Tehsildar Vijay Chavan Story : एसीबीने लाच प्रकरणात अटक केलेले विजय चव्हाण हे जवळपास 19 वर्षांपासून शासकीय सेवेत असून ते मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधारचे रहिवासी आहेत.

जनतेचा अधिकारी की भ्रष्टाचाराचा चेहरा?
लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर विजय चव्हाण यांच्यावर समाजमाध्यमांवरून जोरदार टीका होत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर असल्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच घेताना अटक होणं हे सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक ठरलं आहे. अटकेच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ते एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन रस्त्याचा प्रश्न सोडवल्याचा दावा करताना दिसतात. ‘पाहणी, संवाद आणि तातडीने तोडगा’, असा संदेश देत त्यांनी स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झटणारा अधिकारी म्हणून सादर केलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी एसीबीच्या कारवाईने या प्रतिमेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
छोट्या तांड्यातून अधिकारीपदापर्यंतचा प्रवास
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानशेवडी गणातांडा या छोट्याशा गावातील विजय चव्हाण यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जात होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवत सरकारी सेवेत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवले. डिसेंबर 2009 मध्ये मुंबई येथे त्यांनी पीएसआय म्हणून सेवेला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांनी अधिक मोठे ध्येय ठेवत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली आणि 2011 मध्ये पीएसआय पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नायब तहसीलदार पदासाठी निवड मिळवत महसूल प्रशासनात प्रवेश केला. गावातील एका तरुणाने अधिकारीपद मिळवल्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचा गौरव होत होता. अनेक युवक त्यांना आदर्श मानत होते.
महसूल विभागातील दीर्घ अनुभव
जवळपास 19 वर्षांच्या शासकीय सेवेत विजय चव्हाण यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. कंधार तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा बजावली, त्यानंतर अतिरिक्त तहसीलदार म्हणूनही त्यांनी काम केलं. 2021 मध्ये कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी (CO) म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. त्याचबरोबर मुखेड नगरपालिकेतही मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या कारकीर्दीतील मोठा कालावधी हा नांदेड जिल्ह्यात गेला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची जालना जिल्ह्यातील अंबड येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. महसूल विभागातील अनुभव आणि प्रशासनातील सक्रियता यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली होती.
कायद्याचे शिक्षणही घेतलं
प्रशासकीय सेवेसोबतच विजय चव्हाण यांनी शिक्षणालाही प्राधान्य दिलं. 2020 साली त्यांनी कंधार येथील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली. तसेच, कायद्याची पदव्युत्तर पदवी (LLM) घेत असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली होती. कायद्याचं सखोल ज्ञान आणि प्रशासनातील अनुभव यामुळे त्यांची प्रतिमा अभ्यासू आणि सक्षम अधिकारी अशी तयार झाली होती. मात्र, आता त्याच अधिकाऱ्यावर लाचखोरीचे गंभीर आरोप सिद्ध होण्याच्या दिशेने चौकशी सुरू असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठवाड्यातील दुसरी मोठी कारवाई
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील कारवाई ही मराठवाड्यातील अलीकडील काळातील मोठ्या एसीबी कारवायांपैकी एक मानली जात आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कामांसाठी नागरिकांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत उच्च पदावरील अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
Rajendra Jain : भुजबळांची अट पक्षश्रेष्ठींनी धुडकावली, प्रफुल पटेलांचा विश्वासू शिलेदार राज्यसभेवर, NCP च्या अडीच तासांच्या बैठकीत काय घडलं?
एकेकाळी गावाचा अभिमान मानला जाणारा अधिकारी आज भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. छोट्या तांड्यातून सुरू झालेला यशाचा प्रवास आता एका गंभीर आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागातील कामकाज, अधिकारी वर्गातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

