dark magic in taloda terrifying incident before election counting; पुरोगामी महाराष्ट्रात मतमोजणीपूर्वी अघोरी प्रयोग? राजकीय चर्चांना उधाण, नागरिकांमध्ये भीती… काय घडलं?
dark magic in taloda terrifying incident before election counting; पुरोगामी महाराष्ट्रात मतमोजणीपूर्वी अघोरी प्रयोग? राजकीय चर्चांना उधाण, नागरिकांमध्ये भीती… काय घडलं?
नंदुरबार, महेश पाटील: मार्गशीर्ष अमावस्येच्या मुहूर्तावर शुक्रवारी रात्री तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मतमोजणीच्या अगदी आदल्या दिवशी ही घटना घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
२१व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असतानाही समाजात अंधश्रद्धेचे प्रकार अजूनही सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मार्गशीर्ष अमावस्येला ‘दर्श अमावस्या’ असेही संबोधले जाते. पंचांगानुसार ही अमावस्या शेती, पितरपूजन, स्नान, दान आणि दीपपूजेसाठी महत्त्वाची मानली जाते. चंद्रदर्शन होत नसल्याने तिला ‘दर्श’ असे नाव देण्यात आले आहे.
अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी घराची स्वच्छता करून लक्ष्मीपूजन केले जाते. मात्र याच अमावस्येचा मुहूर्त साधून अज्ञात व्यक्तींनी चौफुलीवर अघोरी जादूटोण्याचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चौफुलीच्या मध्यभागी खडूने मोठे वर्तुळ आखण्यात आले होते.
या वर्तुळाच्या आत फाटकी काळ्या रंगाची पॅन्ट, शाळकरी मुलाची बॅग, शाळेचे बूट, शर्ट, रुमाल अशी विविध वस्त्रे ठेवण्यात आली होती. तसेच नवीन ताट, दोन वाट्या, ग्लास, लिंबू, कुंकू आणि इतर पूजेचे साहित्यही त्या ठिकाणी आढळून आले. संपूर्ण दृश्य पाहता हा प्रकार साधा नसून अघोरी जादूटोण्याचाच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या अगदी मधोमध हा प्रकार केल्यामुळे सकाळच्या वेळी मार्गावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक वाहनधारकांनी धडकी भरल्याने त्या वर्तुळाला चुकवून सावकाश किंवा पर्यायी मार्गाने प्रवास केला. काही नागरिकांनी थांबून हा प्रकार पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करत अंधश्रद्धेवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, तळोदा नगरपालिकेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असून, त्याच्या एक दिवस आधी हा प्रकार घडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांवर प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. विज्ञानवादी विचारसरणी रुजवण्यासाठी जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाने सजग राहावे, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा