Rent Agreement Tips: आजच्या काळात घर घेणं सोपं नाही. मालमत्तेच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे कामानिमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक होणारे बहुतेक लोक भाड्याने राहणे पसंत करत आहेत. पण, घर भाड्याने घेताना घरमालकाशी योग्य भाडेकरार करणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

भाडे किती आहे?
घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंटचे दरमहिन्याचे भाडे हा भाडे करारातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. भाड्याची रक्कम भविष्यातील देय रकमांचा आधार असल्यामुळे अचूक रक्कम नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय भाड्यात मेंटेनन्स, पार्किंग शुल्क किंवा इतर खर्चांचा समावेश आहे की नाही, हेही स्पष्ट नमूद केले पाहिजे नाहीतर नंतर वाद होऊ शकतात.
सिक्युरिटी डिपॉझिट किती?
भाड्याने जागा घेताना भविष्यातील नुकसान भरून काढण्यासाठी घरमालक आधीच सिक्युरिटी डिपॉझिट जमा करण्यास सांगतो. त्यामुळे, करारामध्ये ठेवीची नेमकी रक्कम लिहिलेली आहे आणि घराचा ताबा सोडल्यावर रक्कम परत मिळेल, याची भाडेकरूने खात्री केली पाहिजे. पण काही नुकसान झाल्यास संबंधित रक्कम कापली जाऊ शकते.
लॉक-इन कालावधी आणि नोटीस कालावधी
अनेक भाडे करारांमध्ये एक लॉक-इन कालावधी असतो, म्हणजे भाडेकरू या वेळेपूर्वी जागा खाली किंवा सोडून जाऊ शकत नाही. भाडेकरूने तसे केल्यास संपूर्ण भाडे भरावे लागते. त्यामुळे निवासी मालमत्तांवर लॉक-इन कालावधी न ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच करारामध्ये दोन्ही पक्षांसाठी नोटीस कालावधी देखील स्पष्ट नमूद असला पाहिजे.
सामान्य झीजेचे नियम
सामान्य झीज आणि वापरासाठी भाडेकरू जबाबदार नाही, असेही भाडे करारामध्ये नमूद केले पाहिजे जेणेकरून दीर्घकाळ वास्तव्यादरम्यान होणारे किरकोळ नुकसान भाडेकरूवर लादले जाऊ नये आणि भाडेकरू केवळ मोठ्या नुकसानीसाठीच जबाबदार असेल.
घरात उपलब्ध असलेल्या सुविधांची यादी
करारामध्ये घरात उपलब्ध सर्व सोयीसुविधा आणि उपकरणांची, जसे की फर्निचर, गिझर, पंखे, दिवे इत्यादी संपूर्ण यादीची नोंद असली पाहिजे. यामुळे सुरुवातीला कोणत्या सोयीसुविधा पुरवल्या होत्या आणि कोणत्या नाही, याबद्दल गोंधळ टाळणे शक्य होते.
कोणतीही देयके थकीत नाही
भाडे कराराचा ड्राफ्ट तयार करताना घराची कोणतीही थकबाकी (वीज, सोसायटीची देखभाल किंवा पाण्याची बिले असोत) नाही याची खात्री करा. ही बिले सुरुवातीलाच भरली नाहीत, तर नंतर भरण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.
भाडेवाढ आणि कराराचे रिन्यूअल
भाडेकरार केव्हा रिन्यू केला जाईल आणि नूतनीकरण झाल्यावर किती भाडेवाढ होईल, हेही स्पष्ट नमूद केले पाहिजे. बरेच लोक हा मुद्दा विसरतात आणि नंतर अचानक भाडेवाढमुळे वाद निर्माण होतात.
करार करून घ्यायचा खर्च कोण उचलेल?
तसेच लक्षात घ्या की भाडेकरार तयार करण्यातही खर्च होतो. त्यामुळे हा खर्च कोण देणार — भाडेकरू की घरमालक? हेही आधीच नक्की करून घ्या. सहसा खर्च घरमालक कराराचा देतो, पण काही प्रकरणांमध्ये भाडेकरूकडूनही वसूल केला जातो.
मालमत्तेचा वापर कशासाठी केला जाईल?
करारामध्ये घराचा वापर कोणत्या उद्देशासाठी केला जाईल याचाही उल्लेख असला पाहिजे. उदाहरणार्थ, फक्त राहण्यासाठी किंवा छोटे ऑफिस म्हणून असे स्पष्ट केले गेले पाहिजे. तसेच एखाद्या विशिष्ट कारणासाठी घराचा वापर करणार असाल, तर त्याचाही उल्लेख करारामध्ये आगाऊ करणे विसरू नका.
निर्बंधांविषयी माहिती
याशिवाय शेवटी भाडे करारात सर्व निर्बंधही नमूद केले पाहिजे. जसे की घर इतर कोणालाही पोटभाड्याने न देणे, घरात मोठे बदल न करणे इत्यादी, ज्यामुळे पुढील कोणत्याही वादाची शक्यता टाळता येऊ शकेल.

