Partur School Controversy Jalna district: जालना जिल्ह्यातील परतूर येथील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’मध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनातील कार्यक्रम आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात आक्षेपार्ह गाणी वाजवणे, विद्यार्थ्यांकडून तलवारींसह नृत्य करून घेणे आणि एलईडी स्क्रीनवर पाकिस्तानातील दहशतवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र प्रदर्शित केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या चौकशीअंती शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिक्षकासह तिघांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

परतूर येथील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’मध्ये २२ फेब्रुवारी २०२४ रोजी नगर परिषद सांस्कृतिक सभागृहात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील काही दृश्ये आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. कार्यक्रमात वाजविण्यात आलेल्या काही गाण्यांचा आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या नृत्यात तलवारींचा वापर करण्यात आल्यानेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
याच कार्यक्रमादरम्यान एलईडी स्क्रीनवर पाकिस्तानातील दहशतवादी मुमताज कादरी याचे छायाचित्र दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून तसेच विविध संघटनांकडून पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान कार्यक्रमाचे नियोजन, सादरीकरणाची तयारी आणि त्यामागील जबाबदारी याबाबत माहिती संकलित करण्यात आली. तपासात संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या सादरीकरणासाठी प्रशिक्षण दिल्याचेही समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुख्याध्यापकासह दोन जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक महम्मद वजियोद्दीन तारिक सिद्दीकी आणि शिक्षक शेख साजिद अब्दुल गणी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गोविंद भगवानराव पवार यांनी फिर्याद दिली असून परतूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शाळांमध्ये आयोजित होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आशयावर आणि त्याच्या देखरेखीवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमांची जबाबदारी नेमकी कोणाची आणि त्याचे परीक्षण कसे व्हावे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील तपासानंतर आणखी कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी
स्थानिक भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शाळेची मान्यता रद्द करण्यासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे.
“हिंसेचे प्रदर्शन खपवून घेणार नाही”
पोलीस प्रशासनाकडून तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित शैक्षणिक संस्थेबद्दल शिक्षण विभाग त्यांची कारवाई करेल. या प्रकरणात एक शिक्षक, अँकर आणि संस्थेतील एका संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या आवारात शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करताना सामाजिक सलोखा पाळला जाईल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. विनाकारण कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ कार्यक्रमात दाखवून हिंसेचे प्रदर्शन करू नये.
– तेघबीर सिंह संधू, पोलीस अधीक्षक, जालना

