Gold-Silver Rate Today Updates: सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सध्या फारशी अस्थिरता दिसत नाही, पण जगासह भारतीय बाजाराचे लक्ष आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक – यूएस फेडच्या – बैठकीवर आणि सणासुदीच्या दिवसांवर लागून असेल. सोने, चांदी आणि दागिन्यांच्या बाजाराची भविष्यातील संभाव्य बदलांविषयी जाणून घ्या.

फेडचे व्याजदर अन् सोन्यात कनेक्शन काय?
बुधवार, 29 जुलै रोजी, MCX वर सोन्याच्या किमतीत किंचित घट नोंदवली गेली. मजबूत अमेरिकी डॉलर आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हचा आगामी व्याज दरांसंदर्भातील निर्णय यामागील सर्वात मोठी कारणे असल्याचे मानले जात आहे. फेडच्या निर्णयामुळे महागाई आणि सोन्याच्या किमतींची भविष्यातील दिशा निश्चित होऊ शकते, असे गुंतवणूकदारांचे मत आहे. तसेच येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतींची दिशा मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या व्याजदर निर्णयावर अवलंबून असेल, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोने-चांदीच्या दरांवरील दबावाची कारणे काय?
सध्या अनेक जागतिक घटक सोने आणि चांदीवर दबाव आणत असल्याचे कमोडिटी बाजार तज्ज्ञांच्या म्हणणे आहे. यापैकी पहिले कारण यूएस फेडच्या बैठकीपूर्वी व्याजदर वाढीची भीती असून त्यानंतर डॉलर दिवसेंदिवस मजबूत होणे आणि कच्च्या तेलाबाबत अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात चढ-उतार दिसत आहे. सोने आणि विशेषतः चांदीच्या दरात सध्यापुरती घसरण होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज असून फेडने अधिक कठोर संकेत दिल्यास मौल्यवान धातूंवर काही काळ दबाव टिकून राहू शकतो.
चांदीच्या दरात आणखी करेक्शन होण्याची शक्यता
दुसरीकडे केवळ व्याजदरच नाही, तर जागतिक बाजारातील औद्योगिक मागणीबद्दल चिंता कायम असल्यामुळे सध्या जागतिक बाजारात सोन्यापेक्षा चांदीवर अधिक दबाव असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अल्पावधीत चांदीच्या किंमतीत आणखी चढ-उतार दिसून येऊ शकतात. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील हालचाली आणि जागतिक संकेतांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे बाजाराची नजर
बुधवारी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची दोन दिवसीय बैठक संपेल. फेडरल रिझर्व्ह यंदा व्याजदर ‘जैसे थे’ ठेवेल असे सध्या बाजाराला अपेक्षित आहे, पण फेडवॉच टूलनुसार, दर व्याजदर सध्याच्या पातळीवरच राहण्याची 70% शक्यता बाजारात दिसत आहे, तर 30% शक्यता किमान 25 बेस पॉइंट्सच्या दरवाढीचे संकेत देत आहेत. याशिवाय सप्टेंबरमध्ये दरवाढ होण्याची अंदाजे 76% शक्यता वर्तवली जात आहे.
सणोत्सव अन् लग्नसाईराचा बाजाराला आधार
गेल्या काही महिन्यातील घसरणीनंतर आता सराफा बाजार हळूहळू सुधारत असल्याची चिन्हे दिसत आहेत. उच्चांकी मजल मारल्यावर सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली पण, आता आता सोन्याचे भाव स्थिर होत असल्याने व्यवसायांना काहीसा दिलासा मिळू शकतो. येत्या काही महिन्यांत रक्षाबंधन, सणवार आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने ज्वेलर्सनी नवीन कलेक्शनची तयारी सुरू केली असून यावेळी, कंपन्या कमी बजेटमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन्स तयार करत आहेत.
आता सोन्यात गुंतवणूक योग्य ठरेल का?
तुम्हाला सणवार, लग्नसराई किंवा इतर महत्त्वाच्या प्रसंगासाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर सध्याच्या स्थिर किमती संधी ठरू शकतात. पण तुम्हाला फक्त गुंतवणूक करायची असल्यास फेडच्या बैठकीनंतर बाजाराची दिशा अधिक स्पष्ट होण्याची वाट पाहून निर्णय घेणे शहाणपणाचे ठरेल. अशा परिस्थितीत, येत्या काही महिन्यांत दागिन्यांच्या बाजारात तेजी येण्याची चिन्हे दिसत आहेत. पण सोन्याचे भाव असेच स्थिर राहिले, तर सण आणि लग्नसराईच्या काळात ग्राहकांची खरेदी वाढू शकते.
मजबूत डॉलरचा सोन्याच्या किमतींवर दबाव कसा पडतो?
अमेरिकी डॉलर सध्या एका महिन्याच्या उच्चांकावर आहे. सोन्याची किंमत डॉलरमध्ये मोजली जाते त्यामुळे अमेरिकी चलन मजबूत झाल्यास परकीय चलनात गुंतवणूकदारांना सोने खरेदी अधिक महाग होते. त्यामुळे मजबूत डॉलरमुळे अनेकदा सोन्याच्या किमतींवर दबाव पडतो.
पश्चिम आशियातील तणावावरही बाजाराची नजर
दुसरीकडे, फक्त फेडरल रिझर्व्हच नव्हे तर पश्चिम आशियातील तणावावरही बाजाराचे लक्ष लागून आहे. अमेरिकेच्या लक्ष्कराने इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला, तर यादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतून पुरवठा सुरळीत करण्यावरही चर्चा सुरू आहेत. त्याचवेळी, ओमानने आखाती देशांच्या पाठिंब्याने इराणला होर्मुझचे व्यवस्थान देऊ केले आहे, मात्र, या मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर कोणतेही शुल्क लावण्याची कल्पना अमेरिकेने फेटाळून लावली.
सोन्याला दिशा देणारे बाजारातील घटक
अशाप्रकारे, सध्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निर्णय, अमेरिकन डॉलरची चाल आणि पश्चिम आशियातील घडामोडींचा सोन्याच्या हालचालींवर सर्वाधिक प्रभाव पडेल. फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवले पण, कोणतेही कठोर संकेत दिल्यास येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठे चढ-उतार होऊ शकतात.

