खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. वरळीचे वल्लभभाई पटेल स्टेडियम. अक्षरशः हज्जारोंची गर्दी. फ्री स्टाइल कुस्त्यांची दंगल. मुंगी शिरायला जागा नाही अशी चेंगराचेंगरी. अमाप उत्साह, ओरडा, शिट्ट्या, कोलाहल. उत्कंठा शिगोशिग. त्या गर्दीत आम्ही सोसायटीतली आठ-दहा पोरं. गर्दीतून वाट काढीत आपापल्या जागांवर. सोबतीला आमच्यापैकीच दोघातिघांचे वडील.
मोठमोठे कुस्तीतले स्टार्स. इथले आणि काही आंतरराष्ट्रीय. सिली समारा, रंधावा, वाँग बकली, (बुरखाधारी) रेड स्कॉर्पियन आणि अजस्र किंग काँग – कुस्तीगीर खलपुरुषांचा शिरोमणी! (त्याच्याबद्दल अनेक आख्यायिका होत्या. तो ब्रेकफास्टला बावीस अंडी खातो आणि जेवणात त्याला सहा-सात कोंबड्या लागतात, अशा अनेक बातम्या पेपरात येत.) पण ‘सुपरस्टार’ मात्र एकच. रुस्तम-ए-हिंद दारासिंग ! त्याची लोकप्रियता कमालीची होती. सगळ्या स्टार्सच्या कुस्त्या होत. पण सगळ्यात थरारक, सस्पेन्सपूर्ण, उत्कंठावर्धक फ्री स्टाइल कुस्ती म्हणजे दारासिंग विरुद्ध किंग काँग. किंग काँगने एकेका रेसलरचा पराभव केलेला असे. काहींना रिंगणाबाहेर फेकून, काहींना जीवघेण्या पकडीत घेऊन, काहींना पेच घालून पिरगळून, तर काहींना खाली पाडून त्यांच्या पाठी-पोटावर बसून किंवा त्यांचं नाक जमिनीवर निर्दयपणे दाबून धरून किंग काँग त्यांना हरवत असे. पराभूत कुस्तीपटूंमध्ये दारासिंगचा धाकटा भाऊ रंधावा हासुद्धा असे. आणि मग दारासिंग सगळ्यांचा हिरो कुस्तीच्या आखाड्याकडे धीम्या पावलांनी येई – आपल्या भावाच्या रंधावाच्या पराभवाचा सूड घ्यायला. वचपा काढायला.
किंग काँग रिंगणाभोवती बांधलेल्या दोरखंडांमधून त्याचं लहान डोकं आणि चारशे पौंडांचं प्रचंड शरीर घुसवून रिंगणात येई. दुसऱ्या बाजूने एखाद्या ‘ग्रीक गॉड’सारखा दिसणारा, बांधेसूद, तगडा, उमदा आणि देखणा दारासिंग टाळ्यांच्या प्रचंड मोठ्या गजरात-गोंगाटात एन्ट्री घेई. मग मॅचचा रेफ्री नेहमीची औपचारिकता म्हणून या दोन बलाढ्य कुस्तीपटूंना कुस्ती-नियम समजावून सांगे. अंगावर म्हणजे तोकड्या कपड्यात कुठे शस्त्रविस्त्र लपवलेलं नाही याची तपासणी होई. मग प्रतिस्पर्ध्यांची हातमिळवणी करण्याचा सोपस्कार. किंग काँग हे सारं नाईलाजाने किंवा रागारागाने करतो असं वाटे. कधी एकदा दारासिंगला भिडतोय आणि लोळवतोय असं त्याला वाटत असावं, असा त्याचा एकूण आविर्भाव असे.
… आणि मग तुडुंब भरलेल्या स्टेडियममधल्या प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली की कुस्तीला सुरुवात होत असे. किंगकाँग आक्रमक, हिंस्र, नियमांना धाब्यावर बसवणारा वाटे. त्याच्या तुलनेत दारासिंग पद्धतशीर खेळे. त्याच्या प्रत्येक हालचालीला, आक्रमणाला, पकडीला (आणि किंग काँगच्या विव्हळण्याला) ‘पब्लिक’चा प्रचंड पाठिंबा मिळे. ओरडा, आरोळ्या, टाळ्या यांनी वातावरण भारलेलं राही. पहिल्या काही फेऱ्यात किंग काँगची सरशी होई. मग हळूहळू पारडं फिरू लागे. आमचा हिरो जिंकू लागे. किंग काँगला बेदम मार पडे.
दारासिंग त्याला बुकलून काढे, (जवळजवळ) उचलून आपटे, पालथा पाडून त्याच्या पाठीवर एक पाय ठेवून उभा राही. लोक आनंदातिशयाने किंचाळत, नाचत. आम्हा मुलांचे टाळ्या वाजवून हात दुखत. ओरडून घसे बसत. बराऽच वेळ चालणारा स्टेडियमवरचा जल्लोष दूरवर ऐकू जाई. आसमंतात घुमत राही.
