Cockroach Cafe Instagram: बिहारमध्ये ‘कॉकरोच कॅफे’ सुरू झालाय. हटके नावामुळे हा कॅफे सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. नेटकरी त्यावर मजेशीर मीम्स आणि कमेंट्स करत आहेत. चला, पाहूया या व्हायरल कॅफेचा व्हिडीओ.

कॉकरोच कॅफेची सोशल मीडियावर चर्चा
कॉकरोच हे नाव का चर्चेत आलं, हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. देशभरात सध्या शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांची जी आंदोलनं सुरू आहेत, त्यासंबंधी प्रत्येक बातमीत तुम्हाला कॉकरोचचा उल्लेख पाहायला मिळेल. त्यामुळे हा शब्द सध्या झेन झी आणि जनरेशन अल्फा या नव्या पिढीतील तरुणांना आकर्षित करतोय. हा शब्द सध्या इन्स्टाग्रामपासून सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होतोय. अन् त्यामुळे या कॉकरोच कॅफेची चर्चादेखील सोशल मीडियावर होताना दिसत आहे. तसंच, या कॉकरोच कॅफेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
कॅफेला कॉकरोच नाव का दिलं?
या कॉकरोच कॅफेचा व्हिडीओ 01_nalanda_se या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हे कॅफे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हिलसा बायपास, पाटणा रोड येथे सुरू करण्यात आलं आहे. मालकानं NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तरुणांना काहीतरी वेगळं आवडतं. आणि ‘कॉकरोच कॅफे’ हे नाव खूपच वेगळं आहे. तुम्हाला ‘रॉयल कॅफे’ नावानं नाक्यानाक्यावर हॉटेल्स दिसतील. पण ‘कॉकरोच’ नावानं एकही नाही. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि कॅफेचं नाव त्यांच्या स्मरणात राहावं, म्हणून त्यांनी हेच नाव दिलं.

