Girish Mahajan Nashik: नवनियुक्त नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहील्यांदाच नाशिकला भेट दिली. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी विकास काम सुरू असल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर येणाऱ्या सहा महिन्यांत नाशिकचा कायापालट करू असा विश्वास व्यक्त केला .मात्र या भेटी दरम्यान मुंबई नाका परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.

पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले
पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महाजन बुधवारी (दि. १९) प्रथमच नाशिकमध्ये आले. मुंबई नाका येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. ते म्हणाले, सध्या सुरू असलेली कामे केवळ तात्पुरत्या गरजा भागविण्यासाठी नसून, पुढील ४० ते ५० वर्षांचा विचार करून केली जात आहेत.
मुंबई नाका येथे जय्यत तयारी
मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागताची पक्षातर्फे मुंबई नाका येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भाजपच्या तिन्ही आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. उत्तर महाराष्ट्र बैठकीत आमदार व्यग्र असल्यामुळे तेे उपस्थित राहू शकले नाहीत, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला.
पालकमंत्री गिरीश महाजनांच वक्तव्य
“नाशिक स्वच्छ,सुंदर , सुरक्षित आणि पायाभूत सुविधांनी सक्षम करण्यासह औद्योगिक व पर्यटन क्षेत्रात आघाडीचे शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य कारावे”
हिमगौरी आहेर- आडके महापौर
“नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत त्यांनी यापूर्वीही नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे.त्यांना विकासाची जाण असून योग्य नेतृत्व मिळाल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळेल”
कोंडीने मुंबई नाका दीड तास ठप्प
गर्दीमुळे वाहतूक ठप्प
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई नाकापरिसरात केलेल्या गर्दीमुळे वाहतूक अर्धा तासाहून अधिक काळ ठप्प झाली. त्यानंतरही दोन तास वाहतूक विस्कळीत राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.
नियोजित कामांवर पोहोचण्यास उशीर झाला
स्वागत कार्यक्रमामुळे मुंबई नाका परिसरात वाहनांचा वेग थांबला. द्वारका चौक, इंदिरानगर व काठेगल्ली सिग्नलकडून येणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी १० ते १२ या गर्दीच्या वेळेत हा गोंधळ झाल्याने अनेकांना कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि नियोजित कामांवर पोहोचण्यास उशीर झाला.
वाहनचालक त्रस्त
या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली. रुग्णवाहिकेला मार्ग काढण्यासाठी चालकाला कसरत करावी लागली. वाहनचालकांनी ‘हॉर्न’ वाजवत संताप व्यक्त केला. ‘व्हीआयपी’ ताफा आल्यावर सामान्य वाहनांना थांबवून मंत्र्यांच्या गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यात येत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते.

