दूरदर्शनचे दिवस ते… आमची ‘चिमणराव’ मालिका चालू होती. त्यावेळी एकच चॅनल आणि ही एकच मालिका असल्यामुळे आमचं बऱ्यापैकी कौतुक व्हायचं. खूप लोकप्रिय झाली होती मालिका. निर्मात्या-दिग्दर्शक विजया जोगळेकर होत्या. या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने बऱ्याचदा वरळीच्या टीव्ही सेंटरला जाणं व्हायचं. इतरही अनेक कार्यक्रमांच्या निर्मात्यांशी, स्टाफशी, कलाकारांशी ओळखी होत, काहींशी मैत्रीही.
एकदा तिथल्या एका निर्माता मित्राने मला सांगितलं, ‘तुझ्याकडे एक काम आहे.’ त्याला माझी मदत हवी होती. ‘मी निरनिराळे लघुपट करतो दूरदर्शनसाठी, तुला माहीत आहे. अगदी वेगळ्या प्रकारचे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींवर मी सध्या शॉर्ट फिल्म्स बनवतो आहे.’ मला हे ऐकून वाटलं, त्याच्या त्या शॉर्ट फिल्ममध्ये काम करायचं आहे. पण नाही. त्याचं काम थोडं वेगळं होतं. ‘तुझी मदत हवीच आहे मला.’ ‘अरे पण कसली?’ मी विचारलं. ‘मी एका माकडं पाळणाऱ्या माणसावर शॉर्ट फिल्म करतोय.’ ‘माकडं पाळणाऱ्या?’ ‘हो. सत्तर ते ऐंशी माकडं आहेत त्यांच्याकडे. काळ्या तोंडाची, लाल तोंडाची, चिंपांझी, बबून, दोन गोरिल्लासुद्धा आहेत.’ ‘मग मी काय करायचंय? त्या लघुपटाचं निवेदन.’ ‘नाही रे. तू फक्त चल माझ्याबरोबर. तो माकडवाला – कॅप्टन महिपतराव त्यांचं नाव – तयारच नाहीत सहकार्य करायला. खूप प्रयत्न केले मी. ‘नाही’ म्हणून ठेवून देतात फोन. तू आलास बरोबर तर आपण सरळ जाऊन शिरायचं तिथे. सात जणांची टीम आहे आपली, मी धरून. कॅमेरा, साऊंड, लाइट्स वगैरे.’ ‘पण मी – ’ मला काही कळेना. ‘अरे तुला नक्की ओळखतील ते. दूरदर्शनच्या तुझ्या मालिकेमुळे चेहरा ओळखीचा झालाय तुझा. ते नाही म्हणणार नाहीत.’
ही आफत आली! त्याच्या मते (त्यावेळच्या) एकमेव मालिकेतला – जी खूप लोकप्रिय झाली होती – ओळखीचा चेहरा बरोबर घेतला की माकडवाल्यांकडे काम पटकन होईल. ते आणि त्यांचे कुटुंबीय (माकडं नव्हेत. बायको, मुलं वगैरे.) स्वागत करतील अशी त्याची ठाम समजूत होती. मालिकेच्या प्रसिद्धीबद्दल त्याला फारच विश्वास वाटत होता. हा निर्माता तिथे टीव्ही सेंटरला आम्हाला खूप मदत करायचा. कशालाही नाही म्हणायचा नाही. कधी काही अडचण आली तर ती दूर करायला पुढे यायचा. एपिसोडचं शूटिंग चालू असताना वेळात वेळ काढून हजर व्हायचा.
