Headlines

Large Waist size and disease vs BMI, Visceral Fat Risk, Belly Fat & Heart Health; कमरेचा घेर वाढल्याने कोणते आजार होतात?


वजन जास्त आहे की लठ्ठपणा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, हे ठरवण्यासाठी केवळ BMI पुरेसा नाही. आता तज्ज्ञांच्या मते कमरेचा घेर आणि वेस्ट-हिप रेशो हे आरोग्याचा धोका ओळखण्यासाठी अधिक अचूक निकष मानले जातात. पोटाभोवती साचणारे व्हिसरल फॅट मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकते. या लेखात व्हिसरल फॅट म्हणजे काय, रात्री उशिरा जेवण्याचा त्यावर कसा परिणाम होतो, व्यायाम, संतुलित आहार आणि शाश्वत जीवनशैलीच्या मदतीने कमरेचा घेर कसा नियंत्रित ठेवता येतो, हे जाणून घ्या.

large waist size causes
large waist size causes
अनेक दशकांपासून एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त आहे की ती लठ्ठ आहे, हे ठरवण्यासाठी बीएमआय (BMI – बॉडी मास इंडेक्स) चा वापर केला जात आहे. उच्च बीएमआय हा हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब), मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे आणि हार्ट अटॅक यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांसाठी कारणीभूत मानला जात होता. परंतु, वर्षानुवर्षांच्या संशोधनानंतर आता वैद्यकीय विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, आरोग्याला असणारे धोके ओळखण्यासाठी बीएमआयपेक्षा ‘कमरेचा घेर’ (Waistline Circumference) आणि ‘कंबर व नितंबाचे गुणोत्तर’ (WHR – वेस्ट हिप रेशो) हे जास्त अचूक आणि उत्तम निकष आहेत. दक्षिण आशियाई (विशेषतः भारतीय) लोकांचा विचार केला तर महिलांसाठी ८० सेमी (३१.५ इंच) किंवा त्यापेक्षा कमी आणि पुरुषांसाठी ९४ सेमी (३७ इंच) किंवा त्यापेक्षा कमी कमरेचा घेर हा आदर्श मानला जातो. तसेच वेस्ट हिप रेशो महिलांमध्ये ०.८५ किंवा त्यापेक्षा कमी आणि पुरुषांमध्ये ०.९० किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. भारतीय महिलांमध्ये जनुकीय रचनेमुळेच (Genetically) पोटाच्या भागात चरबी जमा होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यातच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे पोटाची लठ्ठपणा (Central Obesity) झपाट्याने वाढतो. शरीरातील चरबीचे अचूक वितरण, स्नायूंचे प्रमाण आणि हाडांची घनता मोजण्यासाठी ‘डेक्सा स्कॅन’ (DEXA Scan) मशीनद्वारे केली जाणारी बॉडी कंपोझिशन अनालिसिस (BCA) ही सर्वात विश्वसनीय चाचणी मानली जाते.

व्हिसरल फॅट (Visceral Fat) म्हणजे काय आणि धोके?

व्हिसरल फॅट (Visceral Fat) म्हणजे काय आणि धोके?

कमरेचा वाढलेला घेर हा तुमच्या शरीरातील ‘व्हिसरल फॅट’चा (अंतर्गत अवयवांभोवती जमा होणारी चरबी) मुख्य संकेतक असतो. ही चरबी केवळ त्वचेखाली नसून ती यकृत, पोटाचे इतर अवयव आणि आतड्यांच्या भोवती जमा होते. हे व्हिसरल फॅट शरीरात दाहक घटक (Proinflammatory Substances) आणि फ्री फॅटी ऍसिडस् तयार करून शरीराच्या नैसर्गिक चयापचय (Metabolism) प्रक्रियेत अडथळा आणतात. यामुळे यकृताकडून फॅटचे विघटन व्यवस्थित होत नाही आणि शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हेच फॅट पेशींमधील इन्सुलिनच्या संकेतांना ब्लॉक करते, ज्यामुळे शरीरात ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ निर्माण होऊन मधुमेह (Diabetes) होतो. तसेच, हे फॅट शरीरातील ‘रेनिन अँजियोटेन्सिन’ प्रक्रियेवर परिणाम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा (Hypertension) त्रास सुरू होतो. काही संशोधनानुसार, अंतर्गत अवयवांवरील अति-चरबीमुळे कॅन्सरचा धोका देखील वाढतो.

जैविक घड्याळ आणि रात्री उशिरा जेवण्याचे दुष्परिणाम

जैविक घड्याळ आणि रात्री उशिरा जेवण्याचे दुष्परिणाम

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या शरीराची अंतर्गत कार्यपद्धती म्हणजेच ‘बायोलॉजिकल क्लॉक’ (Biological Clock) समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मेंदूतील मुख्य केंद्र प्रकाशाचा आधार घेऊन २४ तासांचे हे घड्याळ नियंत्रित करते, जे आपली झोप, संप्रेरकांचे (Hormones) उत्सर्जन, पचनक्रिया आणि शरीराचे तापमान ठरवते. सूर्यास्तानंतर मेंदू ‘मेलाटोनिन’ नावाचे संप्रेरक तयार करतो ज्यामुळे आपल्याला झोप येते, तर सकाळी उठण्यासाठी ‘कॉर्टिसोल’ तयार होते. आपली जीवनशैली या घड्याळाशी सुसंगत असणे गरजेचे आहे. आपली बहुतांश पचनसंस्था रात्री ८ नंतर मंदावते आणि स्वादुपिंड (Pancreas) रात्री १० नंतर पाचक रस तयार करणे थांबवते. अशा वेळी जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल, तर पोटाचा घेर आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

यकृतावरील अतिरिक्त ताण आणि चरबीचे संचयन

यकृतावरील अतिरिक्त ताण आणि चरबीचे संचयन

यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील असा अवयव आहे जो २४ तास काम करतो. परंतु, रात्री १० ते पहाटे २ या वेळेत यकृत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे (Detoxification) अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असते. जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता, तेव्हा पचनसंस्थेचे मुख्य अवयव आधीच मंदावलेले असल्यामुळे जेवणाचा संपूर्ण ताण यकृतावर येतो. या उशिरा खाल्लेल्या अन्नाचे किंवा अतिरिक्त कॅलरीजचे ऊर्जेत रूपांतर न होता, यकृत त्याचे चरबीमध्ये रूपांतर करते. ही चरबी तुमच्या अंतर्गत अवयवांच्या भोवती जमा होऊ लागते, ज्यामुळे कमरेचा घेर वाढतो आणि सेंट्रल ओबेसिटी म्हणजेच पोटाची लठ्ठपणा निर्माण होतो. म्हणूनच, पचनसंस्था कार्यरत असतानाच अन्न घेणे आरोग्यासाठी हितावह ठरते.

व्यायामाचे महत्त्व आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला

व्यायामाचे महत्त्व आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला

व्हिसरल फॅट किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी शारीरिक व्यायामाचा अभाव हे एक मोठे कारण आहे. चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे, योगसाधना आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारखे विविध प्रकारचे व्यायाम कमरेचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. परंतु, कोणताही व्यायाम प्रकार स्वतःच्या मनाने किंवा अतिउत्साहात सुरू करण्यापूर्वी नेहमी ‘फिजिओथेरपिस्ट’चा (Physiotherapist) सल्ला नक्की घ्या, जेणेकरून तुमच्या हाडांना किंवा स्नायूंना दुखापत होणार नाही. कोणत्याही व्यायामाचे दोन सर्वात महत्त्वाचे टप्पे असतात – ‘वॉर्म अप’ आणि ‘कूल डाऊन’. योग्य वॉर्म अप आणि कूल डाऊन केल्याने व्यायामाचे शरीराला मिळणारे परिणाम अधिक उत्तम होतात.

शाश्वत जीवनशैली, वैविध्यपूर्ण आहार आणि जीवनसत्त्वांची गरज

शाश्वत जीवनशैली, वैविध्यपूर्ण आहार आणि जीवनसत्त्वांची गरज

आजच्या आधुनिक युगात कोणतीही व्यक्ती आयुष्यभर एकाच प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करू शकत नाही किंवा आयुष्यभर रोज जिममध्ये जाऊ शकत नाही. म्हणूनच, जी जीवनशैली तुम्ही आयुष्यभर सहजपणे टिकवून ठेवू शकता (Sustainable Lifestyle), तीच अंगीकारणे सर्वात शहाणपणाचे ठरते. शरीराचे अवयव सामान्यपणे कार्य करण्यासाठी प्रत्येक भागाला पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या पर्यावरणीय प्रदूषणामुळे अन्नपदार्थांमधील पोषक मूल्ये खूप कमी झाली आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही सकस आहार घेतला, तरी शरीरातील जीवनसत्त्वांचा साठा योग्य ठेवण्यासाठी अतिरिक्त व्हिटॅमिन्सची गरज भासू शकते. यासाठी वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्तातील व्हिटॅमिनची पातळी तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स घ्या. तसेच, सर्व पोषण मिळण्यासाठी आहारात रोज तेच तेच अन्न न खाता विविध प्रकारची धान्ये आणि बदलत्या ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करा.

या चार गोल्डन रुल्सचे नेहमी पालन करा

या चार गोल्डन रुल्सचे नेहमी पालन करा
  • जेव्हा तुमची पचनसंस्था पूर्णपणे सक्रिय असेल (म्हणजेच दिवसा), तेव्हाच अन्न खा.
  • तुमचे शरीर ज्या अन्नाचे पूर्णपणे पचन करू शकते, तेच आणि तेवढेच पदार्थ खा.
  • शरीराला गरज भासेल तेव्हा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins) नक्की घ्या.
  • आळस सोडून दैनंदिन जीवनात नियमित व्यायामाची सवय कायम ठेवा!​
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 15, 2026, 12:09 PMMedically Reviewed byDr. Gaurangi Shah
  • Jul 15, 2026, 12:09 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम