Headlines

JNPA Accident Container Collapses in Wind Worker Dies and Others Injured


JNPA टर्मिनल परिसरात भीषण दुर्घटना घडली. वाऱ्याचा वेग इतका होता की, भलंमोठं कंटनेट थेट कामगारांवर कोसळलं. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत.

Uran News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, नवी मुंबई : उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) परिसरातील न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) येथे शनिवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. नियमित काम सुरू असताना अचानक आलेल्या तीव्र वादळामुळे रचून ठेवलेले काही रिकामे कंटेनर असंतुलित होऊन थेट खाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत अमितकुमार किशोर प्रसाद (वय १९, रा. बिहार) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

वादळाचा वेग जास्त असल्याने दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, वादळाचा वेग इतका प्रचंड होता की कंटेनर कोसळण्याची घटना क्षणार्धात घडली आणि कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर बंदर परिसरात एकच खळबळ उडाली. इतर कामगारांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले, तर मृत अमितकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

अनेक गंभीर प्रश्न उपस्थित

या गंभीर दुर्घटनेनंतरही JNPA प्रशासन किंवा संबंधित शासकीय यंत्रणांकडून कोणतेही अधिकृत निवेदन अथवा माहितीपत्रक जारी करण्यात आले नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला असतानाही रात्रीच्या वेळी काम सुरू का ठेवण्यात आले? कंटेनरची सुरक्षित रचना (स्टॅकिंग) करण्यात आली होती का? आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक नियमांचे पालन झाले होते का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सखोल चौकशीची मागणी

घटनास्थळावरील काही प्रत्यक्षदर्शी कामगारांनी कंटेनर कोसळल्याच्या घटनेला दुजोरा देत बंदरातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यामुळे या दुर्घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय व जखमींना योग्य मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अधिकृत तपास अहवालानंतरच या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्रशासन प्रतिक्रिया देणार का?

संबंधित घटनेमुळे बंदरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंदरावर शेकडो कर्मचारी काम करत असतात. या कर्मचाऱ्यांचा सुरक्षा महत्त्वाची आहे. देशातील माल विदेशात पाठवण्यासाठी आणि विदेशातला माल देशात घेण्यासाठी बंदर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. पण अशा ठिकाणी काम करणारे कामगार पावसाळाच्या वेळी सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेवर प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा