UP Viral wedding video: एक पत्नी असताना एक तरुण गुपचूप दुसरं लग्न करत होता. मात्र, त्याच्या पहिल्या पत्नीनं लग्नमंडपात शिरून एकच गोंधळ घातला. दरम्यान, नवरदेव तिथून गुपचूप पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कानपूरमधील या लग्नाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आता तुम्हीच सांगा, अशा मंडळींवर कोणती कारवाई केली पाहिजे?

नेमकं प्रकरण काय आहे?
ही घटना कानपूरमधील चकेरी भागात घडली आहे. नवरदेवाचं नाव आसिफ मोहम्मद आहे. त्यानं २०२२ मध्ये सहाना हसन नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाले. परिणामी, २०२४ पासून दोघेही वेगळे राहू लागले. दरम्यान, सहानानं आसिफविरोधात कौटुंबिक अत्याचाराचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे, आसिफने वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात प्रलंबित होता. मात्र, दोघांचा घटस्फोट झालेला नव्हता. याच दरम्यान आसिफनं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या पत्नीनं लग्नमंडपात शिरून एकच गोंधळ घातला आणि नवरदेवाचं दुसरं लग्न रोखलं.
नवरदेवाला पोलिसांनी पकडलं
हा व्हिडीओ @PredatorVolk या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पहिली पत्नी नववधूला म्हणताना दिसते, “तुला माहीत आहे मी कोण आहे? मी यांची पहिली पत्नी आहे. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही आणि मी हे लग्न होऊ देणार नाही.”
यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. नवरदेवानं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहानासोबत आलेल्या पोलिसांनी आसिफला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. महिलेच्या आरोपांमागील सत्य काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

