Headlines

Hydrogen Train: ‘हरित’पथगामिनी… – pm modi flags off indias first hydrogen- powered train


India’s First Hydrogen Train: ​​हरियाणातील जिंद ते सोनीपत या ८९ किमी. मार्गावर धावणाऱ्या या गाडीला पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे वळण आहे. त्याचे महत्त्व विविधांगी आहे.

hydrogen train.
hydrogen train(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
भारतासारख्या उभ्या आडव्या पसरलेल्या अवाढव्य देशातील रेल्वेचे जाळे ७० हजार किमीपेक्षा अधिक आहे. इतक्या मोठ्या जाळ्यातील जवळपास ९९ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे. हा सारा गाडा चालवण्यासाठी वीज किती लागत असेल, याची कल्पना करता येईल. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी जवळपास दोन टक्के वीज ही एकट्या रेल्वेला लागते. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेच्या ताफ्यात हायड्रोजन रेल्वेचा समावेश होणे ही महत्त्वाची घटना आहे.

आखातामधील धुमश्चक्रीने अनेक देशांप्रमाणे भारताचेही इंधनासाठीचे अवलंबित्व ठळकपणे अधोरेखित झाले. हायड्रोजन रेल्वेमुळे पर्यायी इंधनाचा एक नवा स्रोत समोर आलेला आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे सन २०३०पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत जवळपास शून्य प्रदूषणकारी अशा या ‘ हरितपथगामिनी ’चे स्वागतच करायला हवे.

हायड्रोजन व वातावरणातील ऑक्सिजन यांच्या संयोगातून, प्रक्रियेतून होणारी वीजनिर्मिती हे या गाडीचे इंधन. आजमितीसह आपल्या देशातील एकूण गाड्यांपैकी ३७ टक्के गाड्या या डिझेलवर चालतात. त्यातून होणारे प्रदूषण लक्षात घेता हायड्रोजन रेल्वेचे मोल कळावे. या गाडीचे आत्ताचे तिकीटदर पाच रुपये ते २५ रुपये एवढेच आहेत. शिवाय, जेथे विद्युतीकरण करणे महाकठीण आहे, अशा दुर्गम, डोंगराळ भागांत ही रेल्वे चांगलीच उपयुक्त ठरू शकते. अर्थात, हे असे लाभ घ्यायचे तर दुसरीकडे त्यांची किंमतही मोजावी लागणारच. त्यातील सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी बांधण्यासाठी येणारा खर्च.

डिझेलवर चालणारी गाडी बांधण्यासाठी साधारण १२ ते १४ कोटी रुपये खर्च येत असताना, हायड्रोजन गाडीसाठीचा खर्च साधारण ७० ते ८० कोटींच्या घरात जातो. त्याशिवाय, ती चालवण्यासाठी लागणारा खर्चही जवळपास तेवढाच. म्हणजे हे प्रकरण चांगलेच खर्चिक आहे. त्यातून शंका उद्भवते… तूर्तास, या गाडीचे तिकीटदर अल्प असले तरी येत्या काळात ते अवाच्या सव्वा वाढतील का, अशी. तसे झाल्यास या गाडीचा ‘पांढरा हत्ती’ व्हायचा. तसे होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची. सरकार ही जबाबदारी पार पाडेल, ही आशा.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा