Headlines

Ear Wax Cleaning Tips and remedies; Cotton Buds Side Effects & ENT Advice | कानातील मळ काढण्याची योग्य व सोपी पद्धत


कानातील मळ म्हणजे घाण असा समज करून अनेकजण कॉटन बड्स, पिन किंवा इतर वस्तूंनी कान साफ करतात. मात्र, ENT तज्ज्ञांच्या मते कानातील मळ हा कानाचे संरक्षण करणारा नैसर्गिक थर आहे. तो धूळ, जंतू आणि बुरशीपासून कानाचे रक्षण करतो. चुकीच्या पद्धतीने कान साफ केल्यास मळ आत ढकलला जाऊन कान ब्लॉक होणे, संसर्ग होणे किंवा कानाचा पडदा फाटण्याचा धोका वाढू शकतो. कान सुरक्षितपणे कसा स्वच्छ ठेवावा, डॉक्टरांकडे कधी जावे आणि कॉटन बड्स का टाळावेत, याबाबतची महत्त्वाची माहिती या लेखातून जाणून घ्या.

ear wax removal remedies
ear wax removal remedies
कानात जमा होणारा मळ म्हणजे केवळ ‘घाण’ (Dirt) आहे असा समज करून घेऊन लोक कॉटन बड्स (Cotton buds), केसांच्या पिन, काड्यापेटीच्या काड्या, सेफ्टी पिन आणि अगदी गाडीच्या चाव्यांचाही वापर कानात घालून तो काढण्यासाठी करतात. परंतु, वैद्यकीय विज्ञानानुसार कानातील मळ ही कोणतीही घाण नसून, कानाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली एक अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे.

कानाचा मळ घाण नाही, तर निसर्गाचे कवच आहे

कानाचा मळ घाण नाही, तर निसर्गाचे कवच आहे

वैद्यकीय भाषेत कानाच्या मळाला ‘सेरुमेन’ (Cerumen) म्हटले जाते. ही कानाच्या नलिकेतील ग्रंथींमधून निर्माण होणारी एक नैसर्गिक बाब आहे, ज्यामध्ये मृत त्वचा आणि वातावरणातील सूक्ष्म कणांचे मिश्रण असते. हा मळ कानासाठी एका सुरक्षा कवचासारखे काम करतो. तो कानाच्या आत धूळ, घाण, जिवाणू, बुरशी आणि इतर बाहेरील घटक जाण्यापासून रोखतो. तसेच, कानाच्या आतील नाजूक त्वचेला ओलसर ठेवून कोरडेपणा, खाज आणि जळजळ होण्यापासून वाचवतो.

कान स्वतःची स्वच्छता स्वतःच करतो

कान स्वतःची स्वच्छता स्वतःच करतो

अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण मानवी कानामध्ये स्वतःला साफ करण्याची उपजत क्षमता असते. कानाच्या आतील त्वचा हळूहळू आतून बाहेरच्या दिशेने वाढत असते, ज्यामुळे जुना झालेला मळ आणि अडकलेली धूळ आपोआप बाहेर ढकलली जाते. आपण जेव्हा अन्न चावतो, बोलतो किंवा जबड्याची हालचाल करतो, तेव्हा या हालचालींमुळे मळ कानाच्या छिद्रापाशी येऊन सुकतो आणि स्वतःहून गळून पडतो. त्यामुळे निरोगी कानाला बाहेरून कोणत्याही प्रकारे साफ करण्याची अजिबात गरज नसते.

कॉटन बड्स आणि घरगुती वस्तू वापरण्याचे गंभीर धोके

कॉटन बड्स आणि घरगुती वस्तू वापरण्याचे गंभीर धोके

कानात कॉटन बड्स घालणे ही लोकांची सर्वात सामान्य आणि तितकीच चुकीची सवय आहे. कॉटन बड्समुळे केवळ सुरुवातीचा थोडासा मळ बाहेर येतो, पण उर्वरित बहुतांश मळ कानाच्या नलिकेत अधिक खोलवर ढकलला जातो (Wax Impaction). यामुळे मळाचा घट्ट गोळा तयार होऊन कान पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतो. तसेच, केसांच्या पिन, चाव्या किंवा काड्या वापरल्यास कानाच्या आतील अत्यंत संवेदनशील त्वचेला जखम होऊ शकते, ज्यातून रक्तस्त्राव किंवा गंभीर इन्फेक्शन (संसर्ग) होण्याचा धोका वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या टोकदार वस्तू खोलवर गेल्याने कानाचा पडदा फाटण्याची (Perforated Eardrum) भीती असते.

कान साफ करण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत काय?

कान साफ करण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत काय?

कानाच्या सुरक्षेसाठी ईएनटी तज्ज्ञांचा एक गोल्डनरूल नेहमी लक्षात ठेवावा- “कानात तुमच्या कोपरापेक्षा लहान असलेली कोणतीही वस्तू घालू नका.” याचा सरळ अर्थ असा की कानाच्या नलिकेत काहीही घालू नका. अंघोळ करताना किंवा चेहरा धुताना कानाचा फक्त बाहेरील भाग (Outer Ear) एका मऊ कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यावा, बस एवढीच स्वच्छता कानासाठी पुरेशी असते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आणि मळ वाढण्याची कारणे

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आणि मळ वाढण्याची कारणे

काही व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्याच मळ जास्त प्रमाणात तयार होतो. तसेच, जे लोक सतत इयरफोन, हेडफोन किंवा हिअरिंग एड्स (श्रवणयंत्र) वापरतात, त्यांच्या कानात मळ जमा होण्याचे प्रमाण वाढू शकते. जर हा मळ जास्त प्रमाणात साचून खालील लक्षणे दिसत असतील, तर स्वतः घरगुती प्रयोग न करता ईएनटी (ENT) डॉक्टरांकडे जावे.

  • ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा कान गच्च होणे.
  • कानात सतत अस्वस्थता किंवा वेदना जाणवणे.
  • कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणे किंवा शिट्टी वाजणे (Tinnitus).
  • चक्कर आल्यासारखे वाटणे.

वैद्यकीय तज्ज्ञ मायक्रो-सक्शन किंवा विशेष उपकरणांच्या साहाय्याने अतिशय सुरक्षितपणे हा मळ बाहेर काढतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारात मिळणारे कोणतेही इयर ड्रॉप्स कानात टाकणे टाळावे. कानाचा मळ हा तुमचा शत्रू नसून, तो कानाचे रक्षण करणारा मित्र आहे. कानातील शेवटचा कण न् कण साफ करण्याच्या नादात आपण कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेला आणि पडद्याला कायमचे नुकसान पोहोचवू शकतो.

आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 15, 2026, 08:21 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम