Headlines

Crime News: भाजप नेत्याच्या सुनेनं मरण कवटाळलं; PM करताना डॉक्टरांना अंतर्वस्त्रात चिठ्ठी सापडली


भाजप नेत्याच्या सुनेनं राहत्या घरी मरण कवटाळलं. दोन वर्षांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या प्रकरणी सुनेच्या कुटुंबियांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

bjp leader daughter in law suicide
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गांधीनगर: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या सुनेनं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील भाजपच्या महिला नेत्याच्या २४ वर्षीय सुनेनं राहत्या घरी जीवन प्रवास संपवला. पोलिसांनी तिचं शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. डॉक्टरांकडून शवविच्छेदन सुरू असताना मृत महिलेच्या अंतर्वस्त्रात एक चिठ्ठी सापडली. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

पतीचे अन्य महिलेशी अवैध संबंध असल्याचा उल्लेख भाजप नेत्याच्या सुनेनं चिठ्ठीत केला आहे. निधी कुमारी असं मृत महिलेचं नाव आहे. सूरतच्या कडोदरा नगर येथील श्रीनिवास ग्रीन सिटी सोसायटीमधील घरात तिनं जीवन संपवलं. निधी कुमारी कडोदरा नगर भाजपच्या उपाध्यक्षा शशी सिंह राजपूत यांची सून होती. निधीचा विवाह दोन वर्षांपूर्वी शशी सिंह यांचे पुत्र सौरभ यांच्या सोबत झाला होता. निधीच्या आकस्मिक मृत्यूनं परिसरात खळबळ उडाली आहे.

निधीचं शव पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं, त्यावेळी तिथल्या डॉक्टरांना तिच्या अंतर्वस्त्रात एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी डॉक्टरांनी लगेचच पोलिसांच्या ताब्यात दिली. पतीचे विवाहबाह्य संबंध असून त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीत आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी घरात ठेवली, तर सासरचे लोक ती गायब करतील, अशी भीती निधीला वाटत होती. त्यामुळेच तिनं ही चिठ्ठी कपड्यांच्या आत लपवली. मृत्यूनंतर सत्य समोर यावं आणि दोषींना शिक्षा मिळावी, या हेतूनं निधीनं चिठ्ठी अंतर्वस्त्रात ठेवली होती.

निधीचा भाऊ आदित्य सिंहनं या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवली आहे. निधीचा पती सौरभचे इशिता नावाच्या तरुणीशी संबंध होते. याबद्दल निधीला समजताच त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले. सौरभच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निधी तणावाखाली होती. सौरभ आणि इशिता यांच्या संबंधांना कंटाळूनच निधीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं आदित्यनं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांकडून या आरोपांची चौकशी सुरू आहे.

निधीनं मृत्यूच्या आधी केलेला कॉल या प्रकरणात महत्त्वाचा असल्याचं आदित्य सिंहनं सांगितलं. ‘रविवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी निधीनं तिच्या आईला कॉल केला होता. सौरभ मला मारून टाकेल, असं ती आईला म्हणाली. यानंतर तिचा फोन स्विच्ड ऑफ झाला. यानंतर कुटुंबानं निधीची सासू शशी सिंह यांना कॉल केला. तेव्हा त्यांना निधीच्या मृत्यूबद्दल समजलं,’ असा घटनाक्रम आदित्यनं कथन केला.