शाहूवाडी प्रतिनिधी
माझ्याशी लग्न कर, असे सतत धमकावत असलेल्या माजी महिला सरपंचांचा खून झाला आहे. शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांचा त्यांच्याच शेजारी राहत असलेल्या प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याने खून केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडी येथे मृतदेह घेऊन जात असताना संशयिताना पोलिसांनी पकडले. याबाबतची फिर्याद संदेश सर्जेराव मोरे (वय 27 रा. सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स बी विंग, चरणीपाडा अंजुरफाटा भिवंडी) यांनी भिवंडी पोलिसात दिली आहे.
पुढील तपासासाठी सदर गुन्हा शाहूवाडी पोलिसाकडे वर्ग केला आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे या संशयित आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील यांच्या घरानजीकच रहात होत्या. त्या प्रकाश उर्फ बाबू यांना तू माझ्याशी लग्न कर असे म्हणून सतत धमकावत होत्या.
या त्रासाला कंटाळून रविवार 26 जुलै रोजी अकरा वाजता लिडोरीचा वाड्याजवळ संशयिताने म्हशीच्या गोठ्यात सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केला. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित स्वत:च्याच इको गाडीतून मृतदेह भिवंडीकडे घेऊन जात होता. अधिक तपासावेळी गाडी भिवंडी पोलिसांनी पकडली. यावेळी घटना उगडकीस आली. याबाबत संदेश मोरे यांनी भिवंडी पोलिसात फिर्याद दाखल केली.
संशयित आणि मयत यांची शेती व अन्य कामे एकत्रच केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नेहमी एकत्र असलेल्या ठिकाणी अशी घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी दिवसभर दबक्या आवाजात शिरगावसह परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती.
शाहुवाडी पोलीस भिवंडीकडे रवाना
दरम्यान घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस स्टेशन येथे होताच संशयितासह मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पथक भिवंडीकडे रवाना झाले आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. सूर्यवंशी हे करत आहेत.
