मुख्यमंत्री देवेंद्र गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेल. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.’
उद्धव ठाकरेंनी मनसे-सेना युतीबाबत बोलताना एका वाक्यात महत्वाचे भाष्य केले. पत्रकरांनी प्रश्न विचारताच ठाकरे म्हणाले ‘बघूया महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार,’ पुढे ठाकरेंनी ‘संदेश कशाला? थोड्या दिवसांत बातमीच देतो,’ असे थेट विधान केले आणि आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही, असेही नमूद केले.
दरम्यान संजय राऊतांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनही झाला आहे, अशी माहिती दिली. ‘राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे.’ असे संजय राऊतांनी नमूद केले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना आता बळ मिळालं आहे.

