरी, सुकलेले गवत दिसत आहे; काही ठिकाणी तर गवत पूर्णपणे गायब झाले आहे. नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. काही भागांत लागलेल्या वणव्यांनी नैसर्गिक प्रदेशाबरोबरच घरे आणि इतर मालमत्तेचेही मोठे नुकसान केले आहे.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्या ब्रिटनच्या अनेक भागांसह युरोपातील मोठ्या प्रदेशावर असलेली दुष्काळाची परिस्थिती. यूके म्हणजे केवळ इंग्लंड नव्हे; त्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड या चार राष्ट्रांचा समावेश होतो. या चारही भागांमध्ये हवामान एकसारखे नसले, तरी यंदाच्या उष्ण आणि कोरड्या परिस्थितीचा प्रभाव अनेक भागांवर दिसत आहे.

इंग्लंडमध्ये जुलैअखेरपर्यंत देशाच्या जवळपास निम्म्या भागात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. वेल्समध्ये तर संपूर्ण देशासाठी दुष्काळाचा दर्जा लागू करण्यात आला. जुलैमध्ये वेल्समध्ये दीर्घकालीन सरासरीच्या केवळ आठ टक्के पाऊस पडला, तर इंग्लंडच्या दक्षिण भागात सरासरीच्या केवळ एक टक्का पाऊस पडला. परिणामी, अनेक नद्यांची पाणीपातळी अत्यंत कमी झाली आहे.

परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावरून येते की, १४ जुलैला ब्रिटन सरकारने नागरिकांच्या मोबाईल फोनवर थेट आपत्कालीन सूचना पाठवून वणव्यांचा धोका कमी करण्यासाठी खुल्या जागेत बार्बेक्यू न करण्याचे आवाहन केले. कोरडे गवत आणि वनस्पतींमुळे एखादी छोटी ठिणगी किंवा निष्काळजीपणामुळे लागलेली आगही वेगाने पसरू शकते. त्यामुळे यंदाच्या दुष्काळाचा परिणाम केवळ पाण्याच्या उपलब्धतेपुरता मर्यादित राहिलेला नसून, वणवे आणि त्यातून होणारे पर्यावरणीय तसेच मालमत्तेचे नुकसान हाही गंभीर धोका बनला आहे.

युरोपची स्थितीही वेगळी नाही. युरोपियन दुष्काळ निरीक्षणानुसार पश्चिम आणि मध्य युरोपातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रोमानिया आणि इटलीच्या काही भागांमध्ये पाण्याची कमतरता, जमिनीतील ओलावा घटणे आणि नद्यांचा कमी प्रवाह ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. युरोपातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आणि कोरड्या हवामानामुळे वणव्यांचा धोका वाढला आहे.

मात्र, वर्षभर पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशात अचानक इतका दुष्काळ कसा पडू शकतो, हा प्रश्न साहजिकच पडतो.

हे समजून घेण्यासाठी ब्रिटनमधील हवामानाची सामान्य रचना आधी समजून घ्यावी लागेल. भारताप्रमाणे युरोपमध्ये असा एकच प्रमुख मोसमी पाऊस नाही. ब्रिटनचे हवामान मोठ्या प्रमाणावर अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या हवामान प्रणालींवर अवलंबून असते. अटलांटिकमधून येणाऱ्या कमी दाबाच्या प्रणाली, त्यांच्याशी संबंधित फ्रंट्स आणि जेट स्ट्रीमच्या हालचाली ब्रिटनमध्ये पाऊस आणतात.

जेट स्ट्रीम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच उंचीवर, जिथे सामान्यपणे विमाने उडतात, तिथे वाहणारे अतिवेगवान वारे. या हवामान प्रणालींची वारंवारता, तीव्रता आणि त्यांचा मार्ग यावर एखाद्या भागात किती पाऊस पडेल, हे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.

ब्रिटन मधील पश्चिम आणि पर्वतीय भाग सामान्यतः अधिक पावसाळी असतात. वेल्समधील स्नोडोनिया, इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट आणि स्कॉटलंडमधील स्कॉटीश हायलँड्ससारख्या भागांत वार्षिक पर्जन्यमान चार मीटरपेक्षाही अधिक असू शकते. साधारणपणे ब्रिटनमध्ये हिवाळा हा अधिक ओला ऋतू असतो, तर उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आणि सूर्यप्रकाशाचे प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठ्यांमध्ये काही प्रमाणात घट होणे ही असामान्य गोष्ट नाही.

मात्र, यंदाच्या परिस्थितीचे वैशिष्ट्य म्हणजे या नेहमीच्या उन्हाळी कोरडेपणाची तीव्रता आणि त्याचा दीर्घकाळ राहिलेला परिणाम. २०२६च्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये काही भागांत उलट विक्रमी पाऊस झाला होता. जानेवारीत नैऋत्य भागात असलेल्या कॉर्नवॉल येथे विक्रमी पाऊस पडला, तर नॉर्दर्न आयर्लंडमध्ये तो १४९ वर्षांतील सर्वाधिक जानेवारी पाऊस ठरला. काही ठिकाणी तर सलग ३० दिवसांहून अधिक काळ पाऊस पडला. म्हणजे वर्षांची सुरुवात पाण्याच्या कमतरतेने झाली नव्हती.

मात्र, त्यानंतर परिस्थितीने अक्षरशः १८० अंशांचा बदल केला. पावसाळी हिवाळ्यानंतर वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात उष्णता वाढली आणि पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. वर्षाच्या सुरुवातीला जमिनीत आणि जलसाठ्यांमध्ये पाणी मुबलक असतानाच पुढील काही महिन्यांत त्याची भरपाई करणारा पाऊस मिळाला नाही. त्यातच वारंवार आलेल्या उष्णतेच्या लाटांनी परिस्थिती आणखी गंभीर केली.

२०२६मध्ये ब्रिटन मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटांनी अनेक विक्रम मोडले. मे महिन्याच्या अखेरीस आलेली उष्णतेची लाट विशेषतः अभूतपूर्व होती. २६ मे रोजी लंडनमधील क्यू गार्डन्स येथे ब्रिटनमधील मे महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. त्याच काळात कॉर्नवॉल येथे मे महिन्यातील विक्रमी उच्च किमान तापमान नोंदले गेले. म्हणजे दिवसच नव्हे, तर रात्रीदेखील असामान्य उष्ण होत्या.

त्यानंतर जूनमध्ये काही भागांत तापमान ३८°से. पर्यंत पोहोचले. उष्णतेच्या या वारंवार येणाऱ्या लाटांमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आणि पाण्याची मागणी वाढली. पाऊस कमी असताना तापमान जास्त असल्यामुळे उपलब्ध पाणीही अधिक वेगाने बाष्पीभवन होऊ लागले. परिणामी, दुष्काळाची तीव्रता वाढत गेली.

पावसाच्या कमतरतेचे प्रमाणही तितकेच धक्कादायक आहे. दक्षिण इंग्लंडमधील सर्रे येथे सलग ६२ दिवस मोजता येईल इतकाही पाऊस नोंदला गेला नाही. १७ ते २३ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये महिन्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ३ टक्के पाऊस मिळाला. त्या वेळी ८४ टक्के नद्यांचा प्रवाह सामान्य प्रवाहापेक्षा कमी होता आणि इंग्लंडमधील जलाशयांतील साठा ७५.३ टक्क्यांवर आला होता, जो त्या काळातील सरासरीपेक्षा सुमारे ७.४ टक्के कमी होता.

याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांवर झाला आहे. इंग्लंडच्या जवळपास ४० टक्के लोकसंख्येवर जुलैअखेर पाण्याच्या वापरावरील निर्बंध लागू झाले होते. अनेक भागांत होजपाइप बंदी लागू करण्यात आली होती. म्हणजे बागेला पाणी देणे, गाडी धुणे यांसारख्या कामांसाठी घरगुती पाण्याचा वापर मर्यादित करण्यात आला.

शेतीवरचा परिणाम आणखी गंभीर आहे. पाण्याची कमतरता आणि उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला, सिंचनाची मागणी वाढली आणि काही पिकांची काढणी अपेक्षेपेक्षा लवकर करावी लागली. काही भागांत पशुपालकांना जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता जाणवू लागली आहे.

युरोपातही परिस्थिती चिंताजनक आहे. पश्चिम आणि मध्य युरोपातील उष्णता आणि कमी पावसामुळे उन्हाळी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, युरोपीयन युनियनच्या अंदाजानुसार मका, अन्य तृणधान्ये आणि सूर्यफूल यांसारख्या काही पिकांच्या उत्पादनाच्या अंदाजात सहा-सात टक्क्यांची घट झाली आहे. याचा पुढे अन्नसुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो.

नद्यांमधील कमी पाण्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही; जलचर परिसंस्थांवरही त्याचा परिणाम होतो. कमी प्रवाहामुळे पाण्याची गुणवत्ता खालावू शकते, काही ठिकाणी शैवाल (अल्गी ब्लूम )वाढू शकतात आणि माशांच्या मृत्यूच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. म्हणजेच दुष्काळाचा परिणाम मानवी समाजाबरोबरच संपूर्ण परिसंस्थेवर होतो.

भारतातील दुष्काळ आणि ब्रिटनमधील दुष्काळ यात नेमका फरक काय?

भारतात उन्हाळा साधारण मार्चपासून मे किंवा जूनच्या सुरुवातीपर्यंत असतो. त्यानंतर जूनपासून सप्टेंबरपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस पडतो आणि देशातील वार्षिक पर्जन्यमानाचा साधारण ८० टक्के पाऊस या चार महिन्यांत मिळतो. त्यामुळे मान्सून उशिरा आला, कमकुवत राहिला किंवा त्यात मोठे खंड पडले, तर शेती, धरणे, भूजल आणि पिण्याच्या पाण्यावर थेट परिणाम होतो. भारतातील दुष्काळ त्यामुळे अनेकदा मान्सूनच्या कामगिरीशी थेट जोडलेला असतो.

ब्रिटनमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. येथे दुष्काळ निर्माण होण्यासाठी एखादा ‘मान्सून फेल’ होण्याचा प्रश्न नसतो. त्याऐवजी अनेक महिने पाऊस कमी पडणे, त्याच वेळी तापमान वाढणे, बाष्पीभवन वाढणे आणि जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होणे यांचा एकत्रित परिणाम दुष्काळ निर्माण करतो.

भारतात पावसाचा मोठा हिस्सा काही महिन्यांत मिळतो, तर ब्रिटन मध्ये वर्षभर पाऊस तुलनेने अधिक विखुरलेला असतो. त्यामुळे दोन्ही ठिकाणी दुष्काळ निर्माण होण्याची प्रक्रिया वेगळी असली, तरी त्याचे परिणाम- पाण्याची कमतरता, शेतीवरील ताण, जलसाठ्यांमध्ये घट आणि परिसंस्थांवरील परिणाम -समान असू शकतात.

या संपूर्ण चित्रामागे हवामानबदलाचा मोठा संदर्भ आहे. वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे. हवामानबदल हा एखाद्या विशिष्ट दुष्काळाचा एकमेव कारणीभूत घटक आहे, असे म्हणणे योग्य नाही. यंदाच्या ब्रिटनमधील परिस्थितीमध्ये विशिष्ट हवामान प्रणाली, कमी पाऊस आणि दीर्घकाळ टिकलेल्या उष्णतेच्या लाटांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, वाढते तापमान अशा परिस्थितीची तीव्रता वाढवू शकते.

तापमान वाढल्याने बाष्पीभवन वाढते, जमिनीतील ओलावा अधिक वेगाने कमी होतो आणि पाऊस कमी पडला की त्याचा परिणाम पूर्वीपेक्षा अधिक गंभीर होतो.

२०२६ च्या ब्रिटन चे उदाहरण त्यामुळे विशेष महत्त्वाचे आहे. एकीकडे अतिपाऊस आणि दुसरीकडे दीर्घकाळचा कोरडा कालावधी- हवामानातील अशा टोकाच्या बदलत्या परिस्थिती आपल्याला भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा देतात. जर वर्षभर पाऊस आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटनसारख्या प्रदेशालाही काही महिन्यांत अशा गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, तर जगातील इतर कोणताही प्रदेश अशा परिस्थितीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मानता येणार नाही.

त्यामुळे हवामानबदलाचा वेग कमी करण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे जितके आवश्यक आहे, तितकेच बदललेल्या हवामानाशी जुळवून घेणेही महत्त्वाचे आहे. पाण्याचे अधिक कार्यक्षम साठवण, शेतीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याची गळती आणि नासाडी कमी करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पावसाच्या पाण्याचे संकलन यांसारख्या उपाययोजनांना भविष्यात अधिक महत्त्व द्यावे लागेल.

कारण हवामानातील टोकाची परिस्थिती किती वाढेल हे आपण नियंत्रित करू शकत नसलो, तरी उपलब्ध पाण्याचा वापर किती शहाणपणाने आणि शाश्वत पद्धतीने करायचा, हे निश्चितपणे आपल्या हातात आहे.

(लेखक हे ब्रिटनमधील नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स आणि रीडिंग विद्यापीठात वरिष्ठ संशोधक आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत