हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज असून ती विषाणूंच्या संसर्गासह दारू, काही औषधे किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. A, B, C, D आणि E हे त्याचे प्रमुख प्रकार आहेत. काही प्रकार स्वतःहून बरे होऊ शकतात, तर B आणि C दीर्घकाळ राहिल्यास सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. हेपेटायटिसची लक्षणे, लिव्हर फेल्युअरची धोकादायक चिन्हे, लसीकरण, चाचण्या आणि उपचार जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हेपेटायटिसचे विविध प्रकार आणि त्यांच्या प्रसाराची कारणे
- हेपेटायटिस A आणि E : दूषित अन्न आणि दूषित पाण्याचा वापर केल्याने किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग पसरतो. अस्वच्छता असलेल्या भागांत याचा प्रसार जास्त होतो. (हेपेटायटिस E गर्भावस्थेत अधिक गंभीर रूप धारण करू शकतो).
- हेपेटायटिस B आणि C : दूषित रक्त आणि शरीरातील द्रव्यांद्वारे हा संसर्ग पसरतो. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुयांचा वापर आणि बाळंतपणादरम्यान आईकडून बाळाला संसर्ग होणे यांद्वारे हेपेटायटिस B पसरतो. तर हेपेटायटिस C प्रामुख्याने दूषित रक्ताच्या थेट संपर्कामुळे पसरतो.
- हेपेटायटिस D : हा एक असामान्य विषाणू आहे, जो केवळ आधीच हेपेटायटिस B चा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्येच वाढू शकतो आणि यामुळे स्थिती अधिक गंभीर होते.
हेपेटायटिसची सामान्य लक्षणे कोणती असतात?
अनेकदा हेपेटायटिसचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि व्यक्तीला संसर्ग झाल्याची कल्पनाही नसते. परंतु, जेव्हा लक्षणे दिसू लागतात तेव्हा खालील समस्या जाणवतात:
- सतत तीव्र थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
- भूक मंदावणे, ताप येणे, मळमळ आणि उलट्या होणे.
- पोटात अस्वस्थता किंवा दुखणे.
- लघवीचा रंग गडद (Dark urine) होणे
- विष्ठा फिकट किंवा मातीसारख्या रंगाची (Clay-coloured stool) होणे.
- त्वचेला खाज सुटणे आणि सांधेदुखी होणे.
- कावीळ (Jaundice) होणे, ज्यामध्ये त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडतो.
लिव्हर फेल्युअर आणि त्याची प्राणघातक लक्षणे
बहुतेक लोकांमध्ये हेपेटायटिसचा संसर्ग (विशेषतः लहानपणी होणारी कावीळ) शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे स्वतःहून बरा होतो. परंतु, काही प्रकरणांमध्ये या आजाराचे रूपांतर लिव्हर फेल्युअर मध्ये होते, जी एक अत्यंत गंभीर आणि आणीबाणीची वैद्यकीय स्थिती आहे.
- मानसिक बदल व गोंधळ (Hepatic Encephalopathy): यकृत निकामी झाल्यामुळे रक्तातील विषारी घटक बाहेर फेकले जात नाहीत आणि ते मेंदूपर्यंत पोहोचतात. यामुळे रुग्णाला गोंधळ उडणे, वर्तनात अचानक बदल होणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे, विचार करण्यास अडचण येणे, अतिशय झोप येणे, बोलताना शब्द अडखळणे किंवा साभानता गमावणे (Loss of consciousness) ही अतिशय प्राणघातक लक्षणे दिसतात. पुढे जाऊन मेंदूला सूज येणे आणि मूत्रपिंड (Kidney) निकामी होणे असा धोका निर्माण होतो.
- वेगाने वाढणारी कावीळ : त्वचेचा आणि डोळ्यांचा पिवळसरपणा अचानक आणि वेगाने वाढणे.
- अस्वस्थ करणाऱ्या उलट्या आणि पोटदुखी : पोटात तीव्र वेदना होणे आणि वारंवार उलट्या होणे.
- रक्तस्राव आणि सूज : सहजासहजी अंगावर निळसर डाग पडणे, अस्पष्ट कारणाने रक्तस्राव होणे आणि पोटाचा आकार सतत फुगणे (सूज येणे).
हेपेटायटिस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
योग्य काळजी आणि लसीकरणामुळे हेपेटायटिसचा संसर्ग टाळता येऊ शकतो:
- लसीकरण : हेपेटायटिस A आणि B साठी अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे. हेपेटायटिस B ची लस घेतल्यास हेपेटायटिस D पासूनही आपसुकच संरक्षण मिळते.
- वैयक्तिक स्वच्छता : स्वच्छ पाण्याचा वापर करणे, अन्न झाकून ठेवणे, योग्य स्वच्छता राखणे आणि नियमित हात धुण्यामुळे हेपेटायटिस A आणि E चा प्रसार रोखता येतो.
- रक्ताचा संपर्क टाळणे : दुसऱ्याच्या सुया, सिरिंज, रेझर किंवा रक्ताचा स्पर्श होऊ शकणाऱ्या वस्तू कधीही वापरू नका. तसेच टॅटू काढताना किंवा वैद्यकीय उपचारादरम्यान निर्जंतुक उपकरणांचाच वापर केला जाईल याची खात्री करा.
- सुरक्षित लैंगिक संबंध : सुरक्षित लैंगिक संबंधांच्या सवयींमुळे हेपेटायटिस B चा धोका कमी होतो.
वेळेवर चाचणी आणि उपचारांचे महत्त्व
हेपेटायटिस B आणि C ची लक्षणे न दिसता ते शरीरात अनेक वर्षे राहू शकतात. त्यामुळे वेळेवर चाचणी करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून यकृताचे कायमचे नुकसान होण्यापूर्वी उपचार सुरू करता येतात.
- हेपेटायटिस C पूर्ण बरा होतो : योग्य अँटीव्हायरल उपचारांमुळे ९५% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये हेपेटायटिस C पूर्णपणे बरा होऊ शकतो.
- हेपेटायटिस B वर नियंत्रण : हेपेटायटिस B पूर्णपणे नष्ट करता येत नसला तरी औषधांद्वारे तो नियंत्रणात ठेवता येतो.
- औषधांचा अतिवापर टाळा : ‘पॅरासिटामॉल’सारखी (Paracetamol) औषधे योग्य प्रमाणात सुरक्षित असतात, परंतु अतिप्रमाणात घेतल्यास ती यकृतासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
अल्टरनेटिव्ह मेडिसिन घेण्याचे धोके आणि सावधगिरीचा इशारा
कावीळ लवकर बरी व्हावी म्हणून अनेक लोक ॲलोपॅथी सोडून इतर पर्यायी किंवा पारंपरिक उपचारांकडे (Alternative therapies) वळतात. परंतु, अशा उपचारांमुळे लिव्हरअत्यंत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो:
- स्वतःहून बरा होणारा आजार : बहुतेक तीव्र हेपेटायटिस (Acute hepatitis) हे शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती विषाणूंना बाहेर काढून टाकते तेव्हा स्वतःहून बरे होतात. यासाठी केवळ ताप किंवा वेदना या लक्षणांवर उपचार आणि रक्ताची नियमित तपासणी पुरेशी असते.
- यकृत निकामी होण्याचा धोका : पर्यायी उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमधील अनधिकृत किंवा अज्ञात घटकांमुळे (Unknown ingredients) यकृताचे आजार अधिक बळावू शकतात. यामुळे साध्या हेपेटायटिसचे रूपांतर ‘ॲक्यूट लिव्हर फेलीअर’ (Acute Liver Failure) मध्ये होऊ शकते. अशा वेळी रुग्णाला वाचवण्यासाठी तातडीने ‘यकृत रोपण’ (Liver Transplant) करण्याची वेळ येऊ शकते.
- कावीळ किंवा हेपेटायटिसची लक्षणे दिसल्यास कोणत्याही अनधिकृत पर्यायी उपचारांच्या मागे न लागता, त्वरित फिजीशियन किंवा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (यकृत तज्ज्ञ) डॉक्टरांचा सल्ला घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

