Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

साडेतीन वर्षाच्या मुलाला विहिरीत जोराचा धक्का
काल सोमवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास किनगाव शिवारातील आरोपींच्या मालकीच्या शेतात ही घटना घडली. फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय 27) आणि तिचा पती स्वप्निल भागवत पाटील (वय 34) हे दोघे विहिरीची पूजा करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी विहिरीजवळ असताना सासू आशाबाई भागवत पाटील हिने सरस्वती आणि तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला विहिरीत जोराचा धक्का देऊन पाडलं.
Nashik News: नाशिकमध्ये २८ रस्त्यांना मंजुरी, छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याला निधी; कुठून-कसे असतील मार्ग?
विहिरीत पडल्यानंतर सरस्वतीने तेथील लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्याने ती बचावली. विहिरीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या मातेनं काळजाचा थरकाप उडवणारा टाहो फोडला, पण दुर्दैवाने तिच्या कुशीतील सोन्यासारख्या चिमुकल्याचा पाण्यात गुदमरून अंत झाला. पोटच्या गोळ्याला कायमचं गमावल्याचं अथांग दुःख आणि रक्ताच्याच नात्यांनी केलेल्या या अमानुष विश्वासघातामुळे ती अंध माता आज सुन्न होऊन अश्रू ढाळत आहे. अंध मुलगा कृष्णा पाण्यात बुडाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना केवळ एक अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. विहिरीत पडल्यानं महिला जखमी झाली होती, तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
सोनोग्राफीमध्ये होणारं बाळही अंध
सुरुवातीला मानसिक धक्क्यामुळे तिने पोलिसांना कोणताही जबाब दिला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, घटनेची वेळ आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्यानं, लहान मुलाच्या अंत्यविधीनंतर रात्री उशिरा पोलिसांनी जखमी महिलेची सखोल विचारपूस केली. यावेळी महिलेनं तिच्यासोबत घडलेला हा क्रूर प्रकार पोलिसांसमोर मांडला. सासूने विहिरीत ढकललं आणि त्यात पतीचाही सहभाग असल्याची तक्रार तिने नोंदवली. या घटनेमागील कारण अत्यंत वेदनादायी आहे.
Washim Crime : समृद्धी महामार्गावर कारने आनंदाने प्रवास, क्षणात दोघांमध्ये कडाक्याचं भांडण, लेकरांसमोर पतीने पत्नीला कारमध्येच संपवलं
फिर्यादी सरस्वती ही 70 टक्के अंध असून तिचा पती स्वप्निल हा 100 टक्के अंध आहे. गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीमध्ये होणारं बाळही अंध असेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे आरोपी पती हा गर्भपात करण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, सरस्वतीने हट्ट धरून बाळाला जन्म दिला. याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते आणि यामुळेच सरस्वती गेल्या अडीच वर्षांपासून तिच्या माहेरी राहत होती.
दरम्यान, या वादाचा अंत या दुर्दैवी घटनेनं झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तात्परतेने कारवाई करत आरोपी पती स्वप्निल भागवत पाटील आणि सासू आशाबाई भागवत पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

