![]()
मृत शिल्पा गवारे यांच्या भावजय स्नेहा रणजित कलाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घातली. स्नेहा कलाटे यांनी फोनद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. “देवाभाऊ… आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला देवाभाऊ म्हटलं जातं. आज तुम्ही आम्हाला न्याय द्यावा,” अशी आर्त विनंती स्नेहा कलाटे यांनी केली आहे. माझ्या नणंदेची ही दुसरी केस आहे. तिच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, “हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल. आरोपींना कठोर शिक्षा करू. तुम्ही काळजी करू नका,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पाच्या कुटुंबीयांना दिलं असून याप्रकरणी आरोपींवर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिल्पा गवारे प्रकरणात पोलिसांनी दबावाला बळी पडू नये- नीलम गोऱ्हे
शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. विवाहित महिलांवरील छळाच्या घटना गंभीर असून, अशा प्रकरणांमध्ये कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिल्पा गवारे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना महत्त्वाचे आवाहन केले. “या प्रकरणात कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. तपास निष्पक्षपणे करा आणि सत्य समोर आणा,” असे त्यांनी पोलिसांना सांगितले. विवाहित महिलांचा अमानुष छळ थांबण्याचे नाव घेत नसल्याबद्दलही गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल, तर केवळ नवीन कायदे करून उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवीन कायदा आणला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी होईल, याची खात्री देता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिल्पा गवारे प्रकरणात लग्नाला सात वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे हुंडाबळीच्या कायद्यातील तरतुदी लागू होण्याबाबत मर्यादा येतात, याकडेही नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विवाहित मुलींना माहेरच्या कुटुंबाने मानसिक आणि भावनिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलीवर सासरी अन्याय किंवा छळ होत असेल, तर “तू आमच्याकडे ये, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,” असा विश्वास माहेरच्या मंडळींनी तिला दिला पाहिजे. गरज पडल्यास मुलीला आपल्या घरी ठेवण्याची तयारीही कुटुंबीयांनी दाखवायला हवी, असे गोऱ्हे म्हणाल्या.
काही कुटुंबे मुलीला पूर्ण पाठबळ देतात; मात्र काही ठिकाणी सामाजिक दबाव, बदनामीची भीती किंवा इतर कारणांमुळे मुलीला माहेरी घेण्याची मानसिकता नसते. अशा परिस्थितीत महिलांना सासरी छळ सहन करत राहावे लागते आणि परिस्थिती टोकाला जाऊ शकते, अशी चिंता नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
