Viral Rescue Video: एका १६ वर्षांच्या मुलाने समुद्रात बुडणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्या मुलाचं कौतुक केलं असून, त्याला शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्रूज येथील सीब्राइट बीचवर घडली. समुद्राचं पाणी अचानक वाढलं आणि प्रचंड लाटांमध्ये १० वर्षांचा मुलगा आत ओढला जात होता. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या १६ वर्षांच्या लाइफगार्डने क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी मारली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलं. या मुलाच्या शौर्याला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सलाम केला. ते म्हणाले, “या धाडसी तरुणाला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याने ज्याचा जीव वाचवला त्या मुलालाही आम्ही व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करू. त्याला मोठा नागरी सन्मान देण्यात येईल. तो अत्यंत शूर आहे आणि या सन्मानाचा खरा हक्कदार आहे.”
मुलाच्या शौर्याचं होतंय कौतुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्हिडीओ आपल्या @realDonaldTrump या X अकाउंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २ कोटी ६९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत मुलाच्या धाडसाचं भरभरून कौतुक केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बचाव करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मृत्यूच्या दाढेतून परतल्यामुळे तो काहीसा घाबरला असून, त्याची भीती दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने समुपदेशन सुरू आहे.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

