Headlines

IND vs ENG 3rd ODI Shubman Gill asked About Rohit Sharma Last ODI rumors post 138 vs England


IND vs ENG 3rd ODI : रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने झळकावलेले कारकिर्दीतील ३४ वे एकदिवसीय शतक हे सर्वात महत्त्वाचे ठरले.

Ind vs END ODI Rohit Sharma Shubman Gill Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लंडन : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे सामन्यांमध्ये तीन द्विशतके आणि ३३ शतके जमा आहेत; यापैकी सात शतके त्याने विश्वचषकात झळकावली आहेत. तरीही रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध केलेले त्याचे ३४ वे एकदिवसीय शतक हे कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे ठरले. कारण कर्णधारपद भूषवलेल्या ३९ वर्षीय रोहितसाठी ही एक अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती होती. २०२७ च्या विश्वचषकापर्यंत तो आपला सर्वोत्तम फॉर्म टिकवून ठेवू शकेल का, याबद्दल दिवसेंदिवस अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भारतावर पराभवाची नामुष्की

अस्तित्वाची लढाई आणि गौरवशाली कारकीर्द पणाला लागलेली असताना, रोहित शर्माने आपल्या टीकाकारांची तोंडे ‘हिटमॅन’ शैलीत बंद केली. त्याने अलिकडच्या काळातील आपल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक झळकावले, मात्र इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ते पुरेसे ठरले नाही. २७ धावांनी पराभव झाल्यामुळे भारताला १-२ अशा फरकाने मालिका गमवावी लागली.

बेन डकेटची कारकिर्दीतील सर्वोत्तम १४२ धावांची खेळी आणि जेकब बेथेलच्या ९१ धावांच्या जोरावर इंग्लंडने उभारलेल्या ३८८ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितच्या शानदार १३८, शुभमन गिलच्या ७७ आणि विराट कोहलीच्या ७४ धावांच्या खेळींनंतरही भारताला ७ बाद ३६० धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने शेवटच्या पाच षटकांत ८२ धावा केल्या. त्यात जोस बटलरने १३ चेंडूंत केलेल्या ४१ धावा निर्णायक ठरल्या.
Maharashtra TimesRohit Sharma : नाद करता काय! रोहित शर्माचे तुफानी शतक, लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर पठ्ठ्याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

रोहितला वगळ्याच्या चर्चा

सिलेक्शन कमिटी आणि मुख्य प्रशिक्षक रोहितला संघातून वगळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहितवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी प्रचंड दडपण होते. रोहित लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दोन उद्दिष्टं घेऊन उतरला होता. एक म्हणजे साहजिकच भारताला मालिका जिंकवून देणे. दुसरं म्हणजे मीडिया आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांमुळे डागाळली जाणारी आपली प्रतिष्ठा जपणे.

रोहित भाई काही बोलला नाही

सामन्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलला रोहितच्या भविष्याबाबतच्या उलटसुलट चर्चांविषयी विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला “हा त्याचा शेवटचा सामना असेल, याबद्दल रोहितने आम्हाला काहीही सांगितलेले नाही. या सर्व गोष्टी केवळ प्रसारमाध्यमांमध्येच आहेत.”

रोहितला खेळताना पाहणं ही पर्वणी

भारतीय क्रिकेटमधील रोहित आणि कोहलीच्या योगदानाबद्दल बोलताना शुभमन म्हणाला, “गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात विविध ठिकाणी खरोखरच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज रोहित भाईने ज्या प्रकारे फलंदाजी केली, विशेषतः १४० धावांची खेळी साकारली, त्याचा मला खूप आनंद झाला आहे. मला वाटतं की अखेरीस खेळपट्टी थोडी संथ झाली होती; त्यामुळे त्या धावा करणं सोपं नव्हतं. पण त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती पाहणं खरोखरच एक पर्वणी होती.”

रोहितच्या खेळीला १७ चौकार आणि पाच षटकारांचा साज चढला होता. यातील तीन षटकार त्याने जोश टंगच्या गोलंदाजीवर मारले. एक ‘पुल’ शॉट, एक डाउन द ग्राउंड मारलेला फटका आणि एक लाँग ऑनच्या दिशेने मारलेला फटका होता. इंग्लंडसाठी गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सॅम करनच्या (१० षटकांत ४/७५) गोलंदाजीवरही त्याने एक पुल षटकार लगावला होता.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर
भारताने जरी ही मालिका गमावली असली, तरी एक गोष्ट जवळपास निश्चित मानली जाते. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या विश्वचषकापर्यंत रोहित किंवा विराट यांपैकी कोणीही संघातून बाहेर जाणार नाही.