कुस्त्यांचा सीझन मग संपला. वल्लभभाई पटेल स्टेडियमवरचं ते वेडही ओसरलं. माझा कुस्तीशी काही संबंध राहिला नाही. कुस्ती खेळण्याशी तर नाहीच, बघण्याशीही नाही. बरीच वर्षं लोटली. मध्येच एकदा हळहळ वाटेल अशी बातमी वाचली. कुस्तीतला दारासिंगचा प्रतिस्पर्धी खलपुरुष किंग काँग सिंगापूरजवळ एका भीषण मोटार अपघातात ठार झाला. तो मूळचा हंगेरियन होता. त्याचं खरं नाव एमिल झाया. पोटापाण्यासाठी तो पहिलवान बनून किंग काँग या नावाने कुस्त्या खेळायचा, प्रेक्षकांसमोर हारजीतीचा खेळ करायचा.
… मी एक हिंदी मालिका करत होतो – ‘नॉक नॉक कौन है’ नावाची. ‘सिटकॉम’ – फार्सिकल कॉमेडी होती. मी ‘केशवकुमार’ नावाचा (धांदरट, घोळ करणारा) कुटुंबप्रमुख होतो. माझ्या बायकोच्या भूमिकेत भारती आचरेकर होती. आमच्या दोन मुली (त्यातली एक सुश्मिता मुखर्जी) आणि बेकार मेव्हणा (नवीन बावा) असं कुटुंब. दिग्दर्शक होते कपिल कपूर. (‘हम पाँच’ या त्यावेळी गाजत असलेल्या सीरियलचे दिग्दर्शक.)
प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळा ‘गेस्ट आर्टिस्ट’ नवा पाहुणा म्हणून आमच्या घरात (‘नॉक नॉक’ करून) यायचा. असरानी, अन्नू कपूरपासून शशिकला, शम्मीपर्यंत आणि सचिन, अशोक सराफपासून माधवन, रघुवीर यादवपर्यंत – असे अनेऽक स्टार्स एकेका एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून आमच्या घरी येऊन गोंधळ घालून, धमाल करून गेले!
… आणि मग एका एपिसोडमध्ये साक्षात रुस्तम-ए-हिंद दारासिंग घरात आले! ‘लाफ्टर क्लब’संबंधी कथानक असलेला तो एपिसोड होता. ते समोर आल्यावर आधी मी त्यांच्याकडे अविश्वासाने बघतच राहिलो. लहानपणी वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पाहिलेली त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा, त्यांचं ते वलय असलेलं व्यक्तिमत्त्व, हजारो फॅन्सना थरारक अनुभव देणारा, त्यांच्या विजयाने पब्लिकला पागल करणारा आम्हा सगळ्यांचा ‘हिरो’, ‘सुपरमॅन’ दारासिंग माझ्यासमोर एका शांत, सौम्य, वृद्ध अभिनेत्याच्या रूपात गालातल्या गालात हसत उभा होता!
दिग्दर्शक कपिल कपूर म्हणाले, ‘आज आपको इनके साथ रेसलिंग करनी है.’ मी सद्गदित झालो. ‘रेसलिंग?’ ‘हां कुश्ती.’ ‘दारासिंगके साथ?’ ‘अरे भाई ये सिटकॉम है’ त्यांनी आठवण करून दिली. मी रिहर्सलच्या आधीच चीतपट झालो होतो. लायटिंगचं काम सुरू असताना रुस्तम-ए-हिंद दारासिंगनी मला नरमाईनं विचारलं, ‘डायलॉग की रिहर्सल करेंगे?’ दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात बसून आम्ही संवादांची तालीम केली. (कुस्तीची तालीम कशी करणार? मला टेन्शन होतं.) मी शाळेत असताना त्यांच्या कुस्त्या पाहिल्याचं त्यांना सांगितलं. ‘वो तो आसान था. ये डायलॉग याद करना बडा मुश्कील है.’ ते म्हणाले.
शूटिंगच्या वेळी त्यांना म्हटलं, ‘मी रंधावा आहे असं समजा, आणि मोठ्या भावाच्या मायेनं कुस्ती खेळा.’ ते माझ्याकडे प्रश्नांकित मुद्रेने बघत राहिले आणि एकदम मोठ्यानं हसले. ‘फिक्र मत करो भाई. आपको कुछ तकलीफ नही होगी.’ त्यांनी शब्द पाळला. दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली (कॉमेडीतली) झटापट चित्रित झाली. अगदी माझे कपडे फाटेपर्यंत! दिवसअखेर रुस्तम-ए-हिंद दारासिंगबरोबरचं शूटिंग संपलं.
पॅकअपनंतर दारासिंगना निरोप द्यायला आम्ही बंगल्याच्या फाटकापाशी जमलो होतो. माझ्या मेव्हण्याचं काम करणाऱ्या नवीन बावाने व्रात्यपणे दारासिंगना पंजाबी भाषेत विचारलेलं मला कळलं. ‘किंग काँगला हरवलंत तुम्ही. आज यांच्याबरोबर कुस्ती केलीत. तुहानू की फरक सीगा?’ दारासिंग हसून म्हणाले, ‘दोन्ही वेळा ॲक्टिंगच होती.’
… खरं आहे. तिथेही वास्तवाचा आभास निर्माण करणारा अभिनय, आणि इथेही… पण केवढा फरक!