‘टॉप चाललंय’ असं सतत म्हणायचा… त्याला नाही म्हणणं कठीण होतं. ‘कुठे आहे हे कॅप्टन महिपतराव माकडवाल्यांचं ठिकाण?’ मी विचारलं. ‘उंब्रजपासून बारा-पंधरा किलोमीटर्सवर आहे त्यांचं फार्म हाऊस.’ ‘उंब्रज म्हणजे -’ ‘पुणे, कोल्हापूर रस्त्यावर आहे, साताऱ्यापासून तीसएक किलोमीटरवर. कराडच्या अलीकडे.’ मी हे टाळण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक अडचणी सांगितल्या. रचून नाही, त्या खऱ्या होत्या. पण त्याने फारच गळ घातली. ओळखीच्या चेहऱ्याने काम निश्चित होईल. मला अगदी करायचीच आहे ही शॉर्ट फिल्म. मी टीव्ही सेंटर डायरेक्टरना सांगितलंय तसं. महिन्याभरात देतो म्हणून. आता आयत्या वेळी ‘नाही जमत’ म्हणणं शक्य नाही होणार मला. शेवटचा एक प्रयत्न करून बघू या. सरळ जाऊन धडकूच त्यांच्या फार्म हाऊसवर.’
माझ्यावर फारच मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटलं मला! आम्ही व्हॅनने उंब्रजजवळच्या काजरनेर गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. हनुमान मंदिराच्या डावीकडून एक वाट गेली होती आणि वाकड्या वळणाने झाडांमध्ये गायब झाली होती. हाच रस्ता तुम्हाला महिपतरावांच्या घराकडे नेईल, असं मंदिरात आलेल्या गावकऱ्यांनी सांगितलं. झाडात लपलेलं फाटक दिसताच ते उघडून शूटिंगची टीम फार्म हाऊसच्या आवारात आली. आता आत वर्दी कशी द्यावी हे ठरवत असतानाच अचानक समोरून उंचेपुरे महिपतराव प्रकटले. (म्हणजे, हेच महिपतराव असावेत असं टीममधल्या सगळ्यांनाच एकाच वेळी वाटलं!) करारी मुद्रा, रंगवलेले (पण काही ठिकाणी रंग उडालेले) केस, पायघोळ झब्बा. त्यांच्या एकेका खांद्यावर एकेक माकड बसलं होतं. एक छोटंसं चिंपांझी आणि दुसरं मोठं लाल तोंडाचं. छोटं काहीतरी खाण्यात मग्न होतं. मोठं अपरिचित चेहरे आणि बरोबर आणलेलं (शूटिंगचं) सामान पाहून भीती वाटावी अशा प्रकारे दात विचकू लागलं. कुत्र्यांचा मूड शेपटी हलवण्यावरून जोखता येतो.
माकडांचा मूड कसा ओळखायचा माहीत नव्हतं! महिपतरावांच्या चेहऱ्यावर स्वागतासाठी असावं असं कोणत्याही प्रकारचं हसू नव्हतं. एखादी स्मितरेषाही नाही. (त्यांच्या वाटचं माकडच दात दाखवत हसत असावं असं वाटलं!) निर्मात्याने त्यांना अदबीनं नमस्कार केला. ‘न सांगता आलो. म्हटलं तुम्हाला सरप्राइज करावं. आपला मर्कट-संग्रह पाहायला मिळेल का?’ महिपतरावांच्या कपाळावर आठ्या चढल्या. ‘त्यांची नाश्त्याची वेळ आहे.’ ते अनिच्छुक दिसले. ‘हे पाहिलंत का कोण आलंय?’ शॉर्ट फिल्म निर्मात्याने मला पुढे ढकललं. ‘तुम्ही यांना असे ओळखणार नाही. अहो, टीव्हीवरचे फेमस चिमणराव. सध्या घराघरांत – ’ ‘मी टीव्ही बघत नाही.’ महिपतरावांनी एका क्षणात स्वागत समारंभाचा तुकडा पाडला. आमच्या निर्मात्याचा हेतूच उताणा पडला! मला उगीचच ओशाळल्यासारखं झालं. त्यांनी ओळखलं नाही म्हणून नाही. त्या निर्मात्याला माझी काही मदत होऊ शकली नाही म्हणून. महिपतराव राजी नव्हते. चित्रीकरण सोडाच, परिसर दाखवायलाही ते अनुत्सुक दिसले. मी गोरिला कुठे दिसतो का बघत होतो. तो नाही तर निदान बबून तरी. पण नाही दिसले. ब्रेकफास्ट करत असावेत. आम्हाला निघावं लागलं, दुसरं काय करणार?
आमची मोठी व्हॅन जेमतेम फाटकाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात मागे बसलेल्या पमीची (प्रमिलाची) किंकाळी ऐकू आली. एक काळ्या तोंडाचा वानर तिच्या शेजारी येऊन बसला होता. सगळे ओरडायला लागल्यामुळे त्याने पमीची खाणं ठेवलेली पिशवी उचलली, पुढच्या सीटवर उडी मारली. माझा गॉगल हिसका देऊन पळवला. मला स्वच्छ दिसावं अशी त्याची इच्छा असावी! आणि व्हॅनच्या खिडकीतून उडी मारून तो पसार झाला. माझ्या चेहऱ्याला जखम झाली.
भीतीनं पोटात गोळाच आला! तेव्हापासून माकडांची प्रचंड भीतीच वाटू लागली. कानाला खडाच लावला – माकडांच्या जवळ जायला नको. काहीजण मांजरांना घाबरतात, काही कुत्र्यांना. (अभिनेते सुधीर जोशी, विजय चव्हाण कुत्र्यांना भयंकर घाबरायचे. त्यांना कधीतरी कुत्रं चावलं होतं म्हणे. मला माकड चावलं नाही, पण त्यानं जोरदार ओरबाडलं!) निर्मात्याची ती फिल्म झालीच नाही. प्रोजेक्ट बासनातच राहिलं. बेत बारगळला. …मध्ये बरीच वर्षं लोटली. काही प्राण्यांबरोबर कामं झाली. (म्हणजे, प्राणी माझे सहकलाकार होते.) ‘कथा दोन गणपतरावांची’ सिनेमात मी आडमापाचा, दांडगा बोकड पाळला होता. (सिनेमात त्याला पट्टा बांधून फिरायला न्यायचो!) ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेत आबा कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन येतात, त्याला संस्कृतमधल्या आज्ञा पाळायला शिकवतात, असं होतं.
‘पहेली’ सिनेमात उंट होता, तर ‘दशावतार’मध्ये (लाल) मुंगळा आणि खार! …माकड मात्र नाही.
…काही दिवसांपूर्वी दोन मुलं भेटायला आली. ती ‘फिल्म मेकिंग’चा कोर्स करत होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. ‘डिप्लोमासाठी एक शॉर्ट फिल्म करतोय सर. तुम्ही काम केलंत तर फार बरं होईल सर. तुम्ही असाल तर आम्हाला बजेट वाढवून घ्यायला मदत होईल सर.’ मला करावंसं वाटलं. ते ‘सर सर’ करत होते म्हणून नव्हे. मुलं खूप नेकीची, प्रामाणिक आणि हुशार वाटली. ‘तुमचे दोनच दिवस लागतील सर.’ ‘आणखी कोण पात्रं आहेत?’ ‘एकूण तीन आहेत सर. तुमची प्रमुख भूमिका.’ ‘करीन मी. कसला रोल आहे?’ ‘वृद्ध मदारी. गरीब, थकलेला. रस्त्यावर खेळ करणारा. तुमच्याबरोबर तुमची छोटी नात आणि – ’ ‘आलं लक्षात.’ मी सावरून बसत म्हणालो. तो उत्साहानं लघुपटाची संहिता वाचू लागला. ‘संध्याकाळ. गजबजलेला रस्ता. म्हातारा मदारी कडेने चालला आहे. त्याच्या खांद्यावर माकड. मधेच ते डोक्यावर बसतं. मदारी त्याला चालता चालता वर हात करून केळं भरवतो…’ मी त्यांना थांबवलं. ‘कळवतो नंतर’ म्हटलं.
का कोण जाणे, पण मग काही करू पाहण्याच्या त्यांच्या उत्साहाला, कल्पनांना साथ द्यावी असं वाटलं. माझ्या इच्छेने (मर्कटविषयक) आकसावर मात केली.
मी ‘हो’ कळवलं.

