Headlines

Kolhapur – Sangli Project | कोल्हापूर-सांगलाची पूरमुक्तीच्या दिशेने वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांच्या कायमस्वरूपी पूरमुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रकल्पाची आवश्यक तयारी, मूल्यमापन आणि कर्ज वाटाघाटी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 3,200 कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी परिसरातील वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढविणे, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची वहनक्षमता सुधारणा, तसेच आधुनिक आणि सक्षम पर्जन्यजल निचरा व्यवस्था उभारणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या यशस्वी टप्प्यानिमित्त जागतिक बँकेचे प्रॅक्टिस मॅनेजर अब्देलरझाक खलील यांनी संपूर्ण एमआरडीपी पथकाचे अभिनंदन केले. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पामुळे राज्याची आपत्ती प्रतिकारक्षमता वाढेल, नागरिकांचे जीवित आणि उपजीविकेचे संरक्षण होईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील आणि रोजगार व आर्थिक संधींनाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना, कोल्हापूर-सांगलीच्या पूरप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने एमआरडीपी मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे म्हटले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाचे तसेच जागतिक बँकेचे सहकार्याबद्दल आभार मानले.

पूरधोका कमी होण्यास होणार मदत
प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पूरमुक्त, सुरक्षित आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार राज्य शासनाने व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील पूरधोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत