Colombo- Port Of Call: या पुस्तकात महात्मा गांधी, सर डोनाल्ड ब्रॅडमन, मार्क ट्वेन, आंतोन चेखोव, जपानचे प्रिन्स हिरोहितो, अमेरिकी नृत्यांगना जेन शर्मन, सर आर्थर कॉनन डॉयल, इजिप्तचे क्रांतिकारी उराबी पाशा इत्यादींच्या अनुभवांचा समावेश आहे.

श्रीलंकेचे (पूर्वीचे सिलोन) सौंदर्य जगभरातील पर्यटकांना अनेक वर्षांपासून आकर्षित करत आले आहे. १८६९मध्ये सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर कोलंबोचे महत्त्व वाढले. ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडकडे जाणारी जहाजे कोलंबोला २-३ दिवस थांबत असत. जहाजातील प्रवासी कोलंबो, कँडी, गॉल यांसारखी शहरे पाहून घेत. श्रीलंका स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व लेखकांनी तिथल्या शहरांना भेटी दिली. अशाच १४ प्रतिष्ठित व्यक्तींच्या श्रीलंका भेटीविषयीची माहिती ‘कोलंबो : पोर्ट ऑफ कॉल’ या पुस्तकातून अजय कमलाकरन यांनी दिली आहे.
महात्मा गांधी १९२७मध्ये सिलोन येथे तीन आठवडे मुक्कामास होते. त्यांच्यासोबत कस्तुरबा, सी. राजगोपालाचारी आणि त्यांची मुलगी लक्ष्मी, गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई आणि प्यारेलाल होते. ‘विथ गांधी इन सिलोन’ नावाच्या पुस्तकात महादेवभाई यांनी त्या दौऱ्यातील अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खादी फंडसाठी निधी गोळा करण्याचा गांधींचा प्रयत्न होता. महादेवभाईंनी लिहिले आहे ‘आम्ही जेव्हा कोलंबोहून निघालो तोपर्यंत ८६,००० रुपये गोळा झाले होते. पुढे आम्ही जाफनाला जाणार होतो. एक लाख रुपये एवढी रक्कम गोळा होणार नाही, असे आम्हाला वाटत होते. परंतु त्याहून अधिक रुपये गोळा झाले. रामनाथन महिला कॉलेजमधून १,१११ रुपये गोळा केले. कँडी येथील धर्मराजा कॉलेजचे प्राचार्य पारसी गृहस्थ होते. त्यांनी देखील निधी गोळा केला. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या तमिळ कामगारांना ते भेटले. त्यांची परिस्थिती आणि त्यांचे होणार शोषण पाहून गांधी अस्वस्थ झाले होते, असे उल्लेख पुस्तकात आहेत.
रशियन लेखक आणि नाटककार चेखोव १८९०च्या २२ डिसेंबरला कोलंबो येथे गेले होते. ते सिलोनमध्ये एकूण ५८ तास होते. त्यांनी कोलंबो आणि जुनी राजधानी कँडीला भेट दिली होती. त्यांनी सिलोनचे वर्णन ‘नंदनवन’ असे केले होते. ते वर्णन ऐकून मार्च १९११मध्ये रशियन लेखक, कवी व नोबेल पारितोषिक विजेते इव्हान बुनिनही तिथे गेले होते. चेखोवच्या साहित्याने श्रीलंकेतील अनेक लेखकांना प्रोत्साहित केले आहे.
सन १९३०मध्ये ब्रॅडमन यांची इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती. ऑरफोर्ड नावाच्या जहाजातून हा चमू दौऱ्यासाठी रवाना झाला. दोन एप्रिलला जहाज कोलंबो पोहचले. तिथे त्यांच्याकडे १७ तास होते. तिथे त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. सुंदर माउंट लेव्हिनिया आणि एका बौद्ध मंदिरात ते गेले. सिलोन इलेव्हनच्या विरोधात सराव सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर क्रिकेट खेळण्याचा २१ वर्षांच्या ब्रॅडमन यांचा हा पहिला अनुभव. ब्रॅडमन यांनी ४० धावा केल्या. तो सामना पाहायला आलेला लोकांना पुढच्या काही महिन्यांत ब्रॅडमन जगातला एक सर्वोत्तम फलंदाज होईल, याचा अंदाज नव्हता. इंग्लंडमध्ये त्यांनी ९७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला परत जाताना जहाज कोलंबो येथे परत थांबले. सिलोन क्रिकेट असोसिएशनने त्यांचा सत्कार केला. १९३४मध्ये पण इंग्लंडला जाताना जहाज कोलंबोला थांबले होते. सिलोनमध्ये ब्रॅडमनला खेळताना अनेकांनी पाहिले, त्यामुळे ते श्रीलंकन क्रिकेटपटूंसाठी आदर्श झाले.
एखाद्या राजाने किंवा नेत्यांनी बंड केल्यास त्याला शिक्षा म्हणून इतर देशात पाठविण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. इजिप्तच्या उराबी पाशा यांना ब्रिटिशांनी श्रीलंकेत पाठविले होते. त्यांनी राजांच्या विरोधात बंड केले होते. १८८२मध्ये ते दोन महिने इजिप्तचे पंतप्रधान होते. त्याने ब्रिटिशांची मदत घेतली. ब्रिटिशांनी अलेक्झांड्रिया शहर उद्ध्वस्त केले. नऊ वर्षांनंतर ब्रिटिशांनी १९११मध्ये पाशा यांना परत त्यांच्या देशात पाठवले. १८१६मध्ये ब्रिटिशांनी कँडीचे राजे विक्रमा राजसिंगे यांना भारताच्या वेल्लोर येथे पाठवले होते. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफर यांना बर्मा येथे पाठवले होते. काल्पनिक गुप्तहेर शेरलॉक होम्स निर्माण करणारे लेखक आर्थर कॉनन डॉयल हे श्रीलंकेत दोनदा गेले होते. पहिल्यांदा ते १९२१मध्ये गेले होते. मुंबईतही ते आले होते. मुंबई शहर त्यांना आवडले होते, अशी रोमांचक माहिती या पुस्तकात आहे.
………………………………………………….
कोलंबो : पोर्ट ऑफ कॉल
लेखक : अजय कमलाकरन
प्रकाशक : पेंग्विन बुक्स
पाने : २७३, किंमत : ५९९ रुपये